लोकसभा निवडणुका-२००९ उत्तर भारतातील परिस्थितीविषयी माझा अंदाज
नमस्कार मंडळी,
लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच हा लेख लिहायचे मनात होते. गेले काही दिवस मी माझ्या भविष्य आणि करियरविषयी काही गोष्टींमध्ये गुंतलेलो असल्याने मिसळपाववर येऊनही काही लिखाण करणे शक्य झाले नव्हते. देवदयेने सर्वकाही ठरविल्याप्रमाणे पार पडल्यास मिसळपाववर ते जाहिर करेनच.
गेल्या शनीवारी (२१ फेब्रुवारीला) मला मुंबईत एक छोटा अपघात होऊन माझ्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे आणि दीड-दोन महिन्याची निश्चिंती झाली आहे. ते एका अर्थाने बरेच आहे कारण त्यामुळे हा लेख मला अधिक सविस्तर लिहिता येईल आणि त्यासाठी जास्त वेळ देता येईल.
इतिहास आणि राजकारण आणि त्यातही निवडणुकांमध्ये मला अतोनात रस असल्यामुळे लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर कोणाला किती जागा मिळतील याचे अंदाज इतर अनेकांप्रमाणे मी पण बांधत असतो.कधी ते बरोबर येतात तर कधी नाही.तरी अंदाज बांधण्याची खोड काही जात नाही. तेव्हा माझे अंदाज मी मिसळपाववर लिहित आहे. ते किती प्रमाणावर बरोबर येतात हे काळच ठरवेल. त्यासाठी आपल्याला १६ मे पर्यंत थांबावे लागेल. तसेच हा लेख लिहिताक्षणी महाराष्ट्रात राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर जाणार की २००४ प्रमाणे काँग्रेसपक्षाबरोबर हे तितकेसे स्पष्ट नाही. या महत्वाच्या घडामोडीचा १५ व्या लोकसभेच्या चेहर्यामोहर्यावर परिणाम होणार आहे.
माझ्या अंदाजांचे स्वरूप राज्याराज्यांमधील परिस्थितीवरून अंदाज बांधणे असेल. त्यात काही सुधारणा मिसळपावच्या गावकर्यांना सुचवायच्या असल्यास त्याचे स्वागतच आहे. एकूण लेख ४ भागांमध्ये असेल. उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि पूर्व भारतासाठी एकेक लेख लिहायचा मानस आहे. सुरवात उत्तर भारतापासून.
हा लेख म्हणजे माझ्या कुवतीप्रमाणे राजकिय परिस्थितीचा आढावा घेऊन लोकसभा निवडणुकीत काय होईल याविषयी बांधलेला अंदाज आहे. २००४ प्रमाणे अंदाज पार चुकायची शक्यता आहे. तेव्हा चु.भू.दे.घे ही विनंती.तसेच काही सुधारणा असल्यास सुचवाव्यात ही विनंती.
१) जम्मू-काश्मीर (एकूण जागा: ६)
राज्यातील जनतेने डिसेंबर महिन्यातच विधानसभा निवडणुकीत आपला जनादेश दिला आहे.त्यानंतर ओमर अब्दुलांच्या नेतृत्वाखाली नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांचे आघाडी सरकार स्थापन झाले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून राज्यातील वातावरण अमरनाथ जमीनप्रकरणामुळे ढवळून निघाले होते. काश्मीर खोरे आणि जम्मूमध्ये परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राज्यात काश्मीर खोर्यात ३, जम्मू भागात २ आणि लडाखमध्ये १ अशा लोकसभेच्या एकूण ६ जागा आहेत. जम्मूमध्ये भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापित केले आहे. त्यापेक्षा खूप काही वेगळा निकाल लोकसभा निवडणुकीत लागेल असे वाटत नाही. तेव्हा जम्मू विभागातील दोन्ही जागा भाजप जिंकेल असे वाटते.काश्मीर खोर्यातील ३ पैकी २ जागा तरी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची आघाडी जिंकेल असे वाटते आणि १ जागा पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी जिंकेल असे वाटते. माजी मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद किंवा त्यांची कन्या मेहबुबा मुफ्ती लोकसभेत अनंतनागचे प्रतिनिधीत्व करेल असे वाटते. लडाखमधील जागा नॅशनल कॉन्फरन्स १९९८ ते २००४ मधील निवडणुकांप्रमाणे जिंकेल असे वाटते.
