एंड्युरो ३
लेखनप्रकार
जिममधे विकास सरांनी विचारेपर्यन्त "एन्ड्युरो३" स्पर्धेमधे भाग घेइन असं कधी वाटलच नव्हतं. एन्ड्युरो३ विषयी खूप ऐकुन होतो. गेले ८-१० महिने निखिल शहा आणि पुणे रनिंग ग्रुपमुळे धावण्याची आवड निर्माण झाली होती. स्टॅमिनाही बर्यापैकी वाढला होता. या ग्रुपची ओळखही विकासनीच करुन दिली होती. तेव्हापासुन १० वेळातरी अर्धमॅरॅथॉन (२१किमी) धावलो होतो. एकदा मॅरॅथॉन आयोजनाचा अनुभवही घेतला होता.
निखिल सायकलिंग्,रनिंग, ट्रेकींगमध्ये खूपच माहीर आहे. बर्याच स्पर्धा त्याने जिंकल्याही आहेत. पण त्याचे खरे वेड आहे ते या सगळ्या गोष्टींच इतरांना वेड लावण्यात. त्यातूनच त्याने "लाईफ सायकल"च्या उल्हास जोशींच्या मदतीने त्याने एक माहीतीसत्र आयोजित केलं होतं. त्यात हौशी लोकांसाठी सायकलविषयी माहिती, त्यानी सायकलवर लेह्,लडाख पर्यंत केलेली भ्रमंती अशी माहिती देउन सायकलविषयी उत्साह निर्माण केला. त्यानंतर १०-१५ दिवसात मी सायकल घेतलीही!
त्यानंतर सायकलवर पुण्यात रस्त्यावर कींवा फारतर टेकड्यांवर जाण्यापलिकडे सायकलचा फार वापर झाला नव्हता. तसंच जानेवारीत मुंबई मॅरॅथॉनला ग्रुपमधल्या बर्याच जणांनी, अगदी ६५वर्षाच्या जुगल राठींनीदेखिल मॅरॅथॉन(४२किमी) पूर्ण केल्याने आणि तयारीअभावी मी त्यात भाग न घेतल्याने चुकचुकत होतच. त्यामुळे "एन्ड्युरो३" विषयी विकासने विचारताच ताबड्तोब होकार दिला. बाकी दोघे कोण आहेत हेही न विचारता.
त्याच संध्याकाळी फोनाफोनी करुन तिघेही भेटलो. सचिन केळकर, अनिरुद्ध करमरकर आणि मी अशी टीम ठरली. काही वर्षे जिमला जात असल्यामुळे फक्त चेहेर्याने एकमेकांना ओळखतं होतो.
त्यात फक्त सचिनचा सायकलिंगचा अनुभव दांडगा. (त्याने २ वर्षांपूर्वी सायकलवरून कन्याकुमारीपर्यंत दौरासुद्धा केलेला आहे.) माझा २ महिन्याचा किरकोळ सायकलिंगचा तर अनिरुद्धचा त्याहूनही कमी. पण आत्मविश्वासाच्या जोरावर "कॉर्पोरेट" गटात उतरायच ठरवलं. त्यात ७५किमी सायकलिंग, २५किमी ट्रेकिंग आणि ५०० मी. रिव्हर क्रॉसिंग कराव लागणार होत. "हौशी" गटाला अंतर याच्या दिडपट तर "खुल्या" गटाला अंतर दुप्पट होतं.
२ दिवसात फॉर्म वगैरे भरुन शिक्कामोर्तब केलं. पण अजुन तयारीविषयी बोंबच होती. कागदपत्र देण्याघेण्यापलिकडे आम्ही भेटलोही नव्हतो. मग सचिननेच तयारीसाठी पानशेतला जाउन येउ असं ठरवलं मीही पटकन हो म्हटलं. तेव्हा अनिरुद्ध येउ शकला नाही. मी, सचिन आणि दुसरा एक मित्र पहाटे निघून पानशेतपर्यंत ठरवल्याप्रमाणे जाउन आलो. ८०किमी अंतर ५ तासांच्या आत विशेष परिश्रमाशिवाय पार केल्याने आणि मधले जवळजवळ सगळे चढाव सहजरित्या पार केल्याने आत्मविश्वास वाढला. सचिनने तर संध्याकाळी लगेच कात्रज - सिंहगड ट्रेकही करुन जवळजवळ पूर्व परीक्षाच देउन टाकली. मी मात्र दुसर्यादिवशी लवासाला एका सायकलिंग स्पर्धेला जायचे असल्यामुळे कात्रज - सिंहगड ट्रेक स्किप केला. लवासाच्या घाटातही प्रचंड चढावांचा आणि वळणांचा अनुभव मिळाला. त्यामुळे आमच्या दोघांचीही तयारी बर्यापैकी होती. आता एकच आठवडा बाकी राहील्याने वीक डे लाच तिघांनी एकत्र सराव करणे भाग होतं. शेवटी स्पर्धेआधी २ दिवस एकदा ए आर् ए आय टेकडीवर जाउन आलो हाच काय तो आमचा एकत्र केलेला सराव. सरावात कमी असलो तरी पण कशाही परिस्थितीत पूर्ण स्पर्धा करायचीच यावर तिघंही ठाम होतो.
