मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्राजक्त..

प्राजु · · जनातलं, मनातलं
माझी मैत्रिण मीनल गद्रे हिने पाठवलेली ही माहीती. आवडली म्हणून इथे देत आहे. शेफ़ालिका म्हणजे प्राजक्त. प्राजक्ताला आधी खूप दिवस फ़ुलं येत नव्हती. रंगरुपाने सामान्य असलेलं ते झाड बिचारं अबोल होऊन गुमसुम उभं असायचं. पानं काळवंडलेली उदास. वनातले इतर वॄक्ष फ़ुलांनी बहरुन गेलेले. देवानेच दया वाटून सांगितलं की, "बहरशील तु ही. पण फ़ुलांच हे लेणं मिळवायला तुला तपश्चर्या मात्र करावी लागेल. " प्राजक्ताने ती केली. दिवस-महिने-वर्ष उलटले. तपात रमून गेल्यावर फ़ुलांची असोशीचं फ़िकट झाली मनात. आणि एकदिवस पहाटे सुगंधी हिर्या माणकांनी डहाळी न डहाळी ओथंबली. प्राजक्ताच्या ह्या अवर्णनीय वैभवाकडे सारं वन मंत्रमुग्ध होऊन पहात राहिलं. पण प्राजक्ताला कसली जाणीवच नव्हती. तपातच दंग शेफ़ालिकेला शेवटी शेजारच्या एका वृक्षाने हलवून जाग आणली. वैभव? करू काय मी ह्याच? निरिच्छपणे काया झटकून दिली तिने ती सारी दौलत मातीत उधळून.. धुळीत पडल्यावर लखलखती हिरे माणकं जराशी मंदावली आणि सूर्याच्या पहाटेच्या किरणांत मोती पोवळ्यांच रुप ल्यायली. शेफ़ालिकेला आता हवं असो की नसो. तिच्या डहाळ्या रोज संध्याकाळी ह्या लालबुंद देठांच्या शुभ्र कांतिमान फ़ुलांनी सजत रहातात आणि उत्तररात्रीपासून त्यांची पखरण जमिनीवर ती करतच रहाते. बंगालमधे प्राजक्त खूप फ़ुलतो. आणि शगुन म्हणून घरात येणार्‍या सूनेची ओटी प्राजक्ताच्या फ़ुलांनी भरायची पूर्वीची रीत. काळाच्या ओघात, वैभव दाखवण्याच्या हौसेपायी त्यांची मोती पोवळी झाली. -- Meenal Gadre. Alpharetta,Georgia, U.S.A.

वाचन 8723 प्रतिक्रिया 0