मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी अंक २०२५ - हा नाद - कथा

बिपीन सुरेश सांगळे · · दिवाळी अंक
ती त्याच्या नजरेस प्रथम पडली, तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला. आणि यामध्ये काही आश्चर्यही नव्हतं म्हणा. ती होतीच तशी आकर्षक! गूढाचा वेध घेणारे तिचे चमकदार घारे डोळे, तिचा रंग, रेशमी केस, तिची फिगर, तिची चाल आणि यावर कळस म्हणजे तिची अदा! तिचा तोरा! तुमचं मन काय विचार करतंय, ते मला माहीत आहे, पण तसं नाहीये. ती काळ्या रंगाची एक मांजर होती. एकसारखा, पूर्ण काळा रंग असलेली. फक्त तिच्या पाठीवर एक नाजूक पट्टा होता. सोनेरी केसांचा. राजा एका पॉश सोसायटीमध्ये राहत होता. एकटाच. तो सावळा होता, साध्याच चेहऱ्याचा. पण अंगाने भरलेला.एका मोठ्या कंपनीमध्ये तो मॅनेजर होता. तो रोजच रात्री उशिरा यायचा. एके दिवशी तो असाच आला. त्याने पार्किंग लॉटमध्ये गाडी लावली. तो किल्ली फिरवत निघाला. पार्किंगच्या पलीकडे सोसायटीची बाग होती. तिथे झुडपांमध्ये काहीतरी खसफसलं. त्याने चमकून पाहिलं. झुडपाच्या आत प्रकाश पोहोचत नव्हता. मग काहीतरी चमकलं. ते तिचे डोळे होते,चमकदार. एलइडी लाइट लावल्यासारखे. वर अशोकाची पानं सळसळली. मग तो हसला. त्याने तिला फिसफिस करून जवळ बोलावलं. ती आली की जवळ... त्याने बिचकत हात पुढे केला. ती आणखी पुढे आली. त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिने आनंदाने अंग आक्रसलं. मग त्याने धीटपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिला ते आणखी आवडलं. ती नाजूकपणे म्याव करून ओरडली. मांजरांच्या राज्याचा विचार केला, तर तिचा आवाज भलताच गोड होता. माणूस प्रेमळ आहे! - तिच्या मनाने याची नोंद घेतली. मग तो गेला. दुसरा दिवस. पुन्हा तेच सगळं. त्याला ती आवडली, तिला तो. त्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र तो खुशीत होता. आज त्याने कॅटफूडचा एक पुडा आणला होता. ती दिसल्यावर त्याने तो फोडला. तिला त्याचा वास आला. ती आनंदाने नाजूक ओरडली आणि अधाशासारखं ते खाऊ लागली. त्याला बरं वाटलं. तिचं खाणं झाल्यावर तो गेला. आता ते रोजचं झालं. तिने त्याच्याशी दोस्ती केली. पक्की! ती रोज त्याची वाट बघायची. वाट बघण्याची तिची जागा ठरावीक होती. तो आला की ती आनंदाने म्याव करायची आणि त्याच्याकडे पळत जायची. लुटूलुटू! त्याच्या पायाला ती आनंदाने अंग घासायची. त्याला प्रदक्षिणा घालायची. तिला ते आवडायचं. त्यालाही ते आवडायचं. तो तिच्यासाठी आठवणीने खाऊ आणायचाच. वॉचमन ते पाहत असायचा. एके दिवशी तो तिला ‘चल’ म्हणाला, तर ती निघाली की नखरेल पळत. ती