गुजरात विधानसभा निवडणुक अंदाजांचे मॉडेल
नमस्कार मंडळी,
डिसेंबर महिन्यात गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होईल आणि २० डिसेंबरला मतमोजणी होईल.मी गेले कित्येक वर्षे म्हणजे १९८९ च्या लोकसभा निवडणुकीपासून निवडणुकींच्या राजकारणात रस घेतला आहे. दरम्यानच्या काळात माझा राजकारणातला इंटरेस्ट बराच कमी झाला तरी इतक्या वर्षांपासूनची सवय अशी सहजासहजी जात नाही. त्यामुळे निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नक्की निकाल कसे लागतील याचा अंदाज बांधणे हा माझा अगदी आवडता खेळ आहे.कधी माझे अंदाज बरोबर येतात तर कधी चुकतात. २००९ च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर लगेचच मी मिसळपाववर माझे अंदाज जाहिर केले होते ( उत्तर भारत , पश्चिम भारत , दक्षिण भारत आणि पूर्व भारत ) आणि नंतर ते कितपत बरोबर होते याचा परामर्शही घेतला होता. यापैकी पंजाब, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक,मध्य प्रदेश,केरळ,हिमाचल प्रदेश यासारख्या काही राज्यांमध्ये अंदाज जवळपास अचूक होते तर बिहार,छत्तिसगड,गुजरात,महाराष्ट्र (मुंबई सोडून इतर महाराष्ट्र),झारखंड,आसाम यासारख्या राज्यांविषयीचे माझे अंदाज तितके बरोबर नव्हते पण निकालांचा कल बऱ्याच अंशी बरोबर ओळखता आला होता.असो.
आता गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये नक्की निकाल कसे लागतील याविषयीचा माझा अंदाज मिसळपाववर प्रसिध्द करायची वेळ आली आहे.यापूर्वीचे माझे अंदाज म्हणजे गेस्टीमेशन होते. राजकीय परिस्थिती बघून विविध राज्यांमध्ये नक्की निकाल कसे लागतील याविषयीचे माझे एका अर्थी इंट्यूशन होते.मागच्या निवडणुका हा संदर्भ घेऊन मागच्या निवडणुकांनंतर परिस्थिती किती आणि कशी बदलली आहे हा सब्जेक्टिव्ह कॉल घेऊन त्या आधारे यावेळी निकाल कसे लागतील याविषयीचे माझे आडाखे असे या अंदाजांचे स्वरूप होते.त्यासाठी कोणत्याही आकडेवारीचा अंतर्भाव केलेला नव्हता. आता गुजरात निवडणुकांच्या निकालांच्या अंदाजासाठी ही त्रुटी भरून काढायचा प्रयत्न आहे. माझी नक्की पध्दत याच लेखात पुढे लिहिणारच आहे.पण तरीही एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे या प्रकारचे विश्लेषण मी प्रथमच करत असल्यामुळे ही पध्दत कितपत योग्य/अयोग्य याविषयी मला याक्षणी काहीही माहिती नाही.यात अनेक त्रुटी असतीलही/ असतीलच. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल आणि माझे अंदाज यात ०% ते १००% मधील कितीही तफावत असू शकेल.
माझी पध्दत पुढीलप्रमाणे:
१. केंद्रीय निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर जुन्या निवडणुक निकालांच्या पी.डी.एफ फाईल्स उपलब्ध आहेत.त्या सर्वप्रथम मी डाऊनलोड केल्या.अनेक खटपटी करून तो सगळा विदा मी एक्सेल शीटमध्ये घेतला. एक्सेल शीटमध्ये १९८०,१९८५,१९९०,१९९५,१९९८,२००२ आणि २००७ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल घेतले.त्याचप्रमाणे १९९९,२००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांचे विधानसभा मतदारसंघनिहाय निकालही निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.१९८० पासून सुरवात का केली याचे महत्वाचे कारण म्हणजे १९७७ ते २००७ या ३० वर्षांच्या काळात मतदारसंघांच्या भौगोलिक सीमा बदलल्या नव्हत्या.त्या अर्थी मग १९७७ च्या निवडणुकांपासून सुरवात करायला हवी. पण १९७७ चे निकाल हे आणीबाणीमुळे एकूणच ट्रेंडपेक्षा विरूध्द असलेले अपवादात्मक निकाल होते.त्यामुळे सुरवात १९७७ पासून न करता १९८० पासून केली आहे.