एकूण जागा: ६
भाजप: २
नॅशनल कॉन्फरन्स: २
काँग्रेस: १
पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी: १
२) हिमाचल प्रदेश: (एकूण जागा: ४)
राज्यात डिसेंबर २००७ पासून भाजपाचे प्रेमकुमार धुमल मुख्यमंत्री आहेत. मार्च २००३ च्या राज्य विधानसभा निवडणुका आणि मे २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेस पक्षाने बाजी मारली होती. आताही राज्याची जनता विधानसभा निवडणुकांनंतर १६ महिन्यात लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान करेल. साधारणपणे पहिले १.५ ते २ वर्षे राज्यातील वातावरण सत्ताधारी पक्षाविरूध्द जात नाही (अपवाद: १९९९ च्या निवडणुका.त्यावेळी मध्य प्रदेश,दिल्ली आणि राजस्थानात काँग्रेस पक्षाचे सरकार ९ महिन्यांपूर्वी स्थापन झाले होते. तरीही पक्षाचा मोठा पराभव लोकसभा निवडणुकांमध्ये झाला. पण त्यावेळी कारगील हा महत्वाचा मुद्दा होता.यावेळी असा महत्वाचा मुद्दा नसल्यामुळे अपवाद होईल असे वाटत नाही.) लोकसभा निवडणुकांमध्येसुध्दा राज्यनिहाय मतदान होते असे १९९६ नंतरच्या निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. (उदाहरणार्थ १९९८ मध्ये गुजरातमध्ये भाजपाचा विजय झाला पण त्याशेजारील महाराष्ट्र आणि राजस्थानात मोठा पराभव झाला.) हिमाचल प्रदेशात त्याकारणामुळे भाजपाचे वर्चस्व राहिल असे वाटते.मुख्यमंत्री धुमल आणि माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते शांता कुमार यांच्यात विस्तव जात नाही हे जगजाहिर आहे. पण वाढत्या वयामुळे शांता कुमार फारसे प्रभावशाली राहिलेले नाहीत. तेव्हा राज्यातील ४ पैकी ३ जागा भाजपा जिंकेल आणि एक जागा काँग्रेस पक्ष जिंकेल असे वाटते.
एकूण जागा: ४
भाजप: ३
काँग्रेस: १
३) हरियाणा: (एकूण जागा: १०)
राज्यात फेब्रुवारी २००५ पासून काँग्रेस पक्षाचे भूपिंदरसिंह हुडा मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या विरूध्द माजी मुख्यमंत्री भजनलाल यांनी हरियाणा जनकाँग्रेस च्या माध्यमातून दंड थोपटले आहेत. भजनलाल यांचे पुत्र कुलदिप बिष्णोई यांची जुलै २००८ मधील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी पक्षातून हकालपट्टी झाली आहे.तेव्हा भजनलाल आणि हुडा यांच्या भांडणात काँग्रेसपक्षाचे नुकसान होणार हे नक्की. तसेच ओमप्रकाश चौटाला यांचा भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि भाजप यांची युती झाली आहे. भाजपला अगदी अयोध्या आंदोलनाच्या काळात उत्तर भारतात पाय रोवता आले पण हरियाणात मात्र हा पक्ष फारसा प्रभाव दाखवू शकला नव्हता. तरीही दिल्लीजवळील गुडगाव, फरिदाबाद यासारख्या भागात आणि दिल्लीहून त्यामानाने लांब असलेल्या अंबालासारख्या भागात पक्षाची मते आहेत. एकट्याच्या सामर्थ्यावर भाजप या जागा जिंकू शकत नसला तरी चौटालांच्या मदतीने दोन्ही पक्षांना फायदा होईल असे वाटते.चौटाला-भाजप युतीला १० पैकी ७ जागा मिळतील असे वाटते. हरियाणा जनकाँग्रेस ला एक जागा (कुलदीप बिष्णोईंची कर्नाल) आणि काँग्रेस पक्षाला उरलेल्या २ जागा मिळतील असे वाटते.
