मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा संपादकीय - आधुनिक वैद्यकातली नीतीमत्ता आणि कट प्रॅक्टिस उर्फ़ रेफ़रल फ़ी

संपादक · · विशेष
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचावयास मिळेल! धन्यवाद...
आधुनिक वैद्यकातली नीतीमत्ता आणि कट प्रॅक्टिस उर्फ़ रेफ़रल फ़ी
आधुनिक वैद्यकातली प्रगती म्हणजे नेमके काय ? असा हल्ली प्रश्न पडत राहतो.. हा विचार मनात येण्यास खालील कारण घडले... प्रसंग १. आमच्या भागात नुकत्याच सुरू झालेल्या एका मोठ्या उद्योगपतीच्या नावाने निघालेल्या हॊस्पिटलच्या उद्घाटनाची बातमी वाचून माझे एक नातेवाईक आनंदाने म्हणाले," वा...या हॊस्पिटलात गरीब रुग्णसेवा होणार बरंका.. १५ ते २० % खाटा गरीब रुग्णांसाठी राखीव असणार आहेत इथे असं लिहिलंय "... त्यांच्या उत्साहाला आणि सकारात्मक विचारसरणीला खोडून काढणं मला बरं वाटेना. इतकंच म्हणालो, " खरंच असं झालं तर आनंदाचीच गोष्ट आहे " प्रसंग २. शाळेत शेजारच्या तुकडीत शिकणारा एक मित्र पंधरा वर्षांनी भेटला. आता डॉक्टर झालाय. म्हणाला, मस्त प्रॅक्टिस चालू आहे. मला आनंद वाटला. म्हणाला, " ... आपण पेशंटला नुसतं पाठवायचं या हॊस्पिटलला , त्या कन्सल्टंटकडे , त्या लॆबोरेटरीमध्ये आणि महिन्याच्या महिन्याला कमवायचे. मजबूत धंदा आहे माहितेय? शिवाय आपल्याला टेन्शनच नाही ना काही... बाकी सारं ते बघून घेणार... " इतकं अभिमानानं सांगत होता तो ... कॉलेजात शिकताना वैद्यकीय नीतीमत्ता आणि न्यायतत्त्वशास्त्र (medical ethics and jurisprudence) अभ्यासाला होते. त्यात पेशंटचे भले करावे, आणि जेव्हा भले होत नसेल तेव्हा निदान त्याला इजा होऊ नये इतपत तरी काळजी घ्यावी, असले मुद्दे शिकल्याचे आठवते. त्यातले स्वत:ची आणि इतर उत्पादनांची जाहिरात करू नये, पाटीचा आकार अमुक फ़ूट x तमुक फ़ूट पेक्षा मोठा नसावा असलेही काही मुद्दे होते. ते तेव्हा थोडे वेगळे वाटले होते. आता पाटीचा आकार किती असावा यात कसली आलीय नीतीमत्ता ? आणि कोण पाळतंय ती ? इमारतीची संपूर्ण रुंदी भरून पाट्या पाहतोच की आपण. केबलटीव्हीवर जाहिराती , इंटरनेटवर जाहिराती काय कमी आहेत? ते तर जाउद्यातच.. सोशल रेलेव्हन्स : हल्लीचं वैद्यकीय जग फ़ार आधुनिक झालेलं आहे असं आपण म्हणतो तेव्हा आपल्याला नक्की काय अपेक्षित असतं? विविध चाचण्या एक्स रे, एम आर आय, सी टी स्कॆन किंवा ऎन्जिओप्लास्टी, बायपाससारख्या उपचारपद्धती त्यावर होणारी विविध सशोधनं इ...इ सारं तर आहेच. डॉ.अभय बंग यांनी वापरलेला सोशल रेलेव्हन्स हा शब्द मला फ़ार महत्त्वाचा वाटतो.