गांधीजींची अहिंसा-उपयुक्तता आणि मर्यादा
लेखनप्रकार
There are many causes that I am prepared to die for but no causes that I am prepared to kill for."
महात्मा गांधी"
केदार जोशीनी अहींसा म्हणजे काय असा प्रश्न विचारला त्यानंतर गांधीजींची अहिंसा म्हणजे काय याचा मी शोध घेतला.गांधीजी म्हणतात की त्यांना एकच मार्ग माहीत आहे आणि तो म्हणजे अहिंसेचा(passive resistance).गांधीजींनी अहिंसेची प्रेरणा कस्तुरबा गांधींकडुन घेतलेली होती.गांधीजींची एखादी गोष्ट कस्तुरबांना पटत नसली तर त्या गांधीजींनी दिलेल्या त्रासाला सहन करत पण विरोधही करत.यातुन गांधीजींचे मन बदलले आणि बायकोवर हुकुम चालवायची त्यांची विचारसरणि कशी चुक होती हे त्यांना कळुन चुकले.पुढे विविध प्रकारच्या परीस्थितींमधुन गेल्यानंतर गांधीजींनी अहिंसा हाच एकमेव मार्ग आहे हे पक्के केले.गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव आहे.जे देश आणि समाज अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करतात त्यांनी आत्मसन्मान सोडुन बाकी सगळ्याचा त्याग करायला शिकायला हवे.त्यामुळेच अहिंसा हे कुठल्या भित्र्या माणसाचे नाही तर उलट धाडसी माणसाचे लक्षण आहे असे गांधीजी म्हणतात.शिवाय गांधीजींची अहिंसेची शिकवणुक सर्वांनाच पाळणे शक्य असते.त्यासाठी शरीरयष्टी,हत्यारे,साधनसामग्री यांची कशाचीच आवश्यकता नसते.त्यामूळे गांधीजींची ही अहिंसात्माक चळवळ भारतातील सामान्य जनतेत प्रचंड लोकप्रिय झाली.त्याचबरोबर गांधीजींनी सत्याला पण खुप महत्व दिले.ते म्हणतात की इतर सर्व गोष्टींपेक्षा माझे प्रेम अहिंसेच्या तत्वावर आहे.जर अहिंसेच्या तत्वाइतके कशावर माझे प्रेम असेल तर ते आहे सत्यावर.गांधीजी अहिंसा आणि सत्यामध्ये फ़रक बघत नसत.तर अहिंसा हे साधन आहे व सत्य हे साध्य आहे.त्यामुळे जर आपण साधनांची काळजी घेतली तर आपण साध्यापर्यंत पोहोचणारच यात काही शंका नाही असे गांधीजींचे मत होते.
आता मुख्य प्रश्न असा आहे की गांधीजींना कुठल्या परीस्थितीमध्ये हिंसा मान्य होती?म्हणजे एखाद्या ठिकाणी अन्याय होत आहे तिथे जर हिंसेशिवाय अन्याय रोखताच येत नाही तर हिंसा केलेली ठिक आहे का?यावर गांधीजींचे उत्तर आहे की हिंसा कुठल्याच ठिकाणी बरोबर नाही.गांधीजी फ़क्त एकाच परीस्थितीत हिंसा ठिक आहे ते सांगतात.ती परीस्थिती म्हणजे जर भित्रटपणा किंवा हिंसेतील एकाची निवड करायची असल्यास.