त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेली. ती घरात सगळीकडे फिरली. मग ती सोफ्यावर चढून मजेत शेपूट हलवत बसली. जणू काही ते घर तिच्यासाठी नवीन नव्हतंच. राजाचा टू बीएचके फ्लॅट होता. साधाच, पण ठीक सजवलेला. सोफ्यासमोरच्या भिंतीवर एक मोठंसं पोस्टर होतं - ब्लॅक फॉरेस्टचं. जर्मनीमधलं घनदाट जंगल. त्यामध्ये नजर गेली, तर हरवून जायला कितीसा वेळ? सकाळ झाली. ती त्याच्याच पायाशी झोपली होती. बेडवर चढून, मुटकुळं करून. त्याला आश्चर्य वाटलं. त्यानेच तिला घरात घेतलं होतं, पण ती कधी त्याच्या बेडवर आली होती, कोणास ठाऊक! त्याने दोन अंडी उकडली. एक स्वतः खाल्लं. एक तिला दिलं. ती खूश! तो बाहेर निघाला. त्याने तिला पार्किंगपलीकडच्या हिरवळीवर सोडलं. रात्र झाली. ती वाट बघत बसली होतीच. तिच्या ठरावीक ठिकाणी. तो आला, तिला फ्लॅटवर घेऊन गेला. तिने मांजरखाद्य खाल्लं. झोपण्याआधी तो मोबाइल चेक करत होता. सोसायटीच्या ग्रूपवर मेसेज आला होता - सध्या पाण्याचं शॉर्टेज आहे. पाणी जपून वापरा आणि भरूनही ठेवा. त्याने चक् केलं आणि मान उडवली. त्याची पाण्याची गरज कमी होती , तरी त्याला आता पाणी भरून ठेवावं लागणार होतं. ठीक आहे. काही फार मोठी गोष्ट नाही, तो मनाशी म्हणाला. तो झोपला. ती पसरली तशीच फरशीवर. केव्हातरी गार लागलं, तेव्हा ती त्याच्या उबदार कुशीत शिरली होती. आणि हे रोजचंच झालं. कधी तो घरी यायचा नाही. मित्रांकडेच झोपायचा वगैरे. पण आता तो रोज घरी येऊ लागला. त्याला घरची ओढ वाटू लागली. त्या एकट्या ब्रह्मचाऱ्याला कोणीतरी होतं आता. वाट बघणारं. ती त्याची वाट बघत असायची. मग तो यायचा. तिला वर न्यायचा. खाऊ घालायचा. ती त्याच्या पायापाशी घुटमळायची. त्याच्या पायाला अंग घासायची. लाडात यायची. तिच्या संगतीत तो दिवसभराचा शीण विसरून जायचा. तो तिच्या प्रेमातच पडला जणू. तो तिला बेडवर ठेवायचा. कुरवाळायचा. तीसुद्धा मजेत असायची. एके दिवशी तो तिला म्हणाला, "शोना, तू माझ्यासारखी माणूस का नाहीस?" त्यावर ती त्याच्याकडे गोड लाडिकपणे पाहत राहिली. त्याचं ते वेड, त्याचा तो विचार वाढतच गेला. एखाद्या तरुण मुलीच्या प्रेमात पडावं, तसा तो तिच्या प्रेमात पडला. त्याने ऑफिसमध्ये हे सांगितलं असतं, तर त्याला लोकांनी वेड्यातच काढलं असतं. पण ती मांजर नव्हतीच. ती तर जणू त्याची प्रेयसीच होती. त्याला वाटायचं की ती मनुष्यरूपात अवतीर्ण का होत नाही? … तसं झालं असतं, तर त्याने तिच्याशी प्रेमाच्या गोष्टी केल्या असत्या. मिठीत घेतलं असतं. चुंबनांचा वर्षाव केला असता आणि पुढे सगळंच... त्याच्या या विचारांचा ग्राफ काही केल्या खालीच येईना. त्याचं मन सतत तिच्याबरोबरच्या 