मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आंब्याचा बदामी हलवा

गणपा · · पाककृती
नमस्कार मंडळी, मिपावरच्या आम्रोत्सवात आपलंही काही योगदान असावं म्हणून एका प्रदीर्घ विश्रांती नंतर पुन्हा तुमच्या सेवेसी रुजू व्हावे म्हणतो. नेहमी प्रमाणेच माझ्या या प्रयोगालाही आपलंसं म्हणाल याची खात्री आहे. साहित्यः  २ वाट्या आमरस, १ वाटी कॉर्न स्टार्च, २ वाट्या साखर (आमरसाच्या गोडीनुसार कमी जास्त)  सुका मेवा (काजू, बदाम) , केसर, वेलची पूड, साजुक तूप कृती :   एका नॉनस्टिक कढईत २ चमचे तूपात आमरस घालून परतावा.   एक उकळी आली की कॉर्नस्टार्च पाण्यात घोळून टाकावं व गुठळ्या न होऊ देता ढवळत राहावं. रस थोडा दाटसर झाला की त्यात साखर टाकावी.   मधे मधे चमचाभर तूप सोडत रहावं. आणि मिश्रण उलथण्याने हलतं ठेवावं. यामुळे त्यात हवेचे बुडबूडे तयार होत राहतील. ही प्रक्रिया किमान ४०-५० मिनिटे चालू ठेवावी.   जेव्हा कडेने तूप सुटू लागेल तेव्हा त्यात सुक्यामेव्याचे काप, वेलचीपूड, केशर टाकावे.  जेव्हा मिश्रण एकजीव गोळा होईल तेव्हा हलवा शिजत आला असे समजावे. जितका जास्त वेळ शिजवू तेवढा तो चिवट होत जाईल.  एका पसरट भांड्याला तुपाचं बोट लावून त्यात मिश्रण किमान २-४ तास थंड करत ठेवावं. लवकर थंड करण्यासाठी फ्री़जचा वापर टाळावा. थंड झाल्यावर सुरीने काप करावे.

वाचन 38411 प्रतिक्रिया 0