शेवटी स्पर्धेचा दिवस आला. सकाळी ७:३०ला कटारिया हायस्कूलला रिपोर्टिंग. राज ठाकरेंच्या हस्ते ९:०० ला फ्लॅग ऑफ मग म्हात्रे पूलापर्यंत अशी सेरेमॉनिअल राइड. तिथुन मात्र प्रत्येकाने आपआपली व्यवस्था करुन पानशेत बोटिंगला दुपारी १२:३० पर्यंत पोहोचायचं होतं. जिथुन मुख्य स्पर्धेला सुरुवात होणार होती.
म्हात्रे पुलापासुन माझे घर जवळ असल्याने तिघेही माझ्याघरी जमलो. आता नाष्टा करून सायकली माझ्याच सफारीत मागे टाकून निघायचं असं ठरवलं होतं.. तिथपासूनच संकटाना सुरुवात झाली. सफारीत मागच्या सीट्स आडव्या पाडून २ सायकली गेल्याच आठवड्यात लवासाला नेल्या असल्याने मी निश्चिंत होतो पण आता ३ सायकली होत्या. अचानक सायकली नेहेमीपेक्षा उंच, लांब, रुंद दिसु लागल्या आत घुसवताना त्रास होउ लागला, आत गेल्या तर दरवाजा बंद होइना. आणि मुख्य म्हणजे १२:३० ला पोहोचणे कठीण वाटू लागले. सचिनने पट्कन माहितीतली एक टाटाची पिक अप मागवली.. पिक अप ने भराभर निघालो पण सायकलींसह मागे खटार्यात बसून माझा आणि सचिनचा एंड्युरोचा थरार आधीच सुरु झाला. जेमतेम अगदी २ मिनिटे आधी पोहोचलो आणि हुश्शss झालं.
आता सामान पाठीवर मारण्याची धांदल सुरु झाली. त्या दोघांनीही हॅवरसॅक बरोबर स्लीपिंग बॅगही घेतलेली. मी मात्र दगडावरही झोपायची तयारी ठेवून कमीत कमी सामान घेतलं होतं. तो निर्णय फारच योग्य ठरला होता. शेवटी माझ्या सॅकमध्ये त्यांचं थोडं थोडं सामान कोंबून तयार झालो. १०-१२ च्या गटागटाने फ्लॅग-ऑफ करत होते. आमचं १२:४५ ला फ्लॅग-ऑफ झालं.
पहील्या अर्ध्या-एक तासातच पहिला फटका बसला. दुपारच रणरणतं उन आणि सुरुवातीचाच मोठा चढाव यामुळे अनिरुद्धच्या पायात गोळे आले. आम्हाला वाटलं सायकल हळू हळू चालवत राहील पण तो सगळं सामान ठेवून बसलाच. आता पाणी, इलेक्ट्रल पावडर, वोलिनी स्प्रे चा मारा सुरु झाला. पण लागायचा तेवढा वेळ द्यावा लागतोच. ते झाल्यावर हळूहळू पुढे निघालो. पुढे ४-५ तास उन, चढाव, क्रँप्स आणि थांबणे चालू होते. आम्ही आता सायकल ठेवून ट्रेकींग कुठे सुरु होते त्याची वाट पाहू लागलो. कारण काही काही चढावावर चालावेच लागत होते. आणि सायकलचे ओझे वाटू लागले होते. आणि तिघात जास्त अंतर ठेवूनही चालणार नव्हते कारण शेवटी सांघिक कामगिरी महत्वाची होती. नियमही तसेच कडक होते. तिघेही दिसल्याशिवाय "टाइम कार्ड" वर एंट्री होणार नव्हती.
