मिसळ-मामलेदार स्पेशल
साहित्य-
१ वाटी हिरवे वाटाणे, १ मोठा चमचा धने, १ छोटा चमचा जिरे, ५-७ लवन्गा, ८-१० मिरी, १ वाटी सुके/ओले खोबरे, १ इन्च आले, १०-१२ पाकळ्या लसूण, ५-६ कान्दे, तेल, हळद, तिखट, डाळीचे पीठ, भावनगरी, बारीक शेव, पाणी, मीठ, ७-८ कढीपत्त्याची पाने, पाव
कृती-
आदल्या दिवशी वाटाणे भिजत घालावेत. मिसळ करतेवेळी ते उकडून घ्यावेत. ४ कान्दे उभे चिरून घ्यावेत. खोबरे किसून घ्यावे. मग धने, जिरे, लवन्गा, मिरी, कान्दा, खोबरे भाजून वाटून घ्यावे. आले-लसणीची पेस्ट करून घ्यावी. एका कढईत तेल टाकून त्यात आले-लसणीची पेस्ट व वाटलेला मसाला घालावा व परतून घ्यावे. थोडी हळद घालून त्यात वाटाणे घालावेत. पाणी घालावे. आवडीनुसार मीठ व तिखट घालावे. डाळीच्या पिठात पाणी घालून त्याची गुळगुळीत पेस्ट करून कढईत घालावी. कढीपत्त्याची पाने घालून १ उकळी आणावी.
तर्री-
एका कढल्यात तेल घालून ते तापल्यावर त्यात थोडी हळद व आवडीप्रमाणे तिखट घालून ग्यास लगेच बन्द करावा. ही तर्री कढईतल्या मिसळीवर ओतावी.
एका बोल मधे मिसळ घालून त्यावर भावनगरी, बारीक शेव, बारीक चिरलेला कान्दा घालून पावाबरोबर गरम गरम खावयास द्यावी.
वाचन
12868
प्रतिक्रिया
0