मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुधवाच्या जंगलात मी एक जिवंत वाघ पाहिला

माझी दुनिया · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मला विरोपाद्वारे आलेली एक कविता इथे देत आहे. "दुधवा" हे भारत-नेपाळ सरहद्दीवरील संरक्षीत अभयारण्य आहे. त्या जंगलातील वास्तव्यात असतांना झालेल्या वाघाच्या दुर्मीळ दर्शनानंतर मला सुचलेली ही कविता... -स्वागत दुधवाच्या जंगलात... दुधवाच्या जंगलात आम्हाला एक वाघ दिसला, पाहताच क्षणी सगळयांना तो उंच गवतात जाऊन बसला. पाहून त्या वाघाला सारेच जण आनंदले, डोळ्यात आमच्या उत्साहाचे भाव ते दाटून आले. पुन्हा तो दिसावा असे सा-यांना वाटू लागले, नि:स्तब्ध निरव शांततेत प्रतिक्षा करू लागले. बराच वेळ झाला तरी बाहेर तो येईना, दर्शनाची झलकही तो काही देईना. प्रतिक्षेची हद्द होऊन एक महिला वैतागली, दुस-या जंगलातील वाघांचे ती मोठयाने कौतूक करू लागली. "अमक्या तमक्या जंगलात बरेच वाघ दिसतात, अवती भोवती दोन जीप्सच्या बिनधास्त सारे फिरतात." वाघाने ते ऐकले अन् एक डरकाळी फोडली, मला तिथेच सोडून सा-यांनी जीप भरधाव सोडली. दुधवाच्या त्या रानवाटेवर मी एकटाच उभा होतो, वाघ लपलेल्या जागेकडे टक लावून पाहात होतो. माझ्यापासून वाघाचे अंतर तसे फार नव्हते, अंदाजाने माझ्या ते केवळ दहा-बारा मीटर होते. अवती भोवती सगळीकडे माझी नजर शोधू लागली, आसला घेण्याजोगी नव्हती एकही तिथे जागा चांगली. गवतामध्ये सळसळ झाली अन् माझा श्वास थांबला, दमदार पाऊले टाकत समोर प्रत्यक्ष वाघच उभा ठाकला. राजबिंडया त्या रुपाने मनोमनी मी भारावलो, त्याच्या त्या दर्शनाने अंत:र्यामी मी सुखावलो. खूप वेळ आम्ही दोघे एकमेकांना निरखत होतो, आता पुढे काय होईल याचा अंदाज घेत होतो. शब्दांची करून जुळवा जुळव मी विचारणार त्याला काही... ...तोच म्हणाला, "घाबरू नकोस, मी तुला खाणार नाही." मी आनंदलो, फोटो त्याचा काढण्यासाठी थोडा पुढे सरसावलो, पण त्याच्या पुढील वाक्यांनी जागच्या जागीच स्थिरावलो... "आहेत माझे प्रश्न काही उत्तर तू देणार का? निसर्गाच्या विनाशाला जबाबदार कोण तू सांगणार का? लोकसंख्या वाढत गेली गावे, नगरे फुगत चालली, जंगल झाडे तुटत गेली पक्षी कोटरे उजाड जाहली. हिरवी कुरणे खुरटी झाली रानफुलेही लूप्त झाली. फुलपाखरे, किटक, प्राणी सारी सारी बेघर झाली. जीवनोपयोगी वृक्षांच्याही अनेक जाती दुर्मीळ झाल्या. मुक्त विहरणा-या वनचरांच्या पिढयान् पिढया शिकारीत मेल्या. अतिक्रमण केले तुम्ही म्हणोनी आम्हीही वस्तीत शिरू लागलो, भेकड मानवाच्या कपट चालीने अलगद पिंज-यात अडकू लागलो. निसर्गचक्र खंडीत करण्याचा परिणाम पुढे होणार काय? आम्ही आता संपत चाललो तुमचे पुढे होणार काय? चिऊ-काऊ, वाघ-सिंहाच्या गोष्टीच नुसत्या पुढच्या पिढीला सांगणार काय? प्रत्यक्ष बघण्याचा धरला जर हट्ट त्यांनी तर तुम्ही दाखविणार काय?" वाघाच्या त्या सरबत्तीने मला काही सुचेना, काय त्याला उत्तर द्यावे मजला काही उमजेना. पाहून माझी ती अवस्था तो वाघ मोठयाने हसला, "माझा एक फोटो काढ." ऐटीत तो मला म्हंटला. पडत्या फळाची आज्ञा मानून मी कॅमेरा हाती घेतला, दुधवाच्या जंगलातील वाघाचा एक फोटो अलगद टिपला. वाघ हळूच मागे वळला दोन पाऊले चालत गेला, अचानक तो फिरूनी वळला आणि हसूनी मला म्हणाला.... "जगला वाचलास तर... हो फोटो मानवाच्या पुढच्या पिढीला दाखव... ...आणि त्यांना सांग, दुधवाच्या जंगलात, मी एक वाघ पाहिला... ...खरंच, दुधवाच्या जंगलात मी एक जीवंत वाघ पाहिला."

वाचन 4338 प्रतिक्रिया 0