'त्या' गोष्टीचा, त्या आनंदाचा विचार करत राहायचं. नाहीतरी तो एकटाच होता. त्याला आत्तापर्यंत कोणी भेटलं नव्हतं. दोन-तीन मुलींशी मैत्री झाली होती, पण ते तेवढ्यापुरतंच. प्रत्येकाची-प्रत्येकीची सध्या जगण्या-वागण्याची तऱ्हाच वेगळी! एन्जॉय आणि स्वातंत्र्य या गोष्टींचा अतिरेक एवढा की जगणंच बाजूला पडू लागलेलं. लग्न वगैरे गोष्टींचं गांभीर्य नाहीच. ती तर त्याची सर्वार्थाने प्रेयसीच होती. फक्त ती एक गोष्ट सोडता, कारण ती माणूस नव्हती. आता मात्र तो सदोदित त्याच एका गोष्टीचा विचार करू लागला. शेवटी तरणाबांड गडी होता तो. त्याच्या तरुण शरीराचीही काही गरज होती. पण त्याचा त्याने शोधलेला पर्याय मात्र?... हे काहीतरी विचित्र होतं, पण ते तसं होतं खरं. आपल्या जगाबाहेरचं. पण हे प्रत्यक्षात कसं उतरणार होतं? एकदा त्याला उशिरा रात्री तो भेटला. राजा कार चालवत होता. एका माणसाने त्याला हात दाखवला. एखादा महाराज वगैरे असावा, तसा तो माणूस होता. तो होता फाटकाच. साधे कपडे अंगावर असलेला. पण त्याच्या डोक्यावरचे अन दाढीमिशांचे केस मात्र प्रचंड वाढलेले होते. काळे-पांढरे. त्यामुळे त्याचा बारकुडा देह आणखीनच कृश दिसत होता. त्या माणसाने राजाच्या डोळ्यांत पाहिलं मात्र - "मांजराच्या प्रेमात पडला आहेस?" त्या माणसाने धाडकन विचारलं. त्यावर हा उडालाच. त्याला भारीच आश्चर्य वाटलं. त्याने डोळे विस्फारले. त्यावर तो महाराज म्हणाला, "तिला मी मनुष्यरूपात आणू शकतो." आता मात्र हद्दच झाली होती. ह्याला हे सगळं कसं काय कळतंय? त्यात दिवस कुठले आणि हा काय अशक्य स्वरूपाच्या बाता मारतोय? राजाच्या मनात विचारांचं आवर्त घोंगावलं. महाराजाची स्वप्नं फार मोठी होती. त्याला पंचमहाभूतांवर सत्ता गाजवायची होती. त्यासाठी साधना आणि त्यासाठी वेळ पाहिजे होता.आणि पोट? ते तर मांत्रिकालाही चुकलेलं नाहीच. या सगळ्यासाठी त्याला पैसा पाहिजे होता. मांजराचा माणूस करणं हा त्याच्यासाठी एक साधा प्रयोग होता. पाच लाखाच्या बदल्यात तो हे काम करणार होता. "पाच लाख?" हा म्हणाला. मुळात त्याचा या गोष्टीवर विश्वास नव्हता. फ्रॉडचे वेगवेगळे प्रकार. त्यातलाच हा एक, असं त्याला वाटलं. पण शेवटी तो तयार झाला. त्याचं वेड शहाणपणाला भारी होतं. त्याने चान्स घ्यायचा ठरवलंच. मनीचं रूपांतर एका आकर्षक तरुणीत होणार असेल, तर... ही रक्कम कमीच आहे, त्याला वाटलं. अमावस्येच्या रात्री बारा वाजता तो मनीला घेऊन महाराजाच्या घरी गेला. ती बंगल्यांची एक शांत गल्ली होती. एक बंगला होता. जवळजवळ गल्लीच्या बंद टोकाशीच. तोही बंदच होता. फाटक लोटलेलं. अंगणात दिवा नाही. रानटी झुडपं मन मानेल तशी वाढलेली. आतमध्येही दिवे