पूर्ण प्रक्रियेत ही सर्वात वेळखाऊ आणि किचकट पायरी आहे.अजूनही २००९ च्या लोकसभा निवडणुकांचे विधानसभा मतदारसंघनिहाय निकाल एक्सेल शीटमध्ये पूर्ण घेऊन झालेले नाहीत.ते काम या विकांतापर्यंत पूर्ण व्हायला हवे.
२. एक्सेलमध्ये पीव्होट टेबल नावाचे एक खूप चांगले टूल उपलब्ध आहे.त्याचा वापर करून १९८० ते २००७ दरम्यान राज्यात, राज्याच्या विविध विभागांमध्ये, लोकसभा मतदारसंघांमध्ये आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये मतांची टक्केवारी कळेलच. उदाहरणार्थ गुजरात राज्यात १९८० ते २००७ दरम्यान विविध पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी कशी बदलली हे पुढील आकृतीत कळेलच. या आकृतीत १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकांच्या आकडेवारीचा समावेश आहे. तसेच लहान पक्षांचा समावेश केलेला नाही त्यामुळे आकृतीत दिलेल्या पक्षांच्या टक्केवारीची बेरीज १००% होणार नाही.(लहान पक्षांची टक्केवारी दाखविणारे कॉलम एक्सेल शीटमध्ये हाईड केले आहेत.) या आकृतीवरून खालील अनुमाने काढता येतील:
i. १९८० च्या निवडणुकांच्या तुलनेत १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची ४.५२% तर भाजपची ०.९७% मते वाढली. या पक्षांची मते वाढली तर जनता पक्षाची ३.६५% तर अपक्षांची ०.६०% मते कमी झाली. कॉंग्रेस पक्षाला ४.५२% मते जास्त मिळाली. आता ही मते कुठून आली असावीत? यशवंतराव चव्हाण, बलीराम भगत, किशोरचंद्र देव इत्यांदींनी १९७८ मध्ये इंदिरा गांधींच्या कॉंग्रेस पक्षापासून फारकत घेऊन स्वत:चा पक्ष काढला होता तोच तो कॉंग्रेस(यु). ही सगळी मते १९८५ मध्ये कॉंग्रेस पक्षाला मिळाली असे गृहित धरायला हरकत नसावी. तसेच जनता पक्षाच्या दोन्ही गटांची मिळून १९८० च्या तुलनेत १९८५ मध्ये ४.२८% मते कमी झाली.त्यापैकी ०.९७% मते भाजपकडे गेली आणि उरलेली ३.३१% कॉंग्रेसकडे गेली. म्हणजेच कॉंग्रेसला जास्तीची मिळालेली ४.५२% मते कशी आली याचा हिशेब मांडता येईल. (०.९७% कॉंग्रेस(यु) कडून, ३.३१% मते जनता पक्षांकडून तर ०.२४% मते अपक्ष आणि इतर पक्षांकडून).
ii. १९९० मध्ये कॉंग्रेस पक्षाची १९.८१% मते कमी झाली. तर भाजपची ११.७३% मते वाढली आणि जनता दल या नावाने असलेल्या जनता पक्षाच्या अवताराची १०.११% मते वाढली. म्हणजेच १९९० मध्ये कॉंग्रेस पक्षाची कमी झालेली मते भाजप आणि जनता दलाने घेतली.
iii. १९९८ मध्ये शंकरसिंह वाघेलांचा अखिल भारतीय राष्ट्रीय जनता पक्ष भाजपचे मोठे नुकसान करेल अशी अटकळ होती.पण तसे झाले का? तसे होताना दिसत नाही. भाजपची मते २.३०% ने तर कॉंग्रेसची मते १.९९% ने वाढली.तेव्हा वाघेलांच्या पक्षाची ११.६८% मते कुठून आली? तर ती बहुतांश अपक्षांकडून आली. राज्य पातळीवर हे चित्र दिसते पण विधानसभा मतदारसंघांच्या पातळीवर असे लक्षात येईल की वाघेलांच्या पक्षाचा भाजपला मध्य गुजरातमधील काही भाग वगळता फटका बसला नाही.तर वाघेलांच्या पक्षाने कॉंग्रेस पक्षाची मते खाल्ली.
