जन्मभर
लेखनविषय:
काव्यरस
नेसत्या वस्त्रानिशी मी
हा असा आता निघालो
ना कळे जन्मामध्ये या
काय मी कमवुन गेलो?
झाकण्या लाखो उणिवा
केवढी केली शिकस्त
दाटले आभाळ होते
मी दिखाव्यात व्यस्त
ल्यायलो रेशीम वस्त्रे
घ्यावया सन्मान खोटा
भाळलो का मी कळेणा
पाहता त्या चोरवाटा
जे मुळी नव्हतेच माझे
वाहिले आयुष्य त्यांना
वंदिले समजुन सूर्य
त्या भ्रमाच्या काजव्यांना
जाहला सूर्यास्त जेव्हा
पांगले सारे घरोघर
मग जणू मिटताच डोळे
जाणिला गुंता खरोखर
जन्मभर केला दिखावा
मानुनी आयुष्य त्याला
खेळ सारा जीवनाचा
तो चितेवर ज्ञात झाला
- शार्दुल हातोळकर
वाचन
1972
प्रतिक्रिया
0