व्हॅलंटाईन डे - गिफ्ट कोणती घ्याल?
व्हॅलंटाईन डे आता तोंडावर येऊन ठेपला आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी आपल्या प्रेयसी/ प्रियकरासाठी भेटवस्तू घेतल्या असतील (इथे नवरा/ बायको या नात्यालाही प्रेयसी/ प्रियकर या असंभव नात्याने गौरविले आहे!!!). ज्यांनी भेटवस्तू अगोदरच घेतल्या असतील त्यांच्या आत्म्याला तो आकाशातला प्रभू (विप्र नव्हे!!) क्षमा करो.........
पण ज्यांनी अजून भेटवस्तू घेतल्या नसतील (यात बहुतेक पुरूषमंडळी येतात!!!!!) त्यांच्या उपयोगासाठी हे मार्गदर्शन आम्ही देत आहोत.........
आपापल्या प्रेयसीसाठी या व्हॅलेंटाईन डे ला काय गिफ्ट घ्यावी? (प्रियकरासाठी काय गिफ्ट घ्यावी याचं मार्गदर्शन मिपावरल्या अनेक समर्थ भगिनी करतीलच!!! त्यामुळे तो विषय आम्ही त्यांच्यावर सोपवत आहोत!!!!!)
तर मित्रांनो आपल्या प्रेयसी/ बायको/ दिलकी धडनक/ माल/ सामान/ टपोरी इत्यादी असलेल्या पोरीसाठी (इथे पोरगी हा शब्द भलत्याच व्यापक अर्थाने वापरला आहे!!!!) भेटवस्तू घेतांना खालील गोष्टी लक्षात घ्या..........
१. नुसतं ग्रीटींग कार्ड द्यायचा बावळटपणा कधीही करु नका. नाही म्हणजे तुम्हाला हवं तर ग्रीटींगकार्ड द्या पण त्या खेरीज वेगळ्या गिफ्टची अपेक्षा असते हे ध्यानात घ्या....
२. तिला कविता/ लेख/ कथा वगैरे देऊ नका. पहिल्या वर्षी ही भेट कदाचित चालेल कारण तेंव्हा सगळंच रोमँटिक असतं. पण दुसर्या वर्षापासुन हे द्याल तर, "मला माहिती होतं तू अस्साच कंजूष आहेस ते!!!! लेख/ कविता/ कथाच द्यायची होती तर मिपाशीच संसार करायचा होतास!!!" हे ऐकावं लागेल......
३. व्हॅलेंटाईन डे ची भेटवस्तू म्हणून मिक्सर, कुकर, ज्युसर, टोस्टर इत्यादी एकही गृहोपयोगी वस्तू खरेदी करू नका. यात स्त्रिया आपला सर्वात मोठा अपमान समजतात. "ह्या मेल्याला मी म्हणजे काय स्वयंपाकघरात राबणारी मोलकरीण वाटले?" अशी प्रतिक्रिया येईल!!! तेंव्हा आपल्याला जरी या गोष्टी कितीही उपयुक्त वाटल्या तरी त्यांच्याजवळ फिरकूही नका....
४. आपल्या प्रियतमेला कपडे घेऊ नका. आपल्या प्रियतमेला आवडतील असे कपडे घेणारा पुरूष अजून तरी जन्माला आलेला नाही. आपले पूर्वज फार हुशार होते कारण ते वल्कलं वापरायचे! आपण अतिशहाणे झालो आणि कपड्यांचा स्वीकार केला. आता भोगा त्याची फळं!!!! आपण कितीही काळजीपूर्वक कपडे निवडले तरी ते एकतर योग्य कापडाचे नसतात, किंवा त्यांचा साईझ/ रंग/ टेक्श्चर बरोबर नसतं किंवा आपल्याला लेटेस्ट फॅशन म्हणजे काय ते अजिबात माहिती नसते!!!! आणि तुम्ही जर सांगितलंत की "बाई गं, त्या दुकानातल्या बाईनेच हा डेस काढून दिलाय तरिही कॉमेंट येणारच, "हो! तिला काय कळतंय? तिने गोडगोड बोलून गंडवलं तुला!! आणि तू पाघळलास!!!!" तेंव्हा या विषाची परीक्षा घेउच नका!!!!!
५.अत्तरं, इसेन्शियल ऑईल्स, बाथसेंन्टस मुळीच घेऊ नका!! कारण ते जरी कितीही महाग आणि दुर्मिळ असले तरी, "मला माहितीये तुझ्या मनात काय आहे ते!!!! तुला दुसरं काही सुचतच नाही का रे?" हा प्रश्न येणार......
६. फुलं/ गुलाबं: हंऽऽऽ!!!! आपापल्या जबाबदारीवर घेऊन बघायला हरकत नाही!!! तुमची प्रेयसी कोण आहे यावर सगळं अवलंबून आहे. जर नव्याची नवलाई असेल तर खपूनही जाईल!!!! मला मात्र २१ डॉलरचा लालभडक गुलाबाचा गुच्छ घेऊन गेल्यावर, "काय हे! जरा तरी डोकं चालव!! या २१ डॉलरमध्ये किती पापलेटं आली असती माहितीये!!!" असा एका सिकेपीकाकूकडून एकदा अहेर मिळाला होता.....
७. चॉकलेटः आपली प्रेयसी जर अगदीच पाप्याचं पितर असेल तर चॉकलेटं चालतील. पण तिला जर का आपण अंगाने भरलेलो आहोत (प्रत्यक्षात असूदे वा नसूदे, तिचं परसेप्शन महत्वाचं!!!) असा संशय असेल तर तुम्ही मेलांत!!!! पुढला महिनाभर तरी दुसर्या खोलीत झोपायची तयारी ठेवा.....
८. दागिने: ही त्यातल्यातात सेफ भेट!!. त्यातही सोन्याचे दागिने निवडू नका!!! त्यांचा कस, घाट, तास बगैरे भानगडी समजून घेण्याची पुरूषांची बौद्धिक पात्रताच नाहिये. त्यापेक्षा खड्याचे दागिने घ्या. सेफ बेट!! बायकांनी आपण कितीही स्मार्ट आहोत असं दाखवलं तरी खड्यांमध्ये श्रेष्ठ्-कनिष्ट ठरवण्याची अक्कल देवाने त्यांच्यात घातलेलीच नाहिये!!!! तेंव्हा दागिने जर खर्या खड्यांचे असतील तर तुम्ही सुटलांत!!!! त्यातही पहिल्याच वर्षी एकदम महागाईतले खडे घेऊ नका!!!! पुढल्या वर्षी मग काय बोंबा मारणार? तेंव्हा पोवळं, मोती, नील, पाचू, माणिक असं चढत्या भाजणीने हिर्यापर्यंत पोहोचा!!! हिरे हे शक्यतो पहिलं मूल जन्माला आल्याच्यावर्षी!!! जेंव्हा तिला असं वाटत असतं की आपल्या नवर्याचं आपल्यावरचं प्रेम आता एकाएकी संपलं, त्या वर्षी!!!! मग एकदा मूल मोठं होऊ लागलं की मग व्हॅलेंटाईन डे ची चिंता करू नका, ते मूल तुमच्या दोघांच्या प्रेमाचं कांडण करणारच आहे......
काय मंडळी, तुमच काय मत?
वाचन
38517
प्रतिक्रिया
0