एकूण जागा: १०
भारतीय राष्ट्रीय लोकदल: ४
भाजप: ३
काँग्रेस: २
हरियाणा जनकाँग्रेस: १
४) पंजाब: (एकूण जागा: १३)+ चंदिगढ (जागा: १)
पंजाबात फेब्रुवारी २००७ पासून अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल मुख्यमंत्री आहेत.तेव्हा त्यांच्या सरकारचा जवळपास अर्धा कालावधी संपलेला आहे. २००४ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारला अशाच अर्धकालीन लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा अकाली दलाला ही निवडणुक जरा जड जाईल असे वाटते. दरमानच्या काळात राज्यात विधानसभा किंवा लोकसभेच्या महत्वाच्या पोटनिवडणुका झाल्या नव्हत्या. तरीही वर्तमानपत्रातील बातम्यांवरून राज्यातील वातावरण मोठ्या प्रमाणावर अकाली दलाच्या विरूध्द आहे असे वाटत नाही. तरीही या राज्याविषयी keeping fingers crossed.
एकूण जागा: १४ (चंदिगढ धरून)
काँग्रेस: ९
अकाली दल: ३
भाजप: २
५) दिल्ली: (एकूण जागा: ७)
दिल्लीत डिसेंबर १९९८ पासून काँग्रेसपक्षाचे शीला दिक्षित यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. १९९९ च्या लोकसभा निवडणुका आणि २००७ च्या दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पक्षाची पिछेहाट झाली. पण २००२ च्या महानगरपालिका निवडणुका, २००४ च्या लोकसभा निवडणुका आणि २००३ आणि २००८ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला शीला दिक्षित यांनी एकहाती विजय मिळवून दिला. तेव्हा २००४ पेक्षा निकाल वेगळा लागेल असे वाटत नाही. दिल्लीमध्ये बहुजन समाज पक्षाचे बळ वाढत आहे. पण तरीही ते बळ लोकसभेची जागा जिंकायला पुरेसे आहे असे वाटत नाही.भाजपाला एक जागा मिळेल. जर लोकप्रिय उमेदवार असला किंवा दुसरा काही चमत्कार झाला तर दुसरी जागा पक्ष जिंकू शकेल.
एकूण जागा: ७
काँग्रेस: ६
भाजप: १
६) राजस्थान:
राजस्थानातील जनतेने नोव्हेंबर २००८ मध्ये वसुंधरा राजेंच्या भाजप सरकारला नाकारून काँग्रेस पक्षाला परत एक संधी दिली. अशोक गेहलोत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गेल्या ३ महिन्यांपासून आहेत. वसुंधरा राजेंची मनमानी आणि गुज्जर आरक्षण आंदोलनाचा परिणाम भाजपाला भोगावा लागला. तरीही १९९८ च्या विधानसभा निवडणुकांप्रमाणे पक्षाचा धुव्वा उडाला नाही आणि २०० पैकी ७८ जागा मिळाल्या. जसवंत सिंहांनी वादग्रस्त विधाने करून पक्षाला अडचणीत आणणे चालूच ठेवले आहे आणि माजी उपराष्ट्रपती शेखावतांना महत्वाकांक्षी स्वप्ने पडू लागली आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर भाजपला ६ पेक्षा जास्त जागा मिळवणे कठिण जाईल असे वाटते.
एकूण जागा: २५
काँग्रेस: १९
भाजप: ६
७) उत्तराखंड:
राज्यात फेब्रुवारी २००७ पासून भाजपचे भुवनचंद्र खंडुरी मुख्यमंत्री आहेत. तेव्हा भाजप सरकार पंजाबातील बादल सरकारप्रमाणेच अर्धवाटेवर आहे. २००७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण दत्त तिवारी आणि प्रदेशाध्यक्ष हरिश रावत यांचे भांडण आणि प्रस्थापितविरोधी मत याचा फटका काँग्रेस पक्षाला बसला. निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर भाजपचे बहुसंख्य आमदार माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोशियारी यांच्या बाजूचे होते पण पक्ष नेतृत्वाने खंडुरींच्या बाजूने कौल दिला.काही महिन्यांपूर्वी पक्षाच्या काही आमदारांनी खंडुरींविरूध्द आवाज उठवला होता.पण त्यांना शांत करण्यात पक्ष नेतृत्वाला यश आले.तरीही राज्य भाजपमध्ये सर्वकाही आलबेल आहे असे नाही. २००४ मध्ये भाजपला ३, काँग्रेसला १ आणि समाजवादी पक्षाला मैदानी प्रदेशातील हरिद्वारची एक जागा मिळाली होती. भाजपला एका जागेचा फटका नक्की बसेल असे वाटते आणि काँग्रेस पक्षाला एका जागेचा फायदा होईल असे वाटते.
