मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गूढ अंधारातील जग

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गूढ अंधारातील जग आपण कधी खिडकीच नसलेल्या कार्यालयात काम केलं आहे का? महिनोंमहिने सूर्यप्रकाश , चंद्रप्रकाश, उघडे आभाळ पाहिलेले नाही. तीन तीन महिने २४ तास त्याच त्याच माणसांचा चेहरा पहिला आहे का? तीन महिने सलग बिन अंघोळीचे राहिला आहात काय ? आणि वापरलॆले कपडे न धुता टाकून दिले आहेत का? डिस्पोझेबल डायपर नव्हे तीन महिन्यात केस कापता आले नाहीत म्हणून एखाद्या गोसाव्यासारखे वाढू दिले आहेत का? महिनोन्महिने डबाबंद अन्न खाल्लंय का? मला कितीही सुग्रास जेवलं तरी शेवटी आमटी भात लागतोच, मला रोज नॉनव्हेज लागतंच किंवा मी १०० टक्के नॉनव्हेज आहे, तोंडाला चवच राहिली नाही साला श्रावण केंव्हा एकदा संपतोय असं झालं आहे असे ना म्हणता केवळ टोमॅटो केचप आणि पोळी/ ब्रेड खायला लागते आहे म्हणून तक्रार न करता काम केलंय का? आणि हे सुद्धा आपण काही गुन्हा केल्यामुळे अंधारकोठडीत टाकलंय कि काळ्या पाण्याची शिक्षा झाली आहे म्हणून नव्हे तर आपण स्वतःच्या इच्छेने हे करायला तयार झाला आहात म्हणून. हे एक वेगळे आणि गूढ पण अंधारातील जग आहे हे जग आहे पाणबुडीचे आणि त्यात काम करणाऱ्या नौसैनिकांचे. हि माणसे तुमच्या आमच्यातीलच सामान्य माणसं असतात. पण त्यांना या जगासाठी तयार केलं जातं शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या समानशीले व्यसनेषु सख्यम या नात्याने त्यांचे जग हे अतिशय घट्ट असे रेशमी मानसिक बंधाचे (क्लोज बॉन्डेड) तयार झालेले असते. पाणबुडीत काम करण्यासाठी सर्वानाच १ वर्षाचा खास पण अतिशय कठीण असा एक अभ्यासक्रम करावा लागतो मग तो डॉक्टर असो कि इंजिनियर. कारण पाणबुडी हि सीलबंद आणि अभेद्य असते आणि तिला कोठूनही चीर किंवा भोक पडले तर त्यात असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जीवाला धोका निर्माण होतो. आपण घरात कोंदट झाले तर पटकन खिडक्या उघडतो अशा खिडक्या मुळात पाणबुडीला नसतातच आणि पाणबुडी हि असंख्य कप्प्यांची बनलेली असते. त्यातील प्रत्येक कप्पा हा जलाभेद्य असतो. यामुळे पाणबुडीत च्या आत असलेल्या हवेच्या प्रमाणावर सारखे लक्ष ठेवावे लागते. त्यातून एखाद्या कप्प्यात आग लागली तर तेथे तयार होणारे कार्बन डाय ऑक्साईड आणि कार्बन मोनॉऑक्साईड आणि इतर धोकादायक वायू यावर ताबडतोब उपाय करावे लागतात. अशा असंख्य गोष्टीवर तेथे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. तेंव्हा तेथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक माणसाला पाणबुडीतील जीवन रक्षक कवायतीच्याबद्दल इत्यंभूत ज्ञान असणे आवश्यक असते. सिगरेट बिडी पिणे हे तर संपूर्ण निषिद्ध आहेच. दिवस कोणता आणि रात्र कोणती हे हि आतमध्ये समजत नाही. पूर्णवेळ कृत्रिम प्रकाशात राहायला लागते आणि वॉर पेट्रोल साठी गेल्यावर तीन महिने एका वेळेस बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटलेला असतो मग वृत्तपत्र दूरदर्शन दूरध्वनी भ्रमणध्वनी इ सर्व च्या सर्व बंद होऊन जाते. आज काही तास मोबाईल बंद झाला/ बॅटरी संपली म्हणून तर कासावीस होणारे कित्येक तरुण आपल्याला आसपास दिसतात. अशा परिस्थितीत सुशिक्षित तरुण यश खडतर आयुष्यासाठी आनंदाने का तयार होतात याचे मला आश्चर्य आणि कौतुक वाटत राहिले आहे. हा विषय अतिशय गहन, खोल आणि विस्तृत आहे. या विषयाला मी हात घालतो आहे पण किती भागात आणि कसे लिहिता येईल याबद्दल मला अजूनही काहीच संकल्पना नाही मी पाणबुडीत प्रत्यक्ष काम केलेलं नाही. केवळ पाणबुडीला भेट दिली आहे, अंडर वॉटर मेडिसिनचा प्राथमिक अभ्यासक्रम केला आहे आणि नौदलात नोकरी केल्यामुळे माझे असंख्य वरिष्ठ, कनिष्ठ आणि मित्र हे पाणबुडीत प्रत्यक्ष काम केलेले आहेत त्यांच्याशी मारलॆल्या गप्पा यावरून मी या विषयाला हात घालायचा प्रयत्न करतो आहे. या विषयावर मराठीत किती माहिती आहे हेही मला माहित नाही. या विषयाच्या प्रुष्ठभागाला स्पर्श करता आला तर मी स्वतःला धन्य समजेन. एखादे वेळेस माहिती विसंगत किंवा चुकीची असण्याची शक्यता आहे त्यात कुणी दुरुस्ती सांगितली तर मी प्रथमच माफी मागतो आहे आणि या चुका सुधारण्याचा माझा प्रयत्न राहील हे हि नमूद करू इच्छितो. क्रमशः

वाचन 43913 प्रतिक्रिया 0