बाकी सगळेच संघ फक्त पुढे जाताना दिसत होते. आम्ही कुणालाच मागे टाकत नव्हतो.
आत्तापर्यंत रस्तातरी डांबरी होता आता पुढचा रस्ता बघुन तर आणखीनच कठीण अवस्था होणार होती. चढाव सोडा सरळ भागात देखिल सायकल हातातूनच न्यावी लागणार होती. त्यात पाणी संपत आलेले. आणि आयोजकांनी म्हटल्याप्रमाणे पाणी अथवा आणखी काहीही विकत घ्यायला दुकान अथवा काही मिळणे निव्वळ दुरापास्त !! आता अंधारही पडु लागला होता. वेग आणखी मंदावलेला. तसच स्वतःला आणि सायकलला ढकलत गरजाईवाडीच्या टाइम कन्ट्रोलला पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे ६:३० वाजले होते. अंतर कापलं होतं फक्त ३४किमी. आता इथे सायकल ठेवून ट्रेक होता. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे इथे काही घरं होती आणि त्यांच्याकडे पाणीही होतं.
जबरदस्त भूक लगलेली. सॅकमधलं खाणं जे हाताला पहिल मिळेल तसं खाउन घेतलं. अधाशासारखं पाणी पिउन आणि भरुन घेतलं. त्या १०-२० घराच्या गावातल्या लोकांना रोजचं पाणी आणायला ५ किमी लांब जावं लागतं रोज त्याच भयाण रस्त्यानं!! पाणी सांभाळून वापरण्याचं महत्व समजायची याहून चांगली जागा आणि परिस्थिती सापडणे कठीण आहे. इच्छा असुनही तोंड, हातपाय धुणं टाळलं.
१०-१५ मिनिटं बसुन ट्रेकला निघालो. नंतर थंडी असेल म्हणून तिघांनीही जॅकेट्स घातली. काही संघ परतीच्या वाटेवर होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार २ तास जायला आणि अडिच तास यायला लागणार होते. पायवाटच होती आणि पूर्ण डोंगर उतारावरून कोकणात उतरायचं होतं. आता मिट्टं काळोख होत होता. बरोबर अमावस्या शोधुन काढली होती. बरोबर २-३ इतर संघही होते. बरोबरच जायच ठरवलं. ज्यायोगे रस्ता चुकायची शक्यता कमी होईल. पण घोळ झालाच. थोड्याच वेळात सगळ्यांना समजले हा रस्ता पुढे कुठेच जात नाही. बराच वेळ सगळे गोल गोल फिरत राहिलो. कंपास, जीपिएस कशाचाही उपयोग होइना. जोरजोराने मार्शल्सना हाका मारून बघितल्या पण काही उपयोग नाही. ३०-४० मिनिटे फुकट गेल्यावर परत येणारी एक टीम लांबवर दिसल्यामुळे तिढा सुटला. तोवर आणखी एक मोठा घोळ झाला होता. येताना थंडीसाठी घातलेल्या जॅकेट्मुळे गरम होउ लागले होते. म्हणून वाटेतच सचिनने जॅकेट काढले. तेव्हा खाली ठेवलेला वेस्ट पाउच तिथेच राहिला. त्यात फोन, पैसे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीनही सायकलला एकत्र लावलेल्या लॉकची चावी होती. पुढेही १-२ वेळा रस्ता चुकला पण जास्त वेळ न जाता परत मार्गावर येउ शकलो. शेवटी सांडशी गावातल्या टाइम कन्ट्रोलला पोहोचलो तेव्हा रात्रीचे ९:५० वाजले होते. सांडशी गाव रायगडापासून साधारण ९ किमी वर आहे. दिवसा तिथून रायगड स्पष्ट दिसतो. पोहोचल्यावर सर्वात आनंदाची बातमी मिळाली ती म्हणजे एका परत जाणार्या एका टीमला हरवलेला पाउच मिळाला होता आणि त्यांनी