गांधीजी म्हणतात अहिंसा हे धैयवान माणसाच लक्षण आहे ,भित्र्या माणसाचे नाही.भित्रटपणापेक्षा हिंसा बरी.पण कुठल्याही इतर ठिकाणि हिंसा त्यांना मान्य नाही.गांधीजींचा विरोध करताना त्यांची हिंसा हिटलर,स्टॅलिन यांच्यासमोर चालणार नाही असे म्हणतात पण गांधीजी म्हणतात की त्याही ठिकाणी अहिंसा हाच मार्ग आहे.गांधीजींनी ज्यु लोकांचा नाझी नरसंहार करत होती तेंव्हा सांगितले होते की ज्युंनी पण अहिंसात्मक मार्गानेच प्रतिकार करावा.ज्युंनी जर्मनीला सोडुन जाण्यास नकार द्यावा आणि त्यांच्याविरुध्द होणाया अन्यायासही विरोध करावा.वेळ पडल्यास स्वत:चा जीवही त्यांना अर्पण करावा.त्यामुळे कुठल्याही परीस्थितीत हिंसा गांधीजींना मान्य नव्हती.'यंग इंडीया’ मधील एका प्रकाशनात गांधीजींनी गुरु गोविंद सिंग,शिवाजी महाराज,राणा प्रताप,रणजित सिंग,लेनिन,डे वालेरा,केमालपाशा या सर्वांना 'misguided patriot' म्हटले होते.गांधीजींची हीच विचारसरणी भगत सिंग व इतर क्रांतिकारकांबद्दल होती.ते म्हणत की "भगत सिंगने हिंसेचा मार्ग देशभक्तीतुन घेतला.त्याच्या शौयापुढे आपण हजार वेळा नतमस्तक व्हावे पण त्याचा मार्ग चुकीचा होता.आपल्या देशात लाखो लोक दुर्बल आहेत.अशा ठिकाणी जर आपण न्याय खुनाच्या तत्वावर करणार असु तर आपली परीस्थिती फ़ार भयानक होईल.हिंसेचा धर्म आपण बनवल्यास आपलेच लोक आपल्याच अन्यायाचे लक्ष्य होतील."गांधीजींचा क्रांतीकार्याला विरोध एका अजुन कारणाने होता जो म्हणजे आपल्या देशाची मानसिकता.गांधीजी म्हणत की आपला देश म्हणजे तुर्की,आयरलंड किंवा रशिया नाहीये.त्यामुळे तिथल्या परीस्थितीत आणि आपल्या परिस्थितीत खुप फ़रक आहे.शिवाय क्रांतिकार्याला मास बेस नव्हता त्यामुळे ही क्रांति मासेस साठी काय करु शकेल असाही गांधीजींचा प्रश्न होता. याबाबत विचार केल्यास असे कळते की गांधीजी आपल्या अहिंसेच्या तत्वाबद्दल प्रमाणिक होते.हल्ली गांधीजींच नाव घेउन चालणारी माणसे त्यांच्या विचारांबरोबर प्रामाणिक नसतात.पण गांधीजी आपल्या पुर्ण अहिंसेच्या तत्वाशी प्रामाणिक होते.त्यासाठी इतर ऐतिहासिक नायकांच्या तत्वांना विरोध करणे गांधीजींनी टाळले नाही.पंजाबमध्ये शिख समुदायामध्ये गांधीजींनी व्यक्त केलेल्या गुरु गोविंद सिंगांच्या मताबद्दल नाराजी होती.गांधीजींना शिखांनी किर्पाण धारण करणेही आवडत नसे.
