
.
माझ्या लेकीचा एक लाडका छंद म्हणजे फ्रीज वर लावायला वेगवेगळी Magnets जमवणे. सुरुवात झाली ‘मदर्स डे’ ला मलाच एक भेट म्हणून देऊन. मग आम्ही साउथ आफ्रिका मधून एक आणले. असे करत करत बऱ्याच आठवणीना ह्यात गुंफत गेलो खरे तर फ्रिजवर लावत गेलो. अशीच एक आठवण आपल्या मुंबईची तिने आणली – ‘डबल डेकर बस’.
मला ‘बेस्ट’ कायमच द बेस्ट वाटत आली आहे. त्यातही ‘डबल डेकर’ खास प्रिय! घरात मला चिडवतात सुद्धा की मी जर राजकारणात असते आणि माझा एक पक्ष असता तर त्याचे चिन्ह मी ‘बेस्ट’ची बस हेच ठेवले असते. (पण मग शंका आली की मी बसने फिरले असते का?)
लहान असताना मी खूप फिरले ह्यातून. आई, बाबा, मावशी आणि दादा (म्हणजे मावशीचे यजमान) ह्यांनी माझे खूप लाड केले. त्यातीलच डबल डेकर मधून मला फिरवणे हा एक कौतुकाचा प्रकार असे. ह्या बस मध्ये बसायला तमाम दुनियेचे म्हणजे प्रवाशांचे लक्ष वरील डेकच्या पुढच्या दोन सीटकडे असे. इतके लक्ष राजकारणी पुढाऱ्यांचे पण त्यांच्या खुर्चीकडे नसावे.
अगदी पहिल्या थांब्यावर जाउन बस पकडायची. नेमकी पहिली बस सिंगल डेकर यायची. मी हिरमुसले की मला सांगितले जायचे “अग, सगळी गर्दी गेली बघ. आता आपला पहिला नंबर आहे. म्हणजे तुला पुढची सीट नक्की मिळणार.” (असा कॉमन सेन्स माझ्याकडे लहानपणापासूनच नव्हता तर!)
थोड्या वेळाने संथ गतीने माझी लाडकी बस यायची. आता डबल डेकरला बघते तेव्हा वाटते जणू… डोक्यावर घागर घेऊन जशी हळुवार चाल असेल अगदी तशीच ही बस हळू हळू चालते. पण मला मात्र त्या हळुवार चालीचा आनंदच वाटायचा कारण खूप वेळ बस मधून प्रवास घडायचा.
तर अशी ही बस आली की मी सुसाट पायऱ्या चढायचे. माझ्या मागे मागे “अग हळू हळू, सावकाश, पडशील” असे संवाद चढायचे. पण मला मात्र कधी एकदा ती सीट पकडते असे व्हायचे. कंडक्टरला सवय असावी अशा बाल हल्ल्यांची. तो कौतुकाने बघत असे. मग बसल्या बसल्या तिथून दिसणाऱ्या ‘पॅनोरामिक व्यू’चा अंदाज घेतला जाई.
टिंग टिंग…
बस सुरु झाली की आपण डौलात चाललो आहोत असे वाटे. एरवी मी चिटुकली पिटुकली वाटणारी एकदम उंचच उंच भासे. आम्ही बरेचदा मरीन ड्राईव, चौपाटी, वरळी सी फेस, जुहु बीच अशा ठीकाणी जात असू. त्यामुळे खुपसा भन्नाट वारा फुकट खायला मिळत असे. शिवाय बोनस असेच बर्र का. आइसक्रीम, शेंगा असे इतरही काही बाही खायला मिळेच मिळे. (म्हणजे माझ्या खादाडीचे लक्षण तेव्हाच लहानपणी दिसले होते तर.) थोड्याच वेळात मी अगदी मोठ्या मनाने माझ्या सीटचा त्याग करे. (अच्छा, म्हणूनच मी राजकारणी होऊ नाही शकले का?) आणि पुढे येउन उभीच राहत असे.
आता लिहिताना पण जगतेय मी त्या गोड आठवणी. असं वाटतंय तो वारा अजूनही घुमतोय कानात. छेडतोय माझ्या केसांना. आणि मग डोळे बंद करून मोठ्ठा श्वास घेते अगदी तेव्हा घ्यायचे तसाच.
ह्या डबल डेकरचे दोन प्रकार होते. एक ज्यात ड्रायवरची केबिन बसला वेगळी जोडलेली असे आणि एक ज्यात ती बसचाच एक भाग असे. हा दुसरा प्रकार आमचा लाडका. पहिल्या प्रकारात दोन तोटे होते. एक तर वरून रस्त्याऐवजी ती केबिनच दिसत राही आणि सतत भीतीचे भूत मानगुटीवर असे की ही केबिन बसपासून वेगळी झाली तर बस कोसळेल. एकंदरीत लहानपणापासूनच जिकडे तिकडे ही ‘भीती’ नामक भुताची वेगवेगळी भावंडे माझ्या मानगुटीवर असत बहुदा.
डिसेंबर मध्ये मुलांबरोबर मरीन ड्राईवला गेले होते. तेव्हा ‘ओपन डेक’ डबल डेकर पहिली – ‘निलांबरी’. खास मुंबई पर्यटनासाठी असलेली MTDC ची भेट. ही भेट अनुभवायचा मानस नक्की आहे.

गेली जवळजवळ ८० वर्षे बेस्ट डबल डेकर बस मुंबईत आहे. आता त्यांची संख्या निम्यावर आली आहे. मध्यंतरी वाचनात आले होते की ह्या बसेस आता बंद होणार आहेत. २०२० पर्यंत नक्की असतील. पण त्यानंतर काय?
मी ही मोठी झाले आहे आणि आता माझा पाठलाग करणारे संवादही थकले आहेत. काही काळाच्या पडद्या आड गेले आहेत. ह्या आठवणीतून त्यांचाही स्पर्श अनुभवला. आज जर मी त्या सीट वर बसले तर बहुदा हेच गाणे ओठी असेल.
‘मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या गंधात धुंद मोहरते
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
का होते बेभान, कसे गहिवरते’
– उल्का कडले