तो गरजाईवाडीच्या मार्शल्सकडे सुपूर्त केला होता असं सांडशीतल्या मार्शल्सनी सांगितलं. तिथे थोडावेळ बसुन परत निघालो. आता पूर्ण डोंगर चढायचा होता. वेग फारच मंदावला होता. पायाचे तुकडे पडले होते. २-२ मिनिटाला तहान लागत होती. परत पाणी संपत आले होते आणि सांडशीत गावकरी झोपल्यामुळे पाणी भरुन घेणे जमले नव्हते. वाटेतले मार्शल्स वेळेकडून प्रचंड दिशाभूल करत. त्यांची शेवटची १० मिनिटं तासभर येत नव्हती. शेवटी रात्री १:३० ला परत गरजाईवाडीला पोहोचलो. इथे बर्याच टीम येउन झोपल्या होत्या. आम्ही पहिला पाउच ताब्यात घेतला. इथले गावकरी जागे होते आणि आता पाणी १०रु बाटलीप्रमाणे विकत होते. निमुटपणे सर्व बाटल्याभरुन पाणी विकत घेतलं. झोपण्याचा विचार करणार तेवढ्यात मार्शल्स म्हणाले इथे झोपलात तर टाईम कार्ड काढून घेतल जाईल. स्पर्धा वेळेत संपवण्यासाठी ते सर्वांनाच तिथुन ढकलायचा प्रयत्न करत होते. शिवाय पुढच्या ठाणगाव कँपपासून पुढे रेस सकाळी ६:०० नंतरच सुरु होणार होती. तिथे त्यापूर्वी पोहोचल्यास विश्रांतीही मिळणार होती आणि डेड टाईमही. म्हणून लगेचच सायकल घेउन पुढे निघायच ठरवलं. अनिरुद्धला बरच कन्व्हिन्स केलं. तो इथे झोपण्याच्या अटीवर इथपर्यंत आला होता. शेवटी तो तयार झाला आणि आम्ही रात्री२:०० ला पुढे निघालो. तास दिडतासावर डांबरी रस्ता मिळणार हीदेखिल पर्वणीच होती. सायकल ढकलत ढकलत जाताना हौशी गटातील एक टीम झूमकन पुढे निघून गेली.. अपेक्षेप्रमाणे ते पहिल्या क्रमांकावर होते..
थोड्याच वेळात डांबरी रस्त्यावर पोहोचलो मुख्य चढाव पार केला पण अंधारामुळे उतारावरदेखिल जास्त वेग मिळत नव्हता. फाट्यावरून परतीच्या रस्त्यावर लागणार आणि मग ठाणगावला पोहोचून मग झोप !! तेवढ्यात पुन्हा एकदा डांबरी रस्ता गायब झाला आणि सायकलवरून पायउतार !! हळूहळू पहाट होउ लागली.. दिसु लागले. यात एक गोष्ट चागली होती की अनिरुद्ध थांबत नव्हता वेग कमी असला तरी चालत रहात होता. दुपारपेक्षा खूपच प्रगती होती. सकाळी उजाडल्यावर सगळ्यानीच जरा धीर करुन वाईट रस्त्यावरही सायकल चालवायला सुरुवात केली. थोडा वेग मिळत गेला. पण ठाणगाव येईपर्यंत ९:०० वाजले होते. इथे रिव्हर क्रॉसिंग करून मग पूर्ण डांबरी रस्त्यावर शेवटचे २८किमी बाकी होते. मधे बर्याच टीमनी स्पर्धा सोडुन दिली होती. बर्याच जणांच्या सायकल पंक्चर, चेन तुटणे वगैरे होउनही जोशात पुढे चालले होते. माझी सायकलची चेन १-२ वेळा पडली होती पण विशेष श्रम आणि वेळ वाया न जाता काम झाले होते. नशिबाने रिव्हर क्रॉसिंग टिममधल्या एकानेच करायचे होते. त्यामुळे आम्ही सुस्कारा सोडला कारण अनिरुद्धला पाण्याची भिती होती. इथे सचिनने स्विमिंगचे कपडे आणले असल्याने तो पटकन पोहुनच रीव्हर क्रॉस करुन आला. तिथे परत उरलेलं खाणं खाउन आणि पाणी पिउन.. हो इथे मुबलक पाणी होतं. पुढे निघालो.
