दापोली एक रम्य स्थळ भाग -१ :- केशवराज आसुदबाग
पुर्वी मामाकडे आजोळी बांध-तिवरे येथे जायचो तेव्हा कुठल्या का कारणासाठी होईना आमच्या मामाची दापोलीची २ दिवसा आड एक फेरी ठरलेली असायची. तेव्हा मामा आईला "मी कापात जाऊन येतोय गं काय आणायचंय का? असे विचारत असे तेव्हा कापात म्हणजे काय हे कळायचे नाही. पुढे कळलं की कापात म्हणजे कॅम्पचा अपभ्रंश आहे. या गाववाल्यांनी खर तर कॅम्पचा उल्लेख कापात असा केला आहे.
इंग्रजांनी दापोलीचे महत्व ओळखले होते आणि त्यांच्या काळात एक कॅम्प दापोली येथे होता. इंग्रजांनी बांधलेले आल्फ्रेड गॅडनी हायस्कुल आजही तिथल्या मुलांच्या शिक्षणाची आस पुरी करत आहे. या शिवाय १९७२ साली बांधलेले कोकण कृषी विद्यापीठ ही दापोलीची शान आहे. बारमाही थंड हवेचं ठिकाण असल्याने मिनी महाबळेश्वर म्हंटले जाते शिवाय समुद्र किनारा जवळ या सार्या मुळे जागेच्या किंमतीचे भाव शहरी दरापेक्षा जास्त आहेत.
तेव्हा या दापोलीत अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. दरवर्षी श्रावणातील एक सोमवार कुलदैवताचे पुजनासाठी तिकडे जातो तेव्हा दापोलीला मावशीकडे २ दिवसांचा मुक्कम करायचा आणि उरलेल्या वेळेत एकेक करुन जमेल तशी ही स्थळे बघण्याचा कार्यक्रम असतो. या वेळी मी केशवराज हे विष्णुचे मंदिर पाहिले.
दापोलीतील मावशीचे घर:
"अभय घर बघ , अभय नळ बघ" काय जुना बालभारतीचा धडा आठवला ना?
हे मागल्या अंगणातले पाणी फुकट नाही जात आहे तर त्या पाण्यावर कासाळु , अळु, चिकु, पेरु, जास्वंद, फणस, सुपारीच्या २ पोफळी, माड एवढ्या झाडांना फिरवले जातं.
श्री. व्याघ्रेश्वराकडे जाणारा रस्ता. या रस्त्याला शेवटी ते इंग्रजी व्ही आकाराचे झाड दिसतंय ना तिथुन खाली तांबड्या रस्त्याला खाली उतरायचे की नारळी पोफळीच्या बाग आणि त्यामध्ये असलेली कौलारु घरे अशा रम्य पाऊलवाटेतुन तुम्ही केशवराजकडे पहिले पाऊल टाकता.
काय येत आहेत का सुर्यकिरणे खाली:-
कोकणातील सकाळंचं वातावरण काय मस्त असतं , नारळ पोफळीच्या बागांमधुन लपंडाव करत खाली येणारे सुंदर सोनेरी सुर्याची किरणे , कवडसे, धुकं आणि चुलीतुन वर वर जाणारा धुर, पावसाने धुतले गेल्यानंतर मातकट विटकरी रंगाची कौले आणि त्यांची कडेकडची बाजु मात्र हिरवी शेवळी म्हणजे जणु म्हणजे लाल जरीकाठची पैठणी आणि त्याला हिरवा पदर अस एकंदर रम्य वातावरण असतं. त्याला जोड असते ती पाटातुन खळखळ वाहणार्या पाण्याचा आवाजाची आणि विविध रंगीत पक्ष्यांच्या गुंजारवाची.
हाच तो साकव जिथे "गारंबीच्या बापु" या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते पण आता नुसतेच खांब उरले आहेत:-
आता तो पलिकडचा जो डोंगर दिसतोय ना तिथे वर चढयचंय फक्त २०० पायर्या. मग येताय ना?
हुSSश! दमलात ना ? पण हे काय हे आलंच केशवराज विष्णु मंदिर. देवळात विष्णुची २ फुटी काळ्या दगडाची मुर्ती उभी आहे. गाभारा साधासाच आहे.
मंडपा समोरील गायमुख आणि त्यातुन खाली दगडाच्या द्रोणीत पडणारे बारमाही झर्याचे पाणी. चवीला मधुर आणि उन्हाळ्यात सुध्दा थंडगार.
या झर्याचे उगमस्थान मंदिरासमोर असलेल्या डोंगरावरुन मंदिरापासुन थोडे उंचावर असलेल्या वडाच्या झाडाच्या मुळातुन होत आहे. या पाण्याला डोंगराच्या कपारीतच चर खणुन त्या पुढे पाटत सोडले आहे. हा पाट पण असा की त्यालाच दोन्ही बाजुला जे समांतर दगड आहेत त्यावरच आडव्या दगडी विटांच्या पायर्यांचे बांधकाम केले आहे म्हणजे तुम्ही त्या पायरीने वर जायचे आणि तुमच्या पायाखालुन तो पाटाचे पाणी वहात जाईल.
हे पहा से असे चर खणुन पाणी खाली आणले आहे.
चला वर जाऊया हे पाणी कुठुन येते ते पहायला.
मध्येच दगडाचीच एक चौकोनी छोटीशी द्रोण आहे ज्या मध्ये प्रवाह पुढे जातो आणि लाल माती खाली बसते. आहे की नाही कमाल?
अखेर मोठा कातळ लागला ज्यात बघा कसा चर खणला आहे पाण्यासाठी. याच्यावर तो संपल्यावर एक वडाचे झाड आहे त्यातुन हा झरा खाली वहात आहे. घसरण जास्त होती म्हणुन मी काही वरती गेलो नाही.
मंदिराच्या बाहेर देपोलकरांच्याच घरचे घरगुती कोकम सरबत प्यायला मिळाले. या मंदिराच्या पुजारी श्री. देपोलकरांची मागे झी टिव्हीला एक मुलाखत झाली होती. या मंदिराच्या आवारात जास्त थांबु दिले जात नाही आणि आजुबाजुला मानवी वस्ती नाही दुकान नाही आणि त्यामुळेच गडबड , गर्दी, प्लास्टीकचा कचरा या पासुन हा परिसर मुक्त आहे.
तुम्हाला जर ब्राम्हण पध्दतीचे जेवण करायचे असेल , तर येताना वाटेत लागणार्या ब्राम्हण कुटुंबात आगावु नोंदणी करावी म्हणजे दर्शन घेवुन परत येई पर्यंत जेवण तयार झालेले असते.
!! श्री केशवराज प्रसन्न!!
वाचन
9207
प्रतिक्रिया
0