म्हणजे नुसती नीतीमत्ता असून उपयोग नाही तर तुमच्या कामाचा सोशल रेलेव्हन्सही हवा..... पीजीआय चंदीगढसारख्या एका नावाजलेल्या हृदयरोगोपचार केंद्रात काम करत असताना तिथलं आधुनिक संशोधनावर होणारा खर्च पाहून त्यांना जवळजवळ डिप्रेशन आलं, .. ग्रामीण आरोग्य केंद्रात औषधाला पैसे नाहीत आणि इकडे इतक्या महागड्या यंत्रणेवर पैसा खर्च करण्यात सोशल रेलेव्हन्स तो काय? प्रवेश परीक्षेला पहिलं येऊनही शेवटी त्यांनी ती संस्था सोडण्याचा निर्णय घेतला...सगळ्या स्टाफ़ला धक्का बसला.... त्यानंतर पीजीआयमध्ये थोडे आत्मचिंतन झाले आणि त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिने ग्रामीण सेवा सक्तीची केली..... आता या प्रकारची सामाजिक जाणीव शिकवून येते का ? की सामाजिक जाणीवेची ४ लेक्चर्स ठेवली विद्यार्थ्यांना आणि त्यांना आपल्यावरच्या जबाबदारीची जाणीव झाली? आता सेवा, सामाजिक जाणीव वगैरे जाउद्यातच...ते फ़ार थोर शब्द झाले. ...माझ्याकडे एक ज्येष्ठ जीपी डॊक्टर आलेले होते.... कुठल्यातरी मल्टिलेव्हल कंपनीचे मार्केटिंग करायला.... ....ते म्हणाले," मी यांचीच प्रोटीन पावडर घ्यायला लावतो पेशंटला".. मी म्हणालो, "अहो या डब्याची किंमत तर हजार रुपये आहे...बाजारात शंभर रुपयांत मिळते की चांगली प्रोटीन पावडर .. ".. ते म्हणाले, "तरी पेशंट आपलं ऐकतात, आपण सांगू तीच पावडर घेतात.. म्हणजे बघा केवढा बिझनेस..." मला अगदी शिसारी आली.. पेशंटच्या विश्वासाची अशी वाट लावतात हे लोक... आणि मग काही पेशंट येऊन सांगतात ," त्यांच्या प्रोटीन पावडरमुळे माझी शुगर नॊर्मलला आहे... महिन्याला हजार रुपयांची प्रोटीन पावडर घेतो.. छान आहे. "... या पेशंटची शुगर त्याच्या इतर साखररोधक औषधांमुळे योग्य पातळीत आहे हे त्याला समजत नाही...वर्षाला हा पेशंट बारा हजार रुपये उगीचच खर्च करतोय.. केवढी ही प्रचंड लुटालूट... !!!( आणि त्या पेशंटची लूट होतेय हे त्याला समजावून न सांगणारा आणि कशाला त्या जीपीबरोबरचे संबंध बिघडवा असं समजणारा मी एक घाबरट) आरोग्यसुधारक मश्रूम्सचेसुद्धा असेच मल्टिलेव्हल मार्केटिंग करणारे पुष्कळ डॉक्टर आहेत... याला जोडधंदा म्हणावं का ?महागड्या कंपन्यांचीच औषधं रुग्णाला घ्यायला लावणारीहे खूप असतात. याचं समर्थन करावं का ? कोणास ठाउक? एखादा डॉक्टर फ़ी का घेतो? तर त्याने पेशंटला बरं करण्याची जी जबाबदारी घेतली आहे आणि त्यासाठी ५ ते १० वर्षे केलेल्या त्याच्या अभ्यासाप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे जी जोखीम पत्करलेली आहे, त्या प्रमाणात तो त्याचे मानधन आकारणार... पेशंटला परवडलं तर तो देणार नाहीतर दुसरा स्वस्त डॊक्टर शोधणार....