राज्य पातळीवरील कल
अशा प्रकारे सर्व निवडणुकांविषयी अनुमाने बांधता येतील.आता याचा २०१२ च्या निवडणुकांच्या निकालांचे भाकित करायला काय उपयोग? १९८५ च्या निवडणुकांवर इंदिरा गांधींच्या हत्येची आणि १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजीव गांधींनी अभूतपूर्व यश मिळविले याची पार्श्चभूमी होती.तर कॉंग्रेस पक्षाची मते साडेचार टक्क्यांनी वाढली. १९९० च्या निवडणुकांवर १९८९ मध्ये राजीव गांधींचा झालेला पराभव आणि एकूणच देशातील कॉंग्रेसविरोधी वातावरणाची पार्श्चभूमी होती.त्यातून कॉंग्रेस पक्षाची जवळपास २०% मते कमी झाली. १९९० नंतर राज्यात भाजपचा जोर वाढला होता.त्यातून १९९५ मध्ये भाजपची मते साधारण १६% ने वाढली. सर्वसाधारणपणे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी वातावरण कसे होते (म्हणजे कॉंग्रेस पक्षाला अनुकूल/भाजपला अनुकूल इत्यादी) याची थोडीफार कल्पना मला आहेच. तेव्हा साधे त्रैराशिक मांडून त्यावेळी वातावरण तसे होते आणि अमुक इतके टक्के मते फिरली तर सध्याच्या वातावरणात राज्यपातळीवर किती टक्के मते फिरू शकतील हा सब्जेक्टिव्ह कॉल घेणे हा दुसरा टप्पा.
यात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे राज्य पातळीवर मते किती फिरतील याचा अंदाज बांधायला बेस इफेक्ट खूप महत्वाचा आहे.गुजरातमध्ये एखाद्या पक्षाचा झंझावात आहे अशी परिस्थिती दोनदा आली. १९८५ मध्ये माधवसिंह सोळंकींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाने ५५.५५% मते आणि १८२ पैकी १४९ जागा जिंकल्या तर २००२ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने ४९.८५% मते आणि १२७ जागा जिंकल्या. १९८५ मध्ये कॉंग्रेसची मागच्या निवडणुकीच्या तुलनेत ४.५२% मते वाढली तर ८ जागा वाढल्या तर २००२ मध्ये भाजपची ५.१४% मते आणि १२ जागा वाढल्या. १९८५ मध्ये कॉंग्रेसला आणि २००२ मध्ये भाजपला मागच्या वेळच्या निवडणुकींच्या वेळच्या अनुक्रमे ५१.०३% आणि ४४.८१% मतांचा बेस होता. मुळातला बेस मोठा असेल तर त्यावर अजून वाढ करणे अधिक कठिण असते आणि अशी वाढ होऊन जागांमध्ये वाढ खूप प्रमाणावर होऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे १९९० मध्ये भाजपला २६.६९% मते आणि ६७ जागा मिळाल्या होत्या.हा बेस तितका मोठा नव्हता.त्यामुळे त्यात १९९५ मध्ये भाजपला १५.८२% मते वाढवून ६७ वरून १२१ म्हणजे ५४ जागांचा घसघशीत फायदा झाला. पण त्यानंतर १९९८ मध्ये भाजपला २.३०% मते जास्त मिळाली आणि १९९५ च्या तुलनेत पक्षाच्या ६ जागा कमी झाल्या. तेव्हा जेवढा बेस मोठा तितका वाढायला वाव कमी असतो हे दिसतेच. त्याचप्रमाणे जर मुळातला बेस मोठा असेल तर फटका बसल्यास जोरदार फटका बसतो हे कॉंग्रेस पक्षाच्या १९९० मधील पराभवातून लक्षात येईल.