नव्हते. मागच्या बाजूच्या एका खोलीत प्रकाश असावा. ती खोली म्हणजे त्या बंगल्याचं आउटहाउस होतं. महाराजाचं घर. महाराजाने विधी करायला सुरुवात केली... राजाचं डोकं वेडंवाकडं पळत होतं. महाराजाला हे सगळं जमतं, तर तो काय काय मजा करू शकतो? काय काय मजा मारू शकतो? पण तो असं काही करेलसं वाटत नव्हतं. त्याच्या जागी आपण पाहिजे होतो, त्याला वाटलं. अर्थात, फरक तिथेच तर होता. तासाभराने तो तिथून बाहेर पडला. तेव्हा त्याच्या कुशीत एक सुंदर, उबदार तरुणी होती. त्याच्या मनीचे सगळे फीचर्स तिच्यात असलेली. नाजूक, नखरेल, नवयौवना, घाऱ्या डोळ्यांची! त्याने कार चालू केली. या क्षणाला तो अतिशय खुशीत होता. त्याने शीळ वाजवली. मध्येच त्याला एफएमची आठवण आली. त्याने कारचा रेडिओ सुरू केला. त्यावर नाट्यसंगीताच्या एका कार्यक्रमाची जाहिरात लागली होती. गाणं लागलं होतं - हा नाद सोड सोड... काय तरी एकेक योगायोग असतात! पण आता तो मागे फिरणं शक्यच नव्हतं. गडी भलत्याच नादाला लागला होता... तो घरी आला. त्याने दार लावलं. मनी बेडरूमकडे पळाली. त्याच्या डोक्यात आता फक्त एकच विचार घोळत होता. त्याने स्वतःचं आवरलं. ती बेडवर लोळत होती. कपडे काढून.. जे कपडे तिने महाराजाच्या घरी चढवले होते. एक फिकट निळ्या रंगाचा गाउन आणि इनर. राजा जातानाच ते बरोबर घेऊन गेला होता. तिला ते कपडे अंगावर नकोसे वाटत असावेत. त्याने डोळे विस्फारले. ती पालथी पडली होती. एखाद्या लाटेसारखी - गोलाकार उंचवट्यांसहित. तिच्या पाठीवर सोनेरी लव होती. मनीची आठवण करून देणारी. त्याने त्यावरून हात फिरवला. ती फिस्कारली. त्याने परत हात फिरवला. मऊसर लव होती. रेशमी. या वेळी ती चित्कारली. जीवघेणं. तो पेटला. त्याने तिला जवळ ओढलं. तीही त्याला घट्ट बिलगली. हवेत सुखद गारवा होता. कपडे अंगावर नसताना नकोसा वाटणारा, पण मिठीत तो गारवा हवासा वाटू लागला. मग त्यांनी आनंद लुटला. पुरेपूर! क्रिया तीच. त्यात वेगळं ते काय? पण हे काहीतरी विचित्र स्वरूपाचं होतं, हे नक्की. पण एक गोष्ट होती - तिच्या सगळ्या क्रिया या रानटीपणाच्या जवळ जाणाऱ्या होत्या. वाइल्ड! दोघे झोपले. रात्रभरात त्याने एकदाही डोळे उघडले नव्हते. सकाळ झाली. प्रकाशाची तिरीप पाहून त्याने डोळे उघडले. ती घरात आनंदाने फिरत होती. शेपटी फलकारत. मनी बनून. मध्यरात्र झाल्यानंतरचे दोन प्रहर काय ते, ती माणूस होऊ शकणार होती. बाकी इतर पूर्ण वेळ ती मांजरच होती. ती पूर्ण वेळासाठी माणूस नव्हती, हा तर मोठाच प्रॉब्लेम होता, पण त्याने विचार केला - समथिंग इज बेटर... दोन प्रहर तर दोन - तेवढ्यात त्यांचे दोन कहर व्हायचे! त्यांचे दिवस म्हणजे त्यांच्या रात्री मजेत