मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस

स्वाती दिनेश · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ह्या आधी- दीपशिखा . इस्टर्न व्हेनिस नावाने प्रसिध्द असलेल्या अलापुडा ह्या केरळमधल्या निसर्गरम्य गावामध्ये, एका रोमन कॅथोलिक कुटुंबात टेसीचा एप्रिल १९६४ मध्ये जन्म झाला. लहानपणापासूनच अभ्यासाबरोबरच खेळात आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटिज मध्येही ती उत्साहाने भाग घेत असे आणि बक्षिसे, ट्रॉफीज,कप्सही जिंकून आणत असे. उत्तम बॅडमिंटन खेळणार्‍या टेसीला आपण बॅडमिंटन चँपियन व्हावे असेही वाटत असे. पण नंतर मात्र बॅडमिंटन मागे पडले आणि त्रिशुर इंजिनिअरिंग कॉलेज मधून बी. टेक केल्यानंतर टेसी गायडेड मिसाइल्स मधील पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी पुण्यात आल्या.. त्याचं असं झालं, टेसीने आय ए एस ऑफिसरसाठीची लेखी परीक्षा दिली. त्यात अर्थातच त्या उत्तम गुणांनी पास झाल्याच पण विधीलिखित काही वेगळेच होते. डिफेन्स रिसर्च अँड ऑरगनायझेशन मधल्या मुलाखतीत त्यांची निवड तर झालीच पण आठवड्याभरातच त्यांच्या हातात दोन दिवसात रुजू व्हा असे पत्र पडले. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ह्या क्षेत्रात टेसी ह्यांनी पाउल ठेवले. पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी येथे एम टेक करत असतानाच टेसीचे सरोजकुमार पटेल ह्या आपल्या सहकारी मित्राशी भावबंध जुळले आणि दोघे लग्नगाठीने बांधले गेले. हे आंतरधर्मीय लग्न दोन्ही कडच्या आईबाबांनी चांगल्या पध्दतीने स्वीकारले. सरोजकुमार भारतीय नेव्हीत कमोडोर आहेत. मुलगा तेजसही इंजिनियर आहे. तेजसचे नाव त्यांनी डीआरडीओने विकसित केलेल्या भारताच्या लाढाऊ विमानावरून ठेवले आहे. कोणत्याही बाईसारखीच टेसीही करियर आणि घर सांभाळण्याची तारेवरची कसरत यशस्वीपणे करत आल्या. कित्येकदा मिसाइल प्रोग्राम आणि कौटुंबिक जाबाबादार्‍या ह्यांच्या रस्सीखेचीत दोन्हीचा तोल सांभाळणे कठिण होते. हे त्या अगदीच नमूद करतात. कुटुंबाचा आणि मित्रगणांचा भक्कम सपोर्ट असल्यामुळे त्या हे सारे यशस्वीपणे निभावून नेतात. इंडियन वूमन सायंटिस्ट असोसीएशनने तर टेसी ह्यांना घर आणि करियर उत्तमरीत्या सांभाळणार्‍या रोल मॉडेल म्हटले आहे. तसेच मिसाइल्सवर काम करताना एक बाई म्हणून त्यांना कोणताही वाईट अथवा वेगळा अनुभव आला नाही तर फक्त कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. एम टेक झाल्यानंतर डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी टेसी यांची अग्नी मिसाइल प्रोग्रामसाठी नेमणूक केली. काही वर्षातच त्यांनी क्षेपणास्त्राचे मार्गक्रमण अधिक अचूक कसे करता येईल ह्याबद्दलची क्षेपणास्त्र मार्गदर्शन प्रणाली विकसित केली. एवढ्यावरच न थांबता रिएन्ट्री व्हेइकल सिस्टिम विकसित केली. ह्यात क्षेपणास्त्र अत्त्युच्च वेगाने मेघ गर्जनेसारखा आवाज करत ३००० अंश से तपमानाला वातावरणात पुनःप्रवेश करते. जुलै २००६ मध्ये चाचणीउड्डाणात जेव्हा ७५ सेकंदांकरता क्षेपणास्त्र अचानक नियंत्रणाबाहेर गेले तेव्हा टेसी आणि त्यांच्या सहकार्‍यांची खरी सत्वपरीक्षा होती. हे आव्हान स्वीकारून १० महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर टेसी व त्यांच्या चमूने हे उड्डाण यशस्वी करून दाखवले. अग्नी ३, ४ आणि ५ वर काम केलेल्या टेसी ह्यांना मिसाइल वुमन ऑफ इंडिया ह्या सार्थ नावाने ओळखले जाते. अग्नि २ च्या पुढचे अग्नि ३ ह्या ३५०० ते ५००० किमी रेंजच्या क्षेपणास्त्राची संभाव्य सीइपी ४० किमी आहे. तर पूर्वी अग्नि २ प्राइम नावाने ओळखले जाणारे अग्नि ४ हे मिसाइल ३ ते ४००० किमी रेंजचे आहे आणि अग्नि २ व ३ मधल्या त्रुटी ह्यात भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. तुलनेने वजनाला हलके असून ते रोड मोबाइल लाँचरनेही उडवले जाऊ शकते. तर अग्नि ५ हे ५५०० किमी च्याही पुढे घुसणारे आणि कुठूनही मारा करता येऊ शकणारे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. आपल्या आण्विक अस्त्रांमधले ते अगदी बलशाली मिसाइल आहे ह्याचा डॉ. टेसींना सार्थ अभिमान आहे. आता अग्नि ६ वर काम चालू आहे. असे असले तरी ह्या शक्तिप्रदर्शक, विध्वंसक अस्त्रांकडे पाहण्याची त्यांची दॄष्टी मात्र 'शांतीचे अस्त्र' अशी आहे. सर्वत्र शांती नांदण्यासाठीची आवश्यक अस्त्रे! विरोधाभास आहे खरा! पण सद्य परिस्थितीत त्यांचे हे विधान किती खरे आहे याचीच खात्री पटते. टेसी ह्यांचे गुरु आणि आदर्श डॉ. कलाम ह्यांना मिसाइल मॅन ऑफ इंडिया म्हणतात त्यामुळे टेसी ह्यांना आपल्या ह्या टोपणनावाचा अभिमान वाटतो. मदर टेरेसा ह्यांच्या नावामुळे त्यांचे पाळण्यातले नाव टेसी ठेवले गेले आणि आता ही अग्निपुत्री मिसाइल वुमन ऑफ इंडिया झाली आहे.डॉ. टेसींना २०१४ साली वाय नायडूम्मा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित केले आहे..तसेच त्यांना क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात भारत स्वावलंबी बनण्यासाठीच्या मोलाच्या योगदानाबद्दल लालबहादुरशास्त्री राश्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतातील विज्ञानविषयक सर्वोच्च शांतीस्वरुप भटनागर पुस्काराने सन्मानित केले आहे. अशा अनेक पुरस्कारांनी ही अग्निपुत्री सन्मानित होवो आणि यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करो ह्याच खूप सार्‍या शुभेच्छा!

वाचन 14241 प्रतिक्रिया 0