मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गट्टे के चावल : खास मारवाडी पेशकश

कैलासवासी सोन्याबापु · · पाककृती
अस्मादिकांचे सासर मारवाड प्रांत राजस्थान येथे असून जातिवंत खवय्ये लोकांचा हा भाग आम्हाला साहजिकच एकदम आवडतो, त्यात जावईबुआ (स्थानिक भाषेत पावणेसा) म्हणजे आम्ही जरा जास्त स्पेशल असतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर नाश्त्याला प्याज कचौरी अन काजूकतली असले मजबूत आयटम ते डिनरला खास मारवाडी गट्टे के चावल अन कढी हे प्रकार व्हाया लंच मध्ये तुपात पोहणारी दलाबाटी-चुरमा, बिकानेरी भुजिया सब्जी, पापड सब्जी असे सगळे असते. मारवाडी + जैन संस्कृती त्यातही १२ महिने कांदा लसूण न खाणारे बहुसंख्य लोक आजूबाजूला असणे ह्यामुळे मारवाडी जेवणात कांदा लसूण अजिबातच नसतो किंवा फार कमी असतो. त्याचा अनुशेष भरून काढायला दुधदुभते भरपूर वापरणे होते. दिवसभरातले हेवी खाणे जिभेला आवडत असले तरी जिभेला आवडणारे अन पोटाला सुद्धा मस्त वाटणारे एक प्रकरण आज आपणासमोर मांडतो आहे. अर्थात लेखक फक्त मी आहे बल्लवकर्म कार्यसिद्धी पूर्णत्वास नेणारी सौ.बापूसाहेब उर्फ आमची मारवाडीण होय (आहे मराठीच ती, पण मारवाड मे पली हुई. इतके सगळे लिहावे लागते, मागं कमरेवर हात ठेऊन उभी आहे मुकादमासारखी ती)

तर साहित्य खालील प्रमाणे.

१. बासमती तांदूळ – १ वाटी २. बेसन – १ वाटी ३. तेल – ४ टेबलस्पुन ४. दही – २ टेबलस्पुन ५. हळद – १/२ टी-स्पुन ६. तिखट – २ टी-स्पुन ७. जिरे – १ टी-स्पुन फोडणी करता ८. लवंग – ३-४ ९. काळीमिरी- ३-४ १०. दालचिनी- अर्ध्या बोटा इतका एक तुकडा (आमच्याकडे नव्हता) ११. तमालपत्र- १ १२. मसाल्याची वेलची – १ (काळी वेलची) १३. मीठ – चवीनुसार. 2016-11-14_01-52-26 प्रथम एका ताटलीत बेसन घेऊन त्यात अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ एकत्र करून , त्यात दोन चमचे दही आणि एक चमचा तेलाचे मोहन घालावे. हे सगळे एकत्र मळून त्यात गरजेनुसार पाणी घालून ते बेसन घट्ट मळून घ्यावे. मळून घेतल्यावर त्याच्या लांब लांब वळ्या करून (साधारण अंगठ्या इतक्या जाड) ठेवाव्यात. IMG_20161114_132248947 IMG_20161114_132541525 IMG_20161114_132703415 आता एका पातेल्यात पाणी गरम करून (अंदाजे लोटाभर) त्याला उकळी फुटल्यावर त्यात तयार गट्टा सुरळी अलगद सोडाव्यात. गट्टा सुरळी आधी पाण्यात बुडतात. त्या पाण्यावर तरंगायला लागल्या की त्या शिजल्या असे समजावे. मग त्या पाण्यातून काढून थोड्या थंड करून त्यांचे बोटाच्या पेरा इतके तुकडे करावेत. हे झाले आपले गट्टे तयार. IMG_20161114_133138512 IMG_20161114_133605377 IMG_20161114_133637472 2016-11-14_03-10-28 आता एका कुकर मध्ये २ चमचे (टेबल स्पुन) तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, तमालपत्र, मसाल्याची वेलची, दालचिनी घालून थोडे परतावे. आता त्यात कापून ठेवलेले गट्टे घालून ते अंदाजे दीड दोन मिनिटे परतावेत. परतणे झाल्यावर त्यात भिजवून ठेवलेले तांदूळ घालावेत. त्यावर हळद, तिखट अन चवीनुसार मीठ घालून नीट परतावे तांदूळ (अंदाजे २ मिनिटे). ते परतून झाल्यावर त्यात गट्टे उकळलेले गरम पाणी दोन वाट्या घालावे. हे महत्वाचे आहे कारण ह्याने एकतर ते पाणी वाया जात नाही अन गट्टे अंगच्या चवीत शिजतात. आपण पाणी गरम घालणार आहोत त्यामुळे कुकरचे झाकण लावून फक्त २ शिट्या घ्याव्यात. जास्त घेतल्यास भात मऊ होऊन पुलाव खराब होऊ शकतो. एक शिटी घेतल्यावर एलपीजी थोडा कमी करावा. अन दुसरी शिटी थोड्या वेळाने घ्यावी. IMG_20161114_134023859 IMG_20161114_134051448 IMG_20161114_134258749 IMG_20161114_134401516 दुसऱ्या शिटी नंतर कुकर गार होऊन झाकण पडेस्तोवर ठेवावा मग गट्टे के चावल गरमागरम सर्व करावेत. गट्टे के चावल पारंपारिकरित्या आंबूस अन घट्ट कसुरी मेथी घातलेल्या मारवाडी कढी सोबत खातात. पण वेळ नसल्यास आपण कुठलेही एक रायते, किंवा ताजे फेटलेले घट्ट दही थोडे तिखट मीठ अन जिरेपूड घालून सोबत खायला घेऊ शकता. आम्ही बुंदी चे रायते ठेवले होते. 2016-11-14_03-10-44

वाचन 29982 प्रतिक्रिया 0