हाती ज्यांच्या शून्य होते
जैनांची कथा वाचली, मंदी वरील लेख/चर्चा वाचतोय त्यातून अचानक खालील पुस्तकाची आठवण झाली. म्हणून हा पुस्तक परीचयाचा उपद्व्याप.
मध्यंतरी भारतात असताना एक आधी माहीत नसलेले पुस्तक हातात पडले. त्या पुस्तकाची नावाप्रमाणेच असलेली कल्पना मला आवडली आणि संग्राह्य वाटल्याने घेयचे ठरवले. तसे त्याची प्रथमावृत्ती २००५ च्या शेवटात झालेली पण ही द्वितियावृत्ती २००८ मधली मला विकत घेताना मिळाली...
पुस्तकाचे नाव आहे: हाती ज्यांच्या शून्य होते. संपादक - अरूण शेवते, ऋतुरंग प्रकाशन. किंमत २०० रुपये.
तर काय आहे ह्या पुस्तकात ते आपल्याला समजले असेलच : भारतात आणि भारताबाहेर अशा अनेक महान/असामान्य व्यक्ती झाल्या आहेत ज्यांच्या महान हातात होण्याआधी फक्त शुन्य होते. बर्याचदा तशी गोष्ट आपण एडीसनची ऐकतो की तो म्हणायचा की मी प्रयोगात १००० चुका केल्या नाहीत तर मला १००० पद्धती कळल्या ज्यांचा उपयोग होणार नाही. पण त्याचे अजून एक लक्षात ठेवण्यासारखे वाक्य आहे: "Many of life's failures are people who did not realize how close they were to success when they gave up."
हाती ज्यांच्या शून्य होते हे पुस्तक हे अशाच महाभागांची गोष्ट सांगते ज्यांनी एडीसनने सांगितल्याप्रमाणे "गिव्ह अप" केले नाही तर जिद्दीने पुढे जायचे ठरवले, तसे ते गेले आणि स्वतःचे नाव जनमानसात कायमचे कोरले.
ह्यात विविध लेखकांचे अथवा त्याच व्यक्तींच्या आत्मचरीत्रातील लेख आहेत. तसेच स्टिव्ह जॉब्स सारख्याच्या प्रेरणादायी भाषणाचा अनुवाद आहे. (ते भाषण इंग्रजीतून मुळापासून वाचण्यासारखे आहे). येथे खाली मी फक्त त्याच्या मलपृष्ठावर असलेल्या ओळी देतो ज्या तशाच्या तशा पण, त्यातील आता माहीत असलेल्या व्यक्तींच्या नावामुळे, वाचल्या तरी प्रेरणा देणार्या वाटतील.
- स्टिव्ह जॉब्ज (मॅकँटोश, आयपॉड, आय फोन आणि त्याहूनही महत्वाचे सुबक दिसणारे फाँट्स!) - कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवले.
- अब्राहम लिंकन - पोस्टमास्टर होते.
- शेक्सपिअर - खाटिकखान्यात नोकरी केली.
- अब्दुल कलाम - विद्यार्थी दशेत रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्रे विकली.
- लता मंगेशकर - कोल्हापुरला स्टुडीओत नोकरी केली.
- एम.एफ. हुसेन - फुटपाथवर सिनेमाची पोस्टर्स रंगवली. (आता १०० कोटींना पुस्तके विकण्याचा विक्रम!)
- धीरूभाई अंबानी - पेट्रोलपंपावर क्लार्क
- गदिमा - नापास झाल्यावर उदबत्या विकण्याचा प्रयत्न केला.
- सुधीर फडके - चहाभाजीचा व्यापार केला
- गुलजार- मोटर गॅरेजमधे नोकरी केली
- ग्रेटा गार्बो - दुकानात सेल्स गर्ल
- निळू फुले - कॉलेजात अकरा वर्षे माळी
- सुशीलकुमार शिंदे - कोर्टात शिपाई
- कर्मवीर भाऊराव पाटील - नांगर आणि कंदीलाचे विक्रेते
- जीनी वॉकर - बस कंडक्टर
- मेहमूद - ड्रायव्हर
वाचन
14483
प्रतिक्रिया
0