पण या कट प्रॆक्टिसमध्ये होतं काय की कमीतकमी (! की शून्य) जोखमीत उगीचच रेफ़र करणारा डॊक्टर पैसे कमावणार, तेही थोडेथोडके नाहीत तर ३५ % किंवा ४० %. म्हणजे रुग्ण त्याच्या नकळत खर्या वैद्यकीय खर्चाच्या ४० % पैसे जास्त देणार....ही सगळी उपचाराच्या खर्चाला आलेली सूज आहे. पण या सुजण्याचे ऒपरेशन कोण करणार? काही चांगले लोक इस्पितळ काढतात... सुरुवातीला असे जाहीर केले जाते की आम्ही कट देणार नाही पण नंतर कटविना परिस्थिती अवघड होत आहे हे त्यांच्या लक्षात यायला लागतं... मग हळूहळू निर्धार गळून पडतो. पुन्हापुन्हा हॊस्पिटल व्यवस्थापनाच्या मीटिंग्स होतात. आणि कट द्यायला हिरवा कंदिल मिळतो.विविध जीपींना ३५ % ते ४० % ऒफ़र करत पीआरओ पंचक्रोशीत हिंडायला लागतात...कटला रेफ़रल फ़ी हे छान नाव मिळतं.. मग हॊस्पिटल त्यांचे चार्जेस अजून वाढवतं. एक मोठे हॊस्पिटल १० % सरसकट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्ज लावतं. ( कोणत्याही इन्शुरन्समध्ये तो समाविष्ट होत नाही).हॊस्पिटलच्या ज्येष्ठ डॊक्टरांच्या मीटिंग्जमध्ये या महिन्यात फ़ार कमी इन्व्हेस्टिगेशन्स का झाल्या , इतके कमी सी टी स्कॆन का झाले ? अशा चर्चा घडतात आणि टार्गेट्स फ़िक्स होतात... गरज असो वा नसो ऒपरेशन्स आणि इन्व्हेस्टिगेशन्स होतात. संपूर्ण वैद्यकजगताने हे कट प्रॆक्टिसचे वास्तव स्वीकारले आहे. पण या कटला विरोध न करणं म्हणजेसुद्धा आधीच आजारानं त्रासलेल्या पेशंटला रेफ़र करणारा जीपी आणि ते महागडं हॊस्पिटल यांच्यातल्या दलालीला उत्तेजन इतकंच.पण एकटा पेशंट हे कितपत थांबवू शकतो मला कल्पना नाही. पेशंट शक्य तेवढा जास्त मेडिक्लेम घेऊन बोटांची फ़ुली करून बसू शकतो. अजूनतरी आपल्या जीपीला हे विचारण्याची पद्धत नाही की "तुम्ही मला रेफ़र करणार असलात तर त्या इस्पितळाकडून तुम्ही कट घेता का? घेतला तर किती कट घेता? तेवढी रक्कम प्लीज माझ्यासाठी त्या इस्पितळाला जरा कमी करायला सांगता का?" अजून आपल्याकडे ही स्थिती आलेली नाही पण यायला फ़ार वेळ आहे असंही वाटत नाही. सगळेच जीपी कट घेत नाहीत. नियमाने वागणारे सर्व पॆथींचे खूप चांगले जीपी मला ठाउक आहेत.