गांधीजींच्या मते अहिंसा हा मनुष्याचा स्थायीभाव असल्याने त्याने प्रश्न सुटतात तर हिंसेने प्रश्न अधिक बिकट होत रहातात्.त्याचबरोबर अहिंसेने मनुष्यात बदल होतो,मनुष्याचा आजार(हिंसा,अन्याय करण्याचा) बरा होतो व तो अन्याय करणे सोडतो.अहिंसा मनुष्यामनुष्यामधले परस्परप्रेमाचे नाते पक्के करते.त्यामुळे ब्रिटीशांविरुध्द लढतानाही गांधीजींचे ब्रिटीश जनतेवर तितकेच प्रेम होते जितके भारतीय जनतेवर होते.या दृष्टीने विचार केल्यास गांधीजींची अहिंसेची विचारसरणी संपुर्ण जगासाठी आदर्श ठरते.सध्याचे असणारे अनेक जागतिक बिकट प्रश्न परस्पर सहकार्याने व परस्पर प्रेमाने सुटु शकतील असे वाटते.शिवाय गांधीजींचा अहिंसात्मकरीत्या सत्याग्रह करण्याचा मार्ग त्या काळातील परीस्थितीनुसार भारतीय जनतेस रुचणारा होता.त्यामुळे गांधीजींनी स्वातंत्र्याची चळवळ सामान्य जनतेपर्यंत नेली व त्या चळवळीला उदंड प्रतिसाद मिळवुन दिला.सशस्त्र लढ्याचा मार्ग आपल्या भारतीय जनतेला रुचणारा नव्हता असे आपण म्हणु शकतो.कारण त्याला आवश्यक असणारी त्यागाची भावना त्या काळातील सर्वसामान्य भारतीय जनतेत नव्हती.सावरकर म्हणतात की मातॄभुमिसाठीची लढाई म्हणजे सतीचे वाण आहे.पण गांधीजींचा मार्ग सोपा होता.कायद्याला विरोध करत २-४ लाठ्या खाण आणि जेलमध्ये जाण त्या काळातील सामान्य जनतेला जास्त सोप होतं. गांधीजींच्या अहिंसेबद्दल अजुन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की निर्बल आणि हतबल माणसाला त्या पध्दतीने अन्यायाचा प्रतिकार करण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नाही.त्याचमुळे भगत सिंग्,स्वातंत्र्यवीर सावरकर व इतर क्रांतिकारकांनीही आपल्या तुरुंगवासात होणार्या अन्यायाविरुध्द अहिंसात्मक सत्याग्रहाचा व उपोषणाच्या मार्गाचा अवलंब केलेला दिसतो.म्हणजे गांधीजींच्या मार्गाचे जे कट्टर विरोधक होते तेसुध्दा दुसरा कुठला उपाय नसल्यावर त्याच गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करतात.
गांधीजींच्या मार्गाचा एक मुद्दा हा की जर सरकार अन्याय करत असेल ,सरकारकडे कितीही मोठी शस्त्र असु देत पण जर संपुर्ण जनतेनीच सविनय कायदेभंग केल्यास सरकारला अन्यायी राज्य करणे अशक्य आहे. हे म्हणजे सरकारची शक्तीच काढुन घेतल्यासारखे आहे.तुम्ही काहीही कायदे करा पण आम्ही ते अन्याय्य कायदे पाळणारच नाही पण आम्ही तुमच्यावर हल्लाही करणार नाही.अशा परीस्थितीत सरकार काय करेल?पण जेंव्हा समाजच आपापसात रक्तपात करायला उठतो तेंव्हा अहिंसेची चळवळ कितपत यशस्वी ठरु शकते हाही प्रश्नच आहे.दुसरी गोष्ट म्हणजे हिटलर्,स्टॅलिन,लादेन यांच्यासारख्या कृर राज्यकर्त्यांसमोर हा मार्ग फारसा प्रभावी ठरेल असे वाटत नाही.कारण हे आपल्या मार्गावर एका मोठ्या विचाराने आलेले असतात्.त्यांच्या हिंसेमध्ये त्यांना अन्यायाचा लवलेशही दिसत नसतो.शिवाय अहिंसेचा मार्ग एखाद्या व्यक्तीमध्ये परीवर्तन नक्कीच घडवु शकतो पण पुर्ण समुहात परीवर्तन घडवु शकतो काय्?मला वाटत एकाच वेळी नाही घडवु शकत्.मग दहशतवादासारखी समस्या यातुन सुटु शकते काय?याचेही उत्तर बर्यापैकी नकारात्मकच आहे.कारण तुम्ही एका कसाबला बदलाल तर दुसरा निर्माण होईल आणि तो रक्तपात घडवील्.त्याला बदलाल तर अजुन एक उभा राहील.म्हणजे ज्या समाजावर अन्याय होतोय त्याला सतत रक्तपातच सहन करावा लागेल्.शिवाय तुम्हाला तुमचा शत्रु माहीत असल्यास त्याचे मनपरीवर्तन तुम्ही करु शकता पण तुम्हाला तुमचा शत्रुच माहीत नाही तर तुम्ही काय कराल?