विभागीय पातळीवरील कल
अनेकदा कल विभागीय पातळीवर बदलू शकतात. मध्य गुजरातमध्ये अहमदाबाद, आणंद, बडोदा, छोटा उदयपूर, दोहाद, धांधुका,गांधीनगर, गोध्रा, खेडा आणि कपडवंज या १० जुन्या लोकसभा मतदारसंघांच्या क्षेत्रांमध्ये ७० विधानसभा मतदारसंघ होते. मुख्यत्वे या मतदारसंघांमध्ये २००२ मध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात दंगली झाल्या होत्या. आता या विभागात १९९८,२००२ आणि २००७ मधील निकाल लक्षात घेतल्यास दंगली हा विभागीय पातळीवर किती महत्वाचा मुद्दा होता हे कळेलच. भाजप आणि कॉंग्रेसला मिळालेली मते आणि कंसात जागा पुढीलप्रमाणे:
भाजप कॉंग्रेस
१९९५ ४१.१७%(४४) ३२.६३%(२०)
१९९८ ४२.२२%(३१) ३८.२६%(३३)
२००२ ५६.१९%(५९) ३६.५२%(११)
२००७ ४९.७१%(३७) ३८.५५%(२९)
असे म्हटले जात आहे की केशुभाई पटेल सौराष्ट्र विभागात म्हणजे राजकोट, सुरेन्द्रनगर, जामनगर, पोरबंदर, जुनागढ, अमरेली आणि भावनगर या ७ जुन्या लोकसभा मतदारसंघांच्या क्षेत्रांमधील ५० विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला डोकेदुखी निर्माण करू शकतील. तेव्हा केशुभाई पटेलांचे बंड हा मोठा मुद्दा सौराष्ट्रात असेल.
विधानसभा मतदारसंघ पातळीवरील कल
हा सगळ्यात आव्हानात्मक भाग आहे.विधानसभा निवडणुकांचे मतदारसंघ सर्वसाधारणपणे तालुकापातळीवर असतात.गुजरातमधील तालुकापातळीवरील राजकारण मला समजते असा माझा अजिबात दावा नाही.तरीही कोणत्या मतदारसंघात बंडखोरी झाली आहे का किंवा मतदारसंघांचे स्वरूप (शहरी/ग्रामीण) यावरून थोडे तरी आडाखे बांधता येतील. तसेच काहीवेळा स्थानिक उमेदवार खूपच तगडे असतात आणि त्यांना हरविणे जवळपास अशक्यच असते. उदाहरणार्थ मुख्यमंत्री नरेंद्र मोदी अहमदाबादमधील मणीनगर मतदारसंघातून निवडून येतात.पण ते दुसरीकडून निवडणुक लढवत असतील तरी (काही मतदारसंघ वगळता) त्यांचा पराभव करणे जवळपास अशक्यच असेल. त्याचाही अंतर्भाव करता येईल.
शेवटचा टप्पा म्हणजे राज्य पातळीवरील कल, विभागीय पातळीवरील कल आणि विधानसभा मतदारसंघ पातळीवरील कल superimpose करून कोणत्या मतदारसंघात किती मते फिरू शकतील याविषयी आडाखे बांधणे. आणि या विश्लेषणाला बेस कोणता घ्यावा? २००७ मध्ये झालेल्या निवडणुकांसाठीचे विधानसभा मतदारसंघ आणि आताचे विधानसभा मतदारसंघ सारखेच नाहीत.मतदारसंघांच्या भौगोलिक सीमा बदलल्या आहेत.काही जुने मतदारसंघ अस्तंगत झाले आहेत तर काही मतदारसंघ नव्याने अस्तित्वात आले आहेत.२००९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी आताप्रमाणे मतदारसंघ होते. तेव्हा २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेले मतदान हाच बेस घ्यावा लागेल कारण अन्य कोणता विदा उपलब्ध नाही.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मुद्दे वेगळे असतात तेव्हा लोकसभा निवडणुकांमधील मतदान हा बेस घेतल्यास मुळातल्या बेसमध्ये करेक्शन करावे लागेलच. ते करेक्शन मी राज्यपातळीवरील कल आणि त्यामुळे किती मते फिरतील याचा आडाखा बांधताना करेन. तेव्हा २००९ मधील निकाल आणि त्यात किती मते फिरायची शक्यता आहे या बेसिसवर भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांसाठी नक्की जिंकता येतील अशा सुरक्षित जागा आणि अटीतटीची लढत होऊ शकतील अशा जागा identify करणे ही पुढची पायरी.तरीही अशा अटीतटीच्या लढतीतही कोण जिंकेल याचा काहीतरी अंदाज बांधायलाच हवा आणि तेही मी नक्कीच करेन.