एकूण जागा: ५
भाजप: २
काँग्रेस: २
समाजवादी पक्ष: १
८) उत्तर प्रदेश: (एकूण जागा: ८०)
उत्तर प्रदेशविषयी नक्की अंदाज बांधणे धाडसाचेच आहे. या एका राज्यातील निकाल सर्व अंदाज आणि १५ व्या लोकसभेचा चेहरामोहरा उलटापालटा करू शकतो.
पण राज्यातील परिस्थिती लक्षात घेता मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचेच वर्चस्व राहिल असे वाटते. २००४ मध्ये समाजवादी पक्षाने इतर सर्व पक्षांपेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या.पण त्यानंतर मायावतींनी सोशल इंजिनियरींग यशस्वी करून २००७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जोरदार यश मिळवले.त्यानंतरच्या २ वर्षांत मायावतींनी उच्चवर्णीयांना आपल्याबरोबर ठेवण्यात यश मिळवले आहे. समाजवादी पक्षाचे काही खासदार मायावतींबरोबर आले आहेत.तसेच मुलायमसिंगांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आणि सरकार तारले. तो मुख्य मुद्दा अमेरिकेबरोबरचा अणुकरार हा होता. अर्थात मुलायमसिंगांनी लोकसभा निवडणुकीत फायदा होईल म्हणून काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला. आणि मायावती त्या कराराविरूध्द आहेत.तसेच कल्याण सिंह समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणुक लढविण्याची शक्यता आहे. त्यांचा अयोध्या आंदोलनातील सहभाग सर्वांना माहित आहे. काही मुस्लिम मते त्याकारणावरून समाजवादी पक्षाकडून बहुजन समाज पक्षाकडे जायची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बसपला ५० ते ५५ जागा मिळतील असे मला वाटते. तेव्हा सरासरी म्हणून ५२ जागा धरू.
समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात तणातणी चालू असली तरी दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज सध्या आहे. या दोन पक्षांनी युती करून निवडणुक लढविल्यास २० पर्यंत जागा मिळू शकतील असे मला वाटते.
भाजपची मात्र या राज्यात पूर्णपणे वाताहत झाली आहे. कल्याण सिंहांनंतर जनतेत समर्थन असलेला नेता पक्षाकडे राहिला नाही.पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह गाझीयाबाद मधून तर ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी वाराणशीतून निवडणूक लढवणार आहेत. तरीही या दोन नेत्यांना यश मिळेल हे १००% खात्रीने सांगता येत नाही. अजित सिंगांबरोबरच्या युतीमुळे गाझीयाबाद मध्ये राजनाथ सिंगांना काही प्रमाणावर फायदा जरूर होईल. वाजपेयींनी राजकारण संन्यास घेतल्यानंतर लखनौमध्ये लालजी टंडन पक्षाचे उमेदवार असतील. वाजपेयींविषयी असलेल्या सद्भावनेचा फायदा होऊन ते निवडून यायची शक्यता आहे. तसेच मेनका गांधींसारखे काही उमेदवार स्वत:च्या बळावर निवडून येऊ शकतील. तसेच अजित सिंगांच्या राष्ट्रीय लोकदलाबरोबरच्या युतीचा पक्षाला पश्चिम उत्तर प्रदेशात (बागपत, मेरठ या भागात) पण पक्षाला ६ पेक्षा जास्त जागा मिळतील असे म्हणणे मोठेच धाडसाचे ठरेल.
तेव्हा राज्याविषयीचा माझा अंदाज असा:
एकूण जागा: ८०
बहुजन समाज पक्ष: ५२
समाजवादी पक्ष: १४
भाजप: ६
काँग्रेस: ५
भारतीय लोकदल: २
अपक्ष: (कल्याण सिंह): १
तेव्हा उत्तर भारतात पुढील परिस्थिती असेल असे मला वाटते.
एकूण जागा: १५१
यु.पी.ए:
काँग्रेस: ४५
नॅशनल कॉन्फरन्स: २
समाजवादी पक्ष: १५
अपक्ष (कल्याण सिंह): १
एकूण: ६३
एन.डी.ए.:
भाजप: २५
अकाली दल: ३
भारतीय राष्ट्रीय लोकदल: ४
भारतीय लोकदल: २
एकूण: ३४
इतर:
पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी: १
हरियाणा जन-काँग्रेस: १
बहुजन समाज पक्ष: ५२
एकूण: ५४
(क्रमशः)
वाचन
6825
प्रतिक्रिया
0