मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा संपादकीय - पुलं, ओबामा आणि एकविसाव्या शतकातले मराठीपण.

संपादक · · विशेष
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
पुलं, ओबामा आणि एकविसाव्या शतकातले मराठीपण
विसावे शतक जेव्हा चाळीशीत शिरले तेव्हा विशीत आलेले पुलं आज हयात असते, तर परवा त्यांनी नव्वद वर्षे पूर्ण केली असती. त्यांच्या साहित्याबद्दल, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाबद्दल नव्याने काही लिहिण्याची गरज नाही. त्यांच्या पश्चात त्यांचे लेखन तितकेच लोकप्रिय आहे. अजूनही 'व्यक्ती आणि वल्ली'ची पारायणे होतात, 'ती फुलराणी'चे प्रयोग रंगतात आणि रोजच्या वापरात अनेकदा त्यांचे विनोद, त्यांची वाक्ये ओठांवर येतात. बराक ओबामाची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड होणे हे अनेक दृष्टींनी प्रतीकात्मक आहे. केनियन वडील, कॅन्सस राज्यातील आई, हवाईत जन्म, इंडोनेशियन सावत्र वडिलांमुळे तिथे गेलेले बालपण आणि तिथल्या मुस्लिम (आणि काही प्रमाणात हिंदूही?) धर्माचा पडलेला प्रभाव. तीन खंडांत पसरलेले नातेवाईक, दोन वेगवेगळ्या वर्णांचे आईबाप आणि तीन धर्मांशी अगदी लहान वयात झालेली तोंडओळख. या आठवड्यात घडून आलेल्या ह्या दोन वरवरच्या वेगवेगळ्या गोष्टींची सांगड घालण्याचे कारण काय? विसाव्या शतकात मराठी भाषक समाजाच्या संस्कृतीवर ज्यांनी प्रभाव पाडला, अशा मोजक्या व्यक्तिमत्वांमध्ये ज्यांचे नाव घ्यावे लागेल असे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि दुसरा राजकीय क्षितिजावर वेगाने वर आलेला, अनेकांच्या आशा ज्यावर केंद्रित आहेत असा तारा. दोघांची तुलना शक्य नाही, आणि तसा या लेखाचा उद्देशही नाही. (थोडा बादरायणी) उद्देश आहे तो, ओबामा ज्या जागतिकीकरणाचे प्रतीक म्हणून पाहता येईल त्या प्रक्रियेचा, पुलंनी त्यांच्या साहित्यात रेखाटलेल्या विसाव्या शतकातल्या मराठी समाजाच्या ओळखीवर भविष्यात होणार्‍या अपरिहार्य परिणामांचा वेध घेण्याचा. * * * जागतिकीकरण आणि मानवसमूहांचे होणारे स्थलांतरण या पूर्वापारपासून घडणार्‍या घटनांना अधिक वेग आल्यावर काय होईल, याची एक चुणूक ओबामाच्या निवडीतून मिळते असे मानायला हरकत नसावी. इंग्रजीचा, अमेरिकीकरणाचा मारा होत असला तरी बर्‍याच संस्कृती आपापली स्वतंत्र ओळख अद्याप टिकवून आहेत. पण जरी असे असले, तरी कमीअधिक फरकाने या भाषांना आपले स्वत्व टिकवून ठेवण्याची धडपड करावी लागते आहे. रेड इंडियन जमातीच्या सू, टिवा सारख्या भाषा जर आज जात्यात असतील तर कर्नाटकातील तुळूसारखी भाषा सुपात आहे. हिब्रू टिकवून ठेवण्यासाठी जसे परिश्रम घेतले गेले, तसे विशेष प्रयत्न केले नाहीत तर मराठीच्या वेगवेगळ्या बोलींनाही काही दशकांनी याच स्थितीला सामोरे