मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा संपादकीय - "प्रसारमाध्यमांचे डोके ठिकाणावर आहे काय?"

संपादक · · विशेष
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
"प्रसारमाध्यमांचे डोके ठिकाणावर आहे काय?"
भारतातील आपल्याला ज्ञात असलेला प्रसारमाध्यमांचा इतिहास जर तपासायला गेले तर तो फार जुना आहे असा निष्कर्ष आपण काढु शकतो, अगदी सुरवातीस जायचे म्हटले महाभारतात संजयने जे अंध धॄतराष्ट्राला युद्धभुमीवरच्या घटनांचे जे काही वर्णन सांगितले ते आजच्या युगात "थेट-प्रसारण उर्फ आंखों देखा हाल " ठरु शकते, एकुणच घडणार्‍या घटणा प्रभावीपणे मांडण्यासाठी व त्याची उत्सुक प्रेक्षकांना शक्य तितकी जास्त माहिती देण्यासाठी "इलेक्ट्रॉनीक प्रसारमाध्यमांइतके" प्रभावी माध्यम दुसरे कुठलेही नाही. भारतातील स्वातंत्रपुर्व काळात अनेकविध "वृत्तपत्रांच्या" रुपाने ह्या प्रसारमाध्यमांनी समाजीक जीवनात बाळसे धरायला सुरवात केली. त्या काळच्या नेत्यांनी , पुढार्‍यांनी लोकांसमोर आपले विचार, भावना प्रकट करुन त्यांना जागवण्याच्या कार्यासाठी ह्या उपलब्ध प्रसारमाध्यमाचा प्रभावीपणे वापर करुन घेतला. लोकमान्य टिळकांनी तर आपल्या "केसरी व मराठा " ह्या वॄत्तपत्रांमधुन अखंड जनजाग्रणाचे कार्य चालवले होते, त्यांच्या शब्दांनी व धारदार लेखणीने लोकांमधले देशभक्तीचे स्फुलिंग अक्षरशः धगधगत ठेवले. त्यांच्या "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, उजाडले पण सूर्य कुठे आहे ,शिशुपाल की पशुपाल , बादशहा ब्राम्हण झाले, पुनश्च हरि ओम" सारख्या अग्रलेखांनी वेळेवेळी जनमत जागवले व त्याचा वापर विधायक कार्यांसाठी देशोद्धाराच्या विधायक कार्यासाठी करुन घेतला, या सर्व अग्रलेखांनी मराठी समाजातच नव्हे , तर समस्त भारतात विचारांच्या लाटा निर्माण केल्या. त्याची वारंवार दखल ब्रिटिश राज्यर्कत्यांना घ्यावी लागली आणि टिळक पुढील अंकात काय लिहित आहेत , याकडे वाचकांबरोबरच ब्रिटिश राज्यकतेर्ही लक्ष ठेवू लागले. याला "प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर" असे आपण म्हणु शकतो. पुढे याच "लेखणीच्या शस्त्राचा" उपयोग आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी तितक्याच प्रभावीपणे केल्याचे उदाहरण आहे. एकंदरीतच ही "प्रसारमाध्यमे" ही समाजोद्धारासाठी एक महत्वाची व प्रभावी साधने समजली जाऊ लागली व लोक सुद्धा या माध्यमांवर विश्वास ठेऊन विचार करण्यास, चर्चा कारण्यास व आपली मते बनवण्यास पुढे सरसावु लागले. इथपर्यंत "प्रसारमाध्यमांच्या स्थापनेमागचा उद्देश" यशस्वी झाला असाच आपण निष्कर्ष काढु शकतो. मग टीव्हीच्या प्रसारानंतर साधारणता ९० च्या दशकात माहितीतंत्रज्ञान क्रांतीनंतर " इलेक्ट्रॉनीक मिडीया म्हणजे न्युज चॅनेल्स उर्फ वॄत्तवाहिन्या" च्या रुपाने ह्या "प्रसारमाध्यमांनी" पुन्हा एका नव्या रुपात जोशात पदार्पण केले, ह्यामुळे इथे प्रत्यक्ष घटना / परिस्थीती ही घरबसल्या आप्ल्या दिवाणखान्यात बसुन आपल्या डोळ्याने जसे चालले आहे तसेच "थेट प्रक्षेपण" पाहण्याची सोय झाली. लोकांना "प्रसारमाध्यमांचे" हे नवे रुपडे फार भावले व लोक ह्यांच्या बातम्यांची वाट पाहु लागले. आता लोकांना आवडत आहे मग "मागणी तशी पुरवठा " ह्या न्यायाने अशरशः ढीगभर नव्या "वॄत्तवाहिन्या" ह्या स्पर्धेत अवघ्या काही वर्षांच्या मुदतीत दाखल झाल्या. एकाच वेळी एकच घटना पाहण्यासाठी आपल्याला कधी नव्हे ते "१५ -२० " पर्याय उपलब्ध झाले. प्रेक्षकांसाठी ही तर पर्वणीच होती. त्यांना घरबसल्या अनेक ताज्या बातम्या, खेळाबद्दल माहिती, व्यापारातील घडामोडी, फिल्मी जगतातील हालचाली, माहिती देणारे कार्यक्रम , चर्चा ह्यांचा मनोसोक्त आस्वाद घेता येऊ लागला . इथपर्यंतसुद्धा परिस्थीती ठीकच होती आणि प्रसारमाध्यमे त्यांच्या उद्देशासारखीच "वरदान" ठरत होती. पण जेव्हा वाढत्या स्पर्धेबरोबर ह्यांच्यात अधिक प्रेक्षक ओढण्यासाठी "सब से तेज, सब से पेहले, खबर वही जो सच दिखायें" ह्या बातम्या देण्यांची जीवघेणी स्पर्धा सुरु झाली व ह्या वरदानाचा हळुहळु "भस्मासुर" होऊ लागला. "टी आर पी" च्या नादात ह्यांची पातळी अशी खालावली की "ह्यांच्यावर बंदी घालावी / निर्बंध आणावे" असा सुर उमटु लागला. ह्या प्रसारमाध्यमांनी स्वतःची अशी एक आचारसंहिता पाळावी अशी अपेक्षा असताना ह्यांनी "अभिव्यक्ती स्वातंत्र्या" च्या नावाखाली जो नेंगा नाच घातला त्याला पाहुन आपणाला "भीक नको पण कुत्रा आवर" म्हणायची पाळी आली हे नक्की. जसाजसा काळ गेली, ह्या वाहिन्यांचे वय वाढत गेले तसे ह्यांच्यात परिपक्वपणा, समंजसपणा वाढायच्या उलट बालीश्पणा, बाजारु वृती, उथळ व बटबटीत बातम्या देण्याचे प्रमाण वाढु लागले व सहाजीकच जे बