मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेम्माम्मा रेम्माम्मा रे..

गवि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भेंड्या खेळाव्यात. मुळातच हरकत किंवा वैर नाही. छान बैठा खेळ आहे. उगीच पळापळ नको. जरा मधेमधे चारेक टाळ्या वाजवल्या की झालं. आणि बसने वगैरे दूर दूर जाताना, ऍज अ टुरिस्ट ग्रुप हक्काचं आपलं मराठी माणूस आपल्याला मुंबई ते मुंबई हाकलून हाकलून परत आणताना... किंवा नातेवाईक मिळून टेम्पो ट्रॅव्हलरने तीन दिवसांत अष्टविनायक "करत" असताना .. उपयोगी पडतो वाटेत हा खेळ. जनरली एक पन्नाशीतले तरुण काका बसमध्ये हे सुरु करतात. त्यांना गायची आवड असते. सगळी गाणी तेच काका म्हणतात. इतरजण पहिला अर्धा तास जोरात आणि मग क्षीण टाळ्या वाजवतात. खर्ज आवाजात पुटपुट करत ओठ गाण्यानुसार हलवतात. डिपेंडिंग ऑन व्हेदर केसरीवीणा, चौधरी यात्रा कंपनी किंवा घरचाच प्रासंगिक करार.. बाहेर शेतं, हिमशिखरं किंवा डुकरं वगैरे दिसत असतात. ती तन्मय होऊन बघता बघता मधेच काका "गा की रे" ओरडले की पुटपुट जरा वाढवायची असं तंत्र जमवून सेटल झालं की.. ती वेळ येते. म्हणजे भेंडयांमधे अनिवार्य असलेला एक लूप कम भोवरा कम चकवा येतो. किती काळ गेला, सहस्रक बदललं. पन्नाशीच्या काकांची जागा आम्ही तरुणांनी घ्यायची वेळ येऊ घातली. अन्नू, जतिन ललित, ए आर रेहमान, प्रीतम, रेशमिया आणि व्हॉट नॉट येऊन गेले. पण ही दिग्गज गाणी या लूपमधून सुटली नाहीत आणि तो लूप भेंडयांतून सुटला नाही. या गाण्यांची एक खास मजा आहे. युनिक गुण. एक म्हणजे ही गाणी अंताक्षरीखेरीज अन्यत्र कोणीही गात किंवा ऐकत नाही, संग्रही ठेवणं तर लै कोसांवर. चुभूदेघे. दुसरं म्हणजे कोणालाही यातल्या ९९% गाण्यांतल्या दोन ओळींपलीकडे एक शब्दही माहीत नसतो. सुरुवात यांपैकी कशानेही होऊ शकते. पण एका गाण्याने सुरुवात झाली की एकमेकांची शेपटी तोंडात धरलेल्या सापांप्रमाणे ती सगळी एका लायनीत झुकझुकगाडी बनवून येतात. उदा. इथे एका भयाण "ड"ने मी या दैवदुर्विलासाची सुरुवात करतो. "डम डम डिगा डिगा.. मौसम भिगा भिगा" (इथे लोक्स बिगा बिगा म्हणतात)... "बिनपिये मैं तो गिरा मैं तो गिरा हाय अल्ला. सूरत आपकी सुभानल्ला" .. शेवटच्या ओळीला तरुण काका स्वतःच्या "हिच्या"कडे हाताने निर्देश करतात. टाळ्या, हास्यकल्लोळ.. हे उत्तम झालं. रंगत भरताहेत काका. मग काका जोरात "ल" असं ओरडतात. आता ल वरून तशी कितीही उत्तम गाणी असली तरी आपली लूपिष्ट गाणी संपल्याशिवाय पुढे विचारच करणे कर्तव्य नसल्याने लूप सुरु होतो. "लल्ला लल्ला लोरी. दूध की कटोरी. दूधमें बताशा, मुन्नी करे तमाशा".. "श".... काय आलं ? "श" "श".. एक उत्फुल्ल आनंदी तरुण मुलगी : "शायद मेरी शादी का खयाल दिलमें आया है.. इसिलिये मम्मी ने मेरे तुम्हे चायपे बुलाया है.. " अय्या, हो का? हशा, टाळ्या चेष्टा, तरुण मुलीचं काही स्मार्ट प्रत्युत्तर आणि मग "बुलाया है.. ह ह ह" चा ओरडा. "है ना बोलो बोलो. है ना... मम्मी को पप्पा से.. प्यार है, प्यार है.. " पुढे कोणालाच येत नसल्याने "है ना... न. न आलं. न." .."ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे..... ठ." इथे एक दुःखी तरुणी एकटीच क्षीण किनऱ्या आवाजात "ठाडे रहियो.." रडू लागते. ही तरुणी पूर्ण भेंडयांत एकच गाणं म्हणते. क्षीण तरुणी उपलब्ध नसल्यास "ठाडे रहियो.."ला फाटा मिळून तरुण काका खुद्द "ठंडे ठंडे पानी से नाहायला" सुरुवात करतात. "गाना आये या ना आये" काय फरक पडत नाय. ठाडे असो किंवा ठंडा पानी.. अंती दोन्ही मार्गांनी "य" लाभतो. "यम्मा यम्मा, यम्मा यम्मा.. ये खुबसुरत समा, बस्साज की रात है जिंदगी, कल हम कहा तुम कहा".. याचीही पुढची ओळ कुण्णाला येत नाही. आणि आली तरी इतक्या नीरस गाण्याची तिसरी ओळ कोणाला नकोच असते. सो.. कल हम कहा तुम कहा.. "ह"...!! "हाय रे हाय नींद नही आय.. दिलमें तू समाये आया प्यारभरा मौसम सुहाना, दिवाना"... "न" "न".. "नानी तेरी मोरनी को.." किंवा "नैनो में सपना".... दोन्हीपैकी काही का असेना.. शेवटी "य"... मग "यम्मा यम्मा.." "ए..ए.. झालंय ऑलरेडी.." "य" "य"... "याहू .. चाहे कोई मुझे जंगली कहे...हम क्या करे.." "र".. "रेम्माम्मा रेम्माम्मा रे... रेम्माम्मा रेम्माम्मा रे...हम तो गये बाजारमें लेनेको आलू...पीछे पडा भालू".. "ल ल".. किंवा "र"ने "रमया वस्तावया.." नावाचं डिप्रेशन ट्रिगर होऊ शकतं.. रमया वस्तावयामधे असा आणखी एक लूप ट्रिगर करण्याची क्षमता आहे. बाकी डफलीवाsssले, ए मेरी जोहराजबीं, हसता हुआ नूरानी चेहरा आणि असंख्याना वंदन. कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी च्यायला. जाऊदे. आणखी कशाला लिहायचं.. इतकं लिहून शांतता लाभलीय. इतर कोणी कावलेत का अशा भेंडीवर्तुळात?

वाचन 15110 प्रतिक्रिया 0