कातर वेळ
कातर वेळी आभाळ भरुन
येणं फार वाईट असतं
----
संध्याकाळची ती वेळ
एकटाच खिडकीत उभा राहून
नुकत्याच अवतरलेल्या चंद्राकडे
पहात उभा होतो
कशी कोण जाणे पण
तुझी आठवण
त्या भरून आलेल्या
ढगांबरोबर वाहत आली
---
कातर वेळी आभाळ भरुन
येणं फार वाईट असतं
----
आभाळ इतकं भरलं
ढगांनी इतकी दाटीवाटी केली की
त्यांना आभाळ पुरेना
कोणता ढग कोणत्या ढगात
विलीन होतोय तेच कळेनास झालं
आणि मग गडगडाटाने सारा
आसमंत भरुन गेला
या सगळ्या गोंधळात
तो चंद्र दिसेनासा झाला
अन्
उगाच जीव कासाविस झाला
----
कातर वेळी आभाळ भरुन
येणं फार वाईट असतं
----
पाहता पाहता
त्या ढगांना ओझं असह्य होऊन
त्यांनी शरणागती पत्करली
जश्या समुद्राच्या लाटां वर लाटा
येतात
किनार्यावर
तश्या धारांवर धारा
बरसायला सुरवात झाली
आसुसलेल्या धरेवर
मला कळेचना की
असं थांबून थांबून
का बरसतोय आज पाऊस
मध्येच चंद्रही डोकावत होता
तो ही बहुतेक गोंधळला होता
बावरला होता
----
कातर वेळी आभाळ भरुन
येणं फार वाईट असतं
----
मग क्षणात पाऊस थांबला
थैमान शांत झालं
कोणीतरी वेदना शोषून घ्यावी
तसे ढगही नाहीसे झाले
आभाळं मोकळं झालं
चंद्र आपलं शितल तेज
पुन्हा ओतायला लागला
तेव्हा अचानक माझं लक्ष
खिडकीच्या काचेवरील माझ्याच
प्रतिबिंबाकडे गेले
माझेच डोळे मला रिकामे रिकामे
वाटायला लागले
त्या मोकळ्या झालेल्या आभाळासारखे
----
कातर वेळी आभाळ भरुन येणं
अन्
अश्या वेळी तुझी आठवण येणही
फार वाईट असतं
|- मिसळलेल्या काव्यप्रेमी -|
(२३/१०/२०१६)
वाचन
1948
प्रतिक्रिया
0