जावे लागेल. अर्थात, भाषा हे संस्कृतीचे प्रतिबिंब मानले तर हे कितीही अप्रिय असले तरी अपरिहार्य आहे. मालवणी आणि मराठीचे उदाहरण घेऊ. मच्छिंद्र कांबळींच्या नाटकांमुळे मिळालेली लोकप्रियता ही जमेची बाजू असली तरी मालवणी बोलता येणार्‍यांची संख्या आजच्या पिढीत - हळूहळू का होईना - रोडावते आहे. मुंबई किंवा इतर शहरांत होणारे स्थलांतर हे त्यातले मुख्य कारण असावे. शेवटी एका व्यापक अशा मराठी संस्कृतीचा भाग असल्याने, मराठीने मालवणीची म्हणा किंवा अहिराणीची म्हणा, जागा घेणे हे अपरिहार्य आहे. हाच धागा, जर पुढे वाढवून विचार केला तर काय दिसेल? कोकणातून किंवा खानदेशातून मुंबई-पुण्यात होणारे स्थलांतर जागतिक पातळीवर पाहिले तर विकसनशील देशांतून विकसित देशांकडे होणार्‍या स्थलांतरासारखेच, मात्र स्वतःची संस्कृती टिकवून ठेवण्याचे आव्हान तितक्याच प्रमाणात अवघड. रसेल पीटर्स हा भारतीय वंशाचा विनोदी कार्यक्रम करणारा अभिनेता (स्टॅंड-अप कॉमेडियन) म्हणतो, तसे की ही स्थलांतराची, वेगवेगळ्या वंशांचे लोक एकत्र येण्याची प्रक्रिया अशीच चालू राहिली, तर यामुळे जगातला वर्णभेद नाहीसा होईल. कारण जगातले सारे लोक एकाच मिश्र रंगाच्या विविध छटांचे बनतील. यातला विनोदाचा भाग सोडला, तर जागतिकीकरणामुळे आता कुणालाच एकटे, स्वयंभू, विसाव्या शतकातील सार्‍या बारीकसारीक वैशिष्ट्यांसह फार दिवस राहता येणार नाही हे खरे. फार पूर्वी, गोंडवन नावाच्या भूभागातून खंड तयार होऊन वेगवेगळ्या दिशांना वाहत गेले, त्याच्या उलट प्रक्रिया होऊन जग आता 'यत्र विश्वभवत्येक नीडम्' सारखे एकत्र येत राहील. ओबामा काय किंवा भारतीय वंशाचे व्ही. एस. नायपॉल, मॉरिशसच्या शीलाबाय बापू काय - हे केवळ या भविष्याच्या नांदीतलेच काही सूर. याचा परिणाम म्हणून मग अजून काही शतकांनी, डार्विनने मांडलेल्या जीवसृष्टीच्या नियमाप्रमाणे, सध्याच्या हजारो प्रचलित भाषांपैकी केवळ आर्थिक आणि संख्याबळाच्या दृष्टीने सामर्थ्यवान असणार्‍या काही मोजक्या भाषाच मागे राहतील. दहा कोटींच्या आसपास असणार्‍या समूहाकडून आज बोलली जाणारी, संख्याबळाच्या दृष्टीने जगातल्या पहिल्या पंधरा भाषांत गणना होणारी मराठी यापैकी एक असेल, असं मला वाटतं. पण तिचे स्वरूप - आपल्याला आवडो वा न आवडो, बदलत जाणार हे नक्की. संस्कृतीतील बदलाचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पुलंच्या लेखनाच्या आस्वादक्षमतेत पिढ्यांनुरूप झालेल्या फरकाचे घेता येईल. दुसर्‍या महायुद्धाची झळ सोसून तगून राहिलेला मराठी मध्यमवर्ग हा पुलंच्या लिखाणाचा केंद्रबिंदू. त्यांच्या आशा-आकांक्षा, अभावितपणे किंवा स्वभाववैशिष्ट्यांमुळे घडणारे विनोद, चाळीतून फ्लॅटमध्ये येतानाही जुन्या सवयी, संस्कार टिकवून ठेवण्याची धडपड या सार्‍यांचं चित्रण