परीस्थितीच्या अनुसार हिंसा
आता आपण एखाद्या परीस्थितीमध्ये हिंसा बरोबर आहे का याचा विचार करु.स्वातंत्र्यवीर सावरकर याच्याबद्दल आग्रही आहेत्.ते म्हणतात की 'सापेक्ष अहिंसा हा सद्गुण आहे तर पुर्णपणे अहिंसा हा गुन्हा आहे'.सावरकरांचे मत स्पष्ट होते.तुम्ही जोपर्यंत हिंसा करता आहात तोपर्यंत आम्ही त्याचा प्रतिकार हिंसेनेच करणार.ते म्हणतात की सद्गुण अथवा दुर्गुण हे मुलतः फक्त गुण असतात्.परिस्थिती त्यांना सद्गुण अथवा दुर्गुण ठरवते.त्यामुळे परिस्थितीनुसार ठरवा.सगळ जग शस्त्र टाकुन परस्परप्रेमास तयार असेल तर आम्हीही आमची राष्ट्रभक्ती टाकुन देउ व त्यांना मिठी मारु.पण जर सगळे जग लढाईसाठी तयार होत असेल तर आम्हीही स्वतःची तयारी करु.आम्हीच अन्याय सहन का करावा?तो होउ नये म्हणुन आम्ही शस्त्रास्त्रांची नक्कीच मदत घेउ.ते जेंव्हा आक्रमक आहेत तेंव्हा आम्ही आक्रमक न बनल्यास ती आत्महत्या ठरेल असे सावरकरांचे मत होते.आततायी बळ हा अत्याचार आहे तर आततायांचा प्रतिकार करणारे बळ हा नक्कीच सदाचार आहे.आता पुढे विचार करताना आपण शिवाजी महाराजांचा विचार करु.शिवाजी महाराजांनीही सशस्त्र मार्गानेच स्वराज्य उभारले व जनतेवरचा अन्याय दुर केला.शिवाजी महाराजांनी तलवार उचलली नसती तर औरंगजेबाविरुध्द स्वराज्य निर्माण करता आले असते का?मला वाटते की ते शक्य नव्हते.शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करुन एका आदर्श राज्याचे उदाहरण दिले.सामान्य जनतेचे जमिनदारीसारख्या अन्याय्य पध्दतीपासुन सुटका केली.परधर्माबद्दल आचार कसा असला पाहीजे,स्त्रीया,वृध्द्,धर्मपुरुष यांच्याशी आदर्श व्यवहार कसा असला पाहीजे हे ही दाखवले.मग अशा प्रकारचे स्वराज्य व सुराज्य निर्माण करण्यास शस्त्राची मदत घेतल्यास काय चुकले?माझ्यामते तो मार्ग बरोबरच होता.गुरु गोविंद सिंग पण परिस्थितीला अनुसरुन हिंसा करण्याचा पुरस्कार करतात.ते झफरनामामध्ये म्हणतात की 'जेंव्हा इतर सर्व मार्ग बंद होतात तेंव्हा शस्त्र हातात घेणे बरोबर आहे.'त्यामुळेच तलवारीलाच ते दुर्गा म्हणतात व तीच आपल्याला विजय प्राप्त करुन देईल असेही सांगतात्.