सरत होत्या. दोघेही एकमेकांच्या खूप प्रेमात होते. आणि का नसावेत? तिला तो आधीपासून आवडायचा आणि आता तर ते आवडणं द्विगुणित झालं होतं. दिवसेंदिवस त्यांची देहसोहळ्याची गोडी वाढतच चालली होती. एके दिवशी रात्री त्यांचा कार्यक्रम झाला. त्याने अभावितपणे तिची मानगूट धरली. तेव्हा तिला ते फार आवडलं. मग तो गाढ झोपला. तिला काय? तिला दमणं माहीतच नव्हतं. ती जागीच होती. तिला खिडकीत कशाची तरी चाहूल लागली. खिडकीत बाहेर एक दांडगट, आगाव बोका आला होता. जाडगेलासा, भरल्या मानेचा. काळे-पांढरे केमोफ्लाजसारखे पट्टे असलेला. कुठून तिथे पोहोचला होता? कोणास ठाऊक? अर्थात इमारतीची रचना तशी होती खरी. त्यामुळे तिथे तो पोहोचू शकत होता. तो विशिष्ट आवाजात ओरडला. तो आवाज म्हणजे मादीला साद होती. कामविव्हल साद! कारण त्याला माजावर आलेल्या मांजराचा वास आला होता. पण ते सालं मांजर कुठं दिसत नव्हतं त्याला. त्यामुळे तो बावचळला होता. वाऱ्यावर तो वास पसरतच चालला होता. भावना चाळवणारा. प्राण्यांना वास तर पटकन येतात. त्यात तो उग्र वास. ती बेडवर बसली होती. तिने त्या बोक्याला बोलवलं, तर तो धीटपणे जवळ आला. त्याने तिच्या अंगाचा वास घेतला. तो वास जवळ आला होता. पण काहीतरी चुकत होतं. तो आणखी बावचळला. तो पुन्हा ओरडला. त्या आवाजाने ती घायाळ झाली. तिला कसंतरी झालं. तिच्या आदिम प्रेरणा आत कुठेतरी जाग्या झाल्या, पण ती मनुष्यरूपात होती. थोड्या वेळाने तो बोका गेला, तेव्हा ती पुन्हा मार्जाररूपात गेली. दुसऱ्या दिवशी तो बोका पुन्हा आला. त्या वेळेला ती मांजर होती. कालच्यासारखाच पुन्हा तो विशिष्ट आवाजात ओरडला. हिनेदेखील त्याला साथ दिली. ती खिडकीतून बाहेर गेली. त्यांना त्यांची ओळख पटली. त्यांच्या अंतःप्रेरणांची त्यांना जाणीव झाली. त्याने जंगलीपणे तिची मानगूट धरली. आणि मग त्यांचा कार्यक्रम सुरू झाला. बाहेर अशोकाची पानं सळसळली. थोड्या वेळाने बोक्याची सळसळ थांबली. तो बाजूला झाला. ती खूश! हे काहीतरी वेगळं होतं. रासवट! वाइल्ड! आणि असं रोजच होऊ लागलं. आधी राजा, मग बोकोबा. मनीची डबल धमाल चालू झाली. पण पुढे प्रॉब्लेम झाला. तिचं मानवी रूप, राजाबरोबर येणारे तिचे रोजचे संबंध या गोष्टी बोकोबाच्या लक्षात आल्या. या गोष्टीवरून तो सारखा मनीचं डोकं खाऊ लागला. तिच्याशी भांडू लागला. तो राजाचा दुस्वास करू लागला. त्याच्या त्या विचारांचा ग्राफ काही केल्या खालीच जाईना. तो वरच जाऊ लागला. या बाबतीत तो जणू काही माणूसच होता. पण मनीला मनुष्यरूपात जास्त मजा येत होती. प्राणिरूपात तोच व्यवहार म्हणजे उरकल्यासारखं वाटायचं. तिला वाटायचं - हे बोक्याला का कळत नाही? हे एक रहस्यच