त्यांनी इतक्या जिवंतपणे केलं आहे, की उद्या एखाद्या समाजशास्त्रज्ञाला त्यात माहितीचा खजिना सापडेल. असा हा मध्यमवर्ग, किंवा त्याच्याशी नातं जोडू शकणारा वर्ग अजूनही टिकून आहे. पण त्यातले काही संदर्भ अपरिहार्यपणे बदलत आहेत. सा नंबरची ट्राम, भो पंचम जॉर्ज भूप, कुळकर्ण्यांची भजी, मिस मेरी भोर या गोष्टी माझ्या पिढीलाच ऐकून माहीत होत्या. पुढच्या काही पिढ्यांना मग 'टाकुनिया बाबा गेला'तले मूळ गाणे, तुडुंब प्रसन्न होणे मधली चपखल शब्दयोजना, 'वीट येणे' सारखे भाषिक विनोद हेही समजावून द्यावे लागेल. असे असले, तरी त्यांच्या लेखनातून सतत जाणवत राहणारा त्यांचा आनंदयात्री स्वभाव म्हणा किंवा 'जे जे आपणासी भावे, ते ते इतरांसी सांगावे' सारखी मार्मिक रसिकवृत्ती ही - त्यांचेच आवडते उदाहरण द्यायचे झाले तर - प्रलयातल्या पिंपळपानासारखी टिकून राहील, हे नक्की. पण असे व्हायचे असेल, तर विसाव्या शतकातील निकषांचा दुराग्रह धरणे योग्य होणार नाही. मराठीपणाची व्याख्या त्यासाठी विस्तारावी लागेल. सर्वसमावेशकतेच्या धोरणामुळे हिंदू धर्म इतकी वर्षे टिकला - भाषा आणि संस्कृतीबद्दलही तसेच धोरण स्वीकारणे भविष्यात भाग आहे. पाश्चात्यीकरणाला बळी पडावे, भाषेत बिनदिक्कत इतर भाषेतल्या शब्दांची भेसळ होऊ द्यावी असा याचा अर्थ नाही. पण त्या रेट्याला तोंड देताना, लवचिक धोरण स्वीकारणे भाग आहे. जे जे जपण्याजोगे आहे ते जपलेच पाहिजे यात काही वाद नाही, पण एकंदर 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पण्डित:' हे ध्यानी ठेवून वाटचाल करणे भाग आहे. यात मग परभाषेतल्या शब्दांचा स्वीकार, पोशाख आणि आहारपद्धतीतील बदल, लिखाणाचे नवीन नियम, धार्मिक कुळाचार हे सारे आले. बटाट्याच्या चाळीच्या शेवटी मनोगतात पुलंनी व्यक्त केलेली खंत त्या पिढीची प्रातिनिधिक आहे. 'ते हि नो दिवसा गता:'ची. मुली नोकरीसाठी बाहेर पडल्या म्हणून हळहळणारी, उद्याच्या पिढीतला अभिजीत मॅट्रिकच्या परीक्षेला जाताना वडीलधार्‍यांच्या पाया न पडता 'रॉक, रॉक' म्हणत जाईल असे भाकीत वर्तवणारी. या पिढीत किंवा पुढे येणार्‍या पिढ्यांत, आता ज्या गोष्टींबद्दल खंतावायचे त्या बदलतील पण धोंडो भिकाजी जोशींच्या त्या घड्याळासारखे, काटे वेळोवेळी बदलत्या काळाशी जुळवून घेत राहणे भाग आहे. अर्थात हे निर्णय, हे बदल सामाजिक पातळीपेक्षाही वैयक्तिक पातळीवर अधिक होतात. आशा करूया की, बाविसाव्या शतकात शांघायमध्ये वाढणार्‍या एखाद्या मराठी मुलाला नारायण बोहलं झाडतो म्हणजे काय करतो किंवा लग्नात नवरा हातरुमाल हवेत म्हणून का अडून बसतो; हे जरी नीट उमगलं नाही, तरी त्यातील काळा झालेला लाडू मुठीत धरून झोपी गेलेल्या नारायणाच्या मुलामागचे प्रतीक तरी समजेल. पाहुणा संपादक : नंदन.

वाचन 20915 प्रतिक्रिया 0