आम्ही ३० किमी कमितकमी २ तासात करायचे ठरवून १०:१५ ला निघालो. परत चढाव, सायकल हातात, एकमेकांना मोटिव्हेट करत चालू लागलो.. आता परत उन वाढायला लागलं होतं. पानशेतच्या धरणाची भिंत दिसु लागली. त्याच्यापलिकडे "फिनिश-पॉइंट" होता. पण परत रस्ता दूर जाउन दिसेनासा होई. नेहेमीप्रमाणे शेवटचे ४-५ किमी संपता संपेनात. शेवटच्या उतारावर मात्र सायकलिंगचा आनंद घेत भराभर जाउन फिनिश पॉइंटला थांबायचं ठरलं. सचिन पुढे दिसेनासा झाला आणि अनिरुद्ध मागे. पण जात राहीलो. फिनिश पॉइंटला सचिन ५ मिनिट वाट बघत होता. पण टाइम कार्डसाठी अनिरुद्ध येणे गरजेचे होते. सहज चौकशी केली असता अस समजलं की आमच्या गटात आम्ही चक्क ८वे पोहोचलो होतो. एकंदरीत ३५ टीम्स होत्या गटात. बर्याच जणांनी मध्येच स्पर्धा सोडुन दिली होती .. काही टीम्स झोपल्यामुळे अजुन मागे होत्या..
चिंता वाढायच्या आतच अनिरुद्ध दिसला .. आणि सर्वात आधी त्याचे अभिनंदन केले. एवढे सगळे होत असताना क्रँप्सने बेजार होउनही एकदाही त्याच्या मनात स्पर्धा सोडण्याचा विचार आला नव्हता जे आमच्या यशस्वीपणे स्पर्धा संपवण्यात सर्वात महत्वाचे होते. टाईम कार्डवर १:०९ शेवटची वेळ पडली. बरोबर २४ तास २४ मिनिटे झाली होती. एकही मिनिट झोप न घेता सतत इतका वेळ आपण चालत आहोत याची जाणीव झाली. परत येताना गाडीत दोघही बोलता बोलता देखिल झोपत होते.
बर्याच गोष्टी शिकलो होतो गेल्या २४ तासात. टीमने एकत्र सराव करणे, सराव प्रत्यक्ष स्पर्धेसारख्या वातावरणात करणे उदा. उन्हात/ काळोखात सराव, तितक्याच वजनाचे आकारचे सामान घेउन सराव करणे. अगदी सायकल्स गाडीत भरणेसुद्धा. :-)
पूर्ण केल्याचे समाधान होतेच आणि पुढच्यावर्षी सुधारणेला किती वाव आहे याची जाणीवही!!
:)
एक वारी भाग घेतल्या गेल्या आहे या स्पर्धेत. बाबासाहेब पुरंदरेंचे चिरंजीवही संयोजनात होते त्या वेळेस. शारीरीक कश्टाची विषेश तमा नसल्याने स्पर्धा ठिकठाक पुर्ण झाली. पण सालं ते एन.डि.ए की कसलं मिल्टरी स्कुलच्या गाप्ट्यांम्होरं कोनाचाच टिकाव न्हाइ लागल्या. तेच जिंकु राय्लेन नेमी ? या टाइमास कोन जिंक्ल ?
मिलिटरी किंवा तत्सम लोकांना
मिलिटरी किंवा तत्सम लोकांना फक्त "ओपन" गटात भाग घेता येतो.
यावेळचे विजेते त्यांच्यापैकी नसून आगाशे महाविद्यालयातील आहेत.
अभिनंदन! आता एकदा उतरलात ना
अभिनंदन! आता एकदा उतरलात ना मैदानात आता सोडु नका. असेच भाग घेत रहा.
मस्त लिहिलंय, या बद्दल नुसतं
मस्त लिहिलंय, या बद्दल नुसतं पेपरातच वाचतोय, असं कुणा भाग घेतलेल्या कडुन वाचायला मिळालं अन अरं वाटलं.
+१०००००००००००००.
+१०००००००००००००.
प्रत्यक्षदर्शीचे लेखन लैच भारी. एकच नंबर!!!
गट खूप होते.. आम्ही
गट खूप होते.. आम्ही "कॉर्पोरेट ऑल मेन" गटात होतो. यात ३५ टीम्स होत्या.
ओपन , अॅमॅचुअर, कॉर्पोरेट, आयटी, कॉलेजिअन, मेडीआ, डॉक्टर, टीचर, फॅमिली, ४०+, ज्युनिअर अशा सगळ्या मिळून १८० टीम्स होत्या.
पुढच्या स्पर्धेत नक्की भाग
पुढच्या स्पर्धेत नक्की भाग घेणार आहे.
पैजारबुवा,
सप्रेबुवा भारीच आहे. मला तरी
सप्रेबुवा भारीच आहे. मला तरी यामध्ये इंटरेस्ट आहे. सध्या तरी मी फक्त हौस म्हणून रोज २२ किमीपर्यंत सायकल पळवतो आणि तेही ऑफिसमध्ये लवकर जाता यावे म्हणून.
- पिंगू