होतं. शेवटी तिला कळलं की त्यासाठी बोका पुरुषरूपात यायला हवा. जसं राजाला तिच्याबद्दल आधी वाटत होतं, अगदी तसंच तिला बोक्याबद्दल वाटू लागलं. काय करता येईल? तिचं मन विचार करू लागलं. शेवटी मनी त्याला घेऊन महाराजांकडे गेली. त्यालाही मनुष्यरूप धारण करता येण्यासाठी... अर्थात ती स्वतः मनुष्यरूपात असतानाच. आणि पैसे? अर्थातच राजाचे पैसे लंपास होणार होते. बोकोबा त्याला रीतसर लुटणार होता. मनुष्यरूपात गेल्यावर. महाराजाने विधी केले. झालं. बोकोबालाही मनुष्यरूप धारण करण्याची युगत गवसली. तो कधी त्या रूपात, तर कधी मांजररूपात मनीचा उपभोग घेऊ लागला. दोघे खूश! मनुष्यरूपात तो एक बलदंड तरुण व्हायचा. पण बोक्या मांजररूपात असताना मनीला जास्त मजा येत होती. कदाचित ते त्यांचं मूळ असावं शेवटी. निसर्गनियमबद्ध. राजापेक्षा जास्त सुख देणारं. वाइल्ड! बोका मनुष्यरूपात आल्यावर जास्त मजा येईल असं तिला वाटलं होतं. पण तिचा तो अंदाज चुकला होता. एके दिवशी मध्यरात्री राजाला जाग आली, तेव्हा त्या दोघांचा मांजररूपात कार्यक्रम चालू होता. बोकोबा पटकन थांबला. बाजूला झाला. झोप मोडलेल्या राजाला काही कळलं नाही. त्याला फक्त असं वाटलं की घरामध्ये आणखी एक मांजर फिरतंय म्हणून, भास होत असेल म्हणून त्याने कूस बदलली आणि तो झोपला. बोका खूप नाराज झाला. राजाने त्याला व्यत्यय आणला होता. अन तो? त्याने आत्तापर्यंत राजाला कधी व्यत्यय आणला नव्हता. त्याच्या मनातली चीड आणखीच वाढली. राजाच्या रात्री मजेत चालल्या होत्या. त्यानंतर बरेच दिवसांनी - वॉचमन म्हणाला की त्याने बऱ्याच दिवसांत राजासाबला पाहिलं नाही. ते कुठे जातानाही दिसले नाहीत. त्यांची गाडीही एका जागेवरच उभी आहे. बरीच चर्चा झाली, तेव्हा पोलिसांना बोलावण्यात आलं. दाराला कुलूप नव्हतंच. ते आतून बंद होतं. पोलिसांनी दार तोडलं. आतमध्ये एक उग्र वास येत होता. तीव्र दुर्गंध. नकोसा, अती नकोसा! कुठून ते कळत नव्हतं. राजा कुठेही दिसत नव्हता. पोलिसांनी सगळीकडे शोधण्याची सुरुवात केली. ते बाथरूममध्ये पोहोचले. तिथे एक मोठा निळा ड्रम होता पाण्याचा. राजाने खास पाणी साठवण्यासाठी आणलेला. घट्ट झाकण लावून बंद केलेला. पण त्यामध्ये आता पाणी नव्हतं, तर त्यामध्ये राजा तुकड्यातुकड्यात विसावला होता. लोकांचे हात नाकावर गेले. त्याहीपेक्षा जास्त म्हणजे सगळ्यांना प्रचंड धक्का बसला होता. राजा मेला होता. त्याची हत्या करण्यात आली होती. नंतर सोसायटीचं सीसी टीव्ही फूटेज तपासण्यात आलं. त्यामध्ये राजा कुठे जाताना दिसला नाही किंवा कोणी अनोळखी माणूस येताना दिसला नाही. राजाचे जे काही ठरवीक मित्र यायचे, तेही येताना काही दिसले