अशा प्रकारे २० डिसेंबरला मतमोजणी सुरू होण्यापूर्वी माझे अंदाज जाहिर करायचा मानस आहे.मतमोजणी रविवारी व्हावी असी माझी फार इच्छा होती.पण ती काही पूर्ण होणार नाही. जमल्यास मतमोजणीच्या दिवशी रजा घेऊन चतुरंग आणि रमताराम यांनी बुध्दीबळाच्या सामन्यांचे धावते समालोचन केले होते तसे समालोचन निवडणुक निकालांचे आणि माझे अंदाज कितपत बरोबर/चूक आहेत याविषयी करायची इच्छा आहे.अर्थातच तसे करता येईलच याची खात्री मी या क्षणी देऊ शकत नाही.
माझे निवडणुक निकालांचे मॉडेल अशा प्रकारचे आहे.या मॉडेलमध्ये सगळ्यात मोठी त्रुटी निर्माण करू शकणारा घटक म्हणजे सब्जेक्टिव्हिटी.सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता नक्की किती टक्के मते फिरतील हा कॉल पूर्णपणे सब्जेक्टिव्ह आहे.तो चुकला तर सगळेच चुकेल.दुसरे म्हणजे जातीपातींच्या आधारावर मते फिरतात.तेव्हा कोणत्या मतदारसंघात कोणत्या जातीच्या मतदारांचे वर्चस्व आहे आणि उमेदवार कोणत्या जातींचे आहेत या स्वरूपाची माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही.तिसरे म्हणजे गुजरात हे दोन पक्षांचे वर्चस्व असलेले राज्य असल्यामुळे हे मॉडेल गुजरातसाठी वापरताना एक गोष्ट स्पष्ट आहे आणि ती म्हणजे एका पक्षाविरूध्द गेलेली बरीचशी मते दुसऱ्या पक्षाला मिळणार आहेत.पण उत्तर प्रदेशसारख्या राज्यात एका पक्षाची कमी झालेली मते नक्की कोणत्या पक्षाला किती प्रमाणावर जातील हा अंदाज बांधणे तशी कठिण गोष्ट आहे.
गुजरातबरोबर हिमाचल प्रदेशचेही मॉडेल बनवायची माझी इच्छा होती.पण पहिल्याच पायरीसाठी--पीडीफ मधून एक्सेलमध्ये सगळा विदा घेणे बराच वेळ लागला त्यामुळे हिमाचलविषयीचे मॉडेल बनणार नाही.
या मॉडेलविषयी आपली मते जाणून घ्यायला आवडेल.तसेच यात काही सुधारणा सुचवता आल्यास त्यांचाही अंतर्भाव करायचा नक्कीच प्रयत्न करेन.तसेच या मॉडेलच्या यशापयशावरून भविष्यात कोणत्या सुधारणा करायला हव्यात हे पण ल़क्षात येईल.
माझा अगदी मोठा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे सगळ्या राज्यांविषयी असे मॉडेल २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बनविणे.पण यात सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पीडीफ मधील विदा एक्सेल शीटमध्ये अचूकपणे घेणे.असा विदा कुठे उपलब्ध आहे का हे मी शोधायचा बराच प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही.
तसेच जर देशपातळीवरील मॉडेल बनविण्यात कोणा सदस्याला रस असेल तर 'जॉईंट मॉडेल' सुध्दा बनविता येऊ शकेल.म्हणजे माझ्या लक्षात न आलेले मुद्दे वेळीच इतर कोणी लक्षात आणून दिले तर मॉडेल अजून चांगले बनेल.
(माझा गुजरात विधानसभा निवडणुकीवरील ब्लॉगः http://gujaratvidhansabha2012.blogspot.in)
वाचन
5163
प्रतिक्रिया
0