पण त्यांना जम बसवायला वेळ लागतो हेही खरे... काही चांगले जीपी लॆबोरेटोरीला किंवा डायग्नोस्टिक सेंटरला सरळ विनंती करतात की तुम्ही माझा कट न देता सरळ माझ्या पेशंटची तेवढी फ़ी कमी करा. माझ्या पेशंटला रास्त रकमेत योग्य उपचार मिळायला हवेत, म्हणजे झाले.... रेफ़रल फ़ी या शब्दावर थोडं गूगलून पाहिलं असता वकिलांच्या आणि डॊक्टरांच्या अशा दोन प्रकारच्या रेफ़रल फ़ीची उदाहरणे दिसतात... वकिलांच्या बाबतीत कायदेशीर रेफ़रल फ़ी आहे म्हणे. आणि डॊक्टरांच्या कटला अनएथिकल समजतात , त्याबद्दल नाके मुरडतात पण जितक्या पातळीचा गुन्हा तो मानायला हवा तेवढा तो मानत नाहीत.... याबद्दल मी एकदा तावातावाने बोलत असताना एका व्यवस्थापन शिकणार्या माझ्या मित्राने मला सुनावले ," तुझी अडचण ही आहे की तू अजूनही डॊक्टरी पेशाला उदात्त व्यवसाय समजतोस. तो तसा नाहीये, हे एकदा समजलास की तुझ्या जीवाला कटकट होणार नाही... रुग्ण हा ग्राहकाचे सर्व हक्क घेतो , त्याच्या हाती सीपीए ( ग्राहक संरक्षण कायदा ) चे हत्यार आहे मग त्याला सेवा देणारा डॊक्टर व्यापार्‍यासारखाच वागणार ना? कापड , तेल विकतो तसं आरोग्य विकायचं... आम्ही बेस्ट ट्रीटमेंट देतो आणि पैसे वसूल करतो असं कोणी म्हटलं तर यात चूक काय आहे? कमिशन आजकाल कोणत्या धंद्यात खात नाहीत? जो ग्राहकाच्या सर्वात जवळचा माणूस असतो तो कमिशन खाणारच. उदाहरणच द्यायचं तर आजकाल पुस्तकांच्या किंमती वाढलेल्या आहेत . पुस्तक प्रकाशन म्हणतं की आजकाल मोठ्या विक्रेत्यांना ४० % कमिशन लागतं , न देणार्या प्रकाशनाची पुस्तकंच बाहेर दिसत नाहीत. त्यामुळं साहजिकच प्रकाशनांनी किंमती भयानक वाढवलेल्या आहेत. शेवटी भोगतो तो वाचकच ना... तसंच इकडं आहे...सीपीए सुद्धा लावायचा आणि उदात्त व्यवसाय म्हणायचं हे डबल स्टॆंडर्ड्स नाहीत का? त्यात आता सरकारला मेडिकल कॊलेजेस काढणं परवडेनासं झालंय त्यामुळे सरकार स्वस्तात शिक्षण देणारी नवीन मेडिकल कॊलेजेस काढणार नाही... मग जास्तीतजास्त खासगी मेडिकल कॊलेजेस निघत राहणार. इतकं महाग शिक्षण घेऊन जम बसण्यासाठी लागणारा वेळ द्यायला आज कोणाला परवडतंय ? ".. त्यावर मी इतकंच म्हणालो, " मान्यय, दोन्हीही व्यवसाय आहेत.. पण बाकीच्या सेवा वैद्यकीय सेवांसारख्या अपरिहार्य नसतात... पुस्तक महाग वाटते म्हणून मी पुस्तक घ्यायचे टाळू शकतो पण उपचार महाग वाटतो म्हणून मी तो टाळून मरण्याची जोखीम पत्करू शकत नाही. म्हणूनच डॊक्टरांची नैतिक जबाबदारी महत्त्वाची आहे. ते ती कोणतेही ( ग्राहक संरक्षण कायद्यासारखे ) कारण देऊन टाळू शकत नाहीत..." शेवटी डॉ. अमोल अन्नदाते यांनी म्हटल्याप्रमाणे इतकेच म्हणतो की डॉक्टरांना आपल्या पेशंटपासून काही लपवण्याची वेळ येऊ नये... प्रत्येक डॉक्टरने असा निर्धार केला तरच हे फोफावणारे कटचे अर्थकारण थांबेल. पाहुणा संपादक : भडकमकर मास्तर.

वाचन 13950 प्रतिक्रिया 0