गुरु गोविंद सिंग तलवारीचा वापर आक्रमणासाठी करायचा नाही तर स्वसंरक्षणासाठी करायचा असे सांगतात.किर्पाण जे शिखांचा पाच ककारांसाठी आहे ते अहिंसेचे साधन मानले गेलेले आहे.कारण हिंसा थांबवणे हे अहिंसेचे सुत्र शिख धर्म मानतो.त्यामुळे दुर्बलावर होणारी हिंसा रोखण्यासाठी जेंव्हा इतर सर्व मार्ग असफल होतात तेंव्हा किर्पाणचा वापर शस्त्र म्हणुन करणे हीच अहिंसा आहे असे शिख मानतात.त्यामुळे सत्य व तलवार हे एकत्र असल्यास ते न्याय्य आहे व ती अहींसाच आहे .अन्यायाविरुध्द लढण्यासाठी तलवार वापरणे फक्त बरोबरच नाही तर तेच न्याय्य आहे असे गुरु गोविंद सिंग सांगतात.कृर व्यक्तींच्या अन्यायापासुन निर्बल जनतेचे शस्त्राच्या सहाय्याने रक्षण न केल्यास हिंसा वाढण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे तेथे शस्त्र उचलणे आवश्यकच आहे असेही गुरु गोविंद सिंग सांगतात.
निष्कर्ष??
दोन्ही बाजुंचा वस्तुनिष्ठ विचार केल्यास नक्की बरोबर काय आहे हे ठरवणे अवघड होते.कारण गांधीजींचे "An eye for an eye makes the whole world blind."हे मतही बरोबर आहे.शिवाय कुठली हिंसा न्याय्य व कुठली अन्याय्य यातील सीमारेशा वास्तविक हिंसाचाराचा विचार करताना पुसट होतात्.शिवाय आपल्याबरोबर आता ते धर्मगुरुही नाहीत.त्याचबरोबर एकच गोष्ट वेगवेगळ्या लोकांना न्याय्य अथवा अन्याय्य वाटु शकते.आता अमेरीकेने इराकवर हल्ला केला हे अमेरीकन्सना न्याय्य वाटते तर इराक्यांना अन्याय्य वाटते.एका जनसमुहाचा क्रांतिकारक दुसर्या जनसमुहाचा दहशतवादी असतो.शिवाय आधुनिक संहारक शस्त्रास्त्रांचा विचार केल्यास शस्त्रांचा प्रयोग हा कुणाना कुणावर तरी अन्याय करतच असतो.कारण या शस्त्रास्त्रांमुळे होणारी मनुष्यहानी अनेकदा सामान्य्,निर्बल जनतेचेच जीव घेताना दिसते.त्यामुळे तो हिंसाचार आपोआपच अन्याय्य ठरतो.सर्वच राष्ट्रांचे सम्हारक शस्त्र एक दिवस संपुर्ण मनुष्यजातीलाच संपवतील का??का उलट ही संहारक शस्त्रे युध्द रोखण्यासाठी उपयोगी ठरतील्.उदा.भारत्-पाक युध्द व्हायची परिस्थिती बर्याचदा आली पण दोघांनीही अण्वस्त्र वापरली जातील म्हणुन युध्द टाळले.मग असे असेल तर अण्वस्त्रांमुळे अहिंसेला मदत झाली असे म्हणावे का??आणि जर जगातले सर्वच राष्ट्र युध्दाची तयारी करत असतील तर आपणच युध्दविरोधी भुमिका घेउन असे काय साध्य होणार आहे??याने हिंसा तर थांबणार नाहीच पण आपला तोटाही होईल्.जर असे असेल तर आपणच ही वाट का धरावी??ओशो म्हणतात की युध्द हा मनुष्याचा स्थायीभाव आहे.युध्द हे नेहमीच मनुष्याबरोबर राहिलेले आहे.त्यामुळे युध्द चुकीचे आहे म्हणनेच चुक आहे.त्यामुळे न्याय -अन्याय याचा फारसा विचार न करता आपण युध्दाकडे सकारात्मक दृष्ट्या पहावे का??मला वैयक्तिक दृष्ट्या सर्व गोष्टींचा विचार केल्यास सावरकरांचे प्रतिकार म्हणुन हिंसेचे तत्व योग्य वाटते.वाचकांनी या शेवटच्या परीच्छेदामधील प्रश्नांची त्यांची उत्तरे जरुर कळवावीत.
चिन्मय कुलकर्णी
वाचन
15867
प्रतिक्रिया
0