जुहू चौपाटी, सोबत मै शायर बदनाम चे स्वर आणि मी एकटाच..!
लेखनप्रकार
आज बर्याच दिवसांनी संध्याकाळची सवड भेटली..
पोटापाण्याच्या व्यवसायाचं एक महत्वाचं काम होतं अंधेरीला. ते थोडं लौकरच उरकलं. किती वाजले होते माहीत नाही, परंतु आठ वाजून गेले होते. थोडी सवड होती..
डोक्यात 'मै शयर बदनाम..'चे स्वर रुंजी घालू लागले..
तसाच तडक निघालो आणि जुहू चौपाटीवर पोहोचलो. त्या आधी त्याच्या बंगल्याभोवती खुळ्यासारखा थोडा वेळ घुटमळलो..
आणि समोरच असलेल्या चौपाटीच्या पुळणीवर जाऊन बसलो..चौपाटी नेहमीप्रमाणेच गजबजली होती.. पाणीपुरी, भेळपुरी, अन् काय काय! मी मात्र तिथे एकटाच बसलो होतो. वेड्यासारखा, खुळ्यासारखा..!
वर्षातनं दोनतीनदा तरी मला असा वेडाचा झटका येतो..
'मै शायर बदनाम...' च्या जीवघेण्या आर्त स्वरांनी आता माझा संपूर्ण ताबा घेतला होता..! नकळत अश्रू ओघळले आणि खूप मोकळं वाटलं!
पंधरा-वीस मिनिटंच तिथे बसलो होतो..जुहू चौपाटी, मुबै, सारी दुनिया, नेहमीप्रमाणेच गजबजली होती, आपापल्या कामात व्यस्त होती..!
मी मात्र माझ्या आयुष्याची पंधरा-वीस मिनिटं तिथे घालवली होती..उगाचंच..
त्याचं माझ्यावर कधीही न फिटणारं बरंच कर्ज आहे हे त्याला सांगण्याकरता.. थोडी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता..!
-- तात्या अभ्यंकर.
वाचन
8926
प्रतिक्रिया
0