मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

...असे आजोबा!

हृषीकेश पतकी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
काल उघडले कपाट तेव्हा पुन्हा भेटले मला आजोबा | असण्याहूनही नसण्यामध्ये नवे वाटले मला आजोबा ||१|| शुभ्र साजि-या वस्त्रांमधूनी होते लपले असे आजोबा | इंचघडीतून अलगद ज्यांनी आम्हा जपले असे आजोबा ||२|| पुस्तकातल्या श्लोकांमधला सुस्पष्ट असा तो ध्वनी आजोबा | पत्ररुपाने अक्षर होऊन अन् भिडणारे मनी आजोबा ||३|| कधी हास्याची झुळूक आणि कधी गोष्टींची लाट आजोबा | आकार आम्हाला देताना शिस्तीचा परिपाठ आजोबा ||४|| कधी दुपारी बहरुन यावा तो संवादिनीचा सूर आजोबा | पण सायंकाळी सात वाजता चिंतेचे काहूर आजोबा ||५|| कपाट केले बंद तरीही आठवणींचे ठसे आजोबा | विचार करता काव्य स्फुरावे होते आमचे असे आजोबा ||६|| जपून ठेवू सदैव ज्या, त्या अस्तित्त्वाच्या खुणा आजोबा | एका जन्मी कसे पुरावे, हवे आम्हाला पुन्हा आजोबा ||७||

वाचन 4062 प्रतिक्रिया 0