नाहीत. पण हे सगळं नंतरचं. जेव्हा पोलिसांचं काम चालू होतं, त्या वेळी खिडकीमध्ये मनी आणि बोकोबा बसले होते. वॉचमनला राजाचं मनीप्रेम माहिती होतं. त्याला वाटत होतं की राजा गेला - आता मनी काय करणार? पण मनी आणि बोकोबा मस्त मजेत बसून, रुबाबात शेपटी फलकारत होते. एवढं मोठं कांड त्यांनी केलं होतं, पण पोलिसांची संशयाची सुई त्यांच्याकडे कधीही वळू शकणार नव्हती. राजाची हत्या करणारे गुन्हेगार त्यांच्या तावडीत कधीच येणार नव्हते. विधी करण्यापूर्वी महाराजाने बोक्याच्या डोक्यांत पाहिलं होतं, त्या वेळी तो चमकला होता पण त्याला त्याच्या स्वतःसाठी फक्त पैसे हवे होते. पुढच्या बऱ्यावाईटाशी त्याला काहीच घेणंदेणं नव्हतं. जेव्हा राजाची हत्या करायची होती, तेव्हा त्या दोघांनी साहजिकच मनुष्यरूप धारण केलं होतं. त्याशिवाय ते शक्यच नव्हतं! पण आता ते मनुष्यरूप हवेत जणू विरून गेलं होतं. बोका मनीला म्हणाला होता, "आता आपल्याला त्या भंगार मनुष्यरूपाची काही आवश्यकता नाही. आपला प्राणिजन्मच ठीक आहे." मनीलाही नीटसं ठरवता येत नव्हतं - मांजररूप की माणूसरूप? तिला वाटलं, प्राणी हे रानटी असतात. आणि माणसंही; पण माणसं त्या रानटीपणाला घातक विचारांची जोड देतात. त्यामुळेच तर माणूसरूपात त्यांची डोकी अतिघातक रूपात चालली होती. त्यांनी इतका मोठा गुन्हा सहजी पार पाडला होता. माणसं दर दिवशी अशा गोष्टी करताहेत, हे तिला माहीत नव्हतं. ते तिला कळलं असतं, तर तिला अपार खिन्नता आली असती. मनुष्यरूपाची किळस आली असती. मनुष्यरूपात गेलो नसतो, तर कदाचित राजाला आपण मारलंही नसतं, मनीला असंही वाटलं. तिने ठरवून टाकलं - आपलं मांजररूपच बरं आहे. आत्ता खिडकीत बसून माणसांकडे पाहताना त्यांच्या नजरेत भीतीही नव्हती आणि पश्चात्तापही. माणसं भावनाशून्य होऊ शकतात, मग प्राण्यांकडे भावना कितीशा? मनीची नजर ड्रमकडे रोखलेली होती. राजा जिवंत असता, त्याने मनीची ती थंड नजर पाहिली असती, तर त्याला मात्र तिच्यावरच्या प्रेमाचा पश्चात्ताप झाला असता. समोर ब्लॅक फॉरेस्टचं पोस्टर निश्चल होतं. ब्लॅक हे नुसतं नाव आहे त्या हिरव्यागार जंगलाचं. पण माणसाचं आयुष्य मात्र - काळ्या जंगलात हरवून जाण्यासारखंच आहे! पावलापावलाला काय धोके असतील याचा अंदाज न येणारं, कोण जिवाचे लचके तोडायला टपून बसलं आहे हे कधीच लक्षात न येणारं. कोण आपलं, कोण परकं? या जटिल कोड्याचा उलगडा न होणारं… एका गुलाबी प्रेमाचा शेवट एका निळ्या ड्रममध्ये झाला होता, एवढं मात्र खरं. ----------------------------------------------------------------------------------------------------------- BIPIN SANGLE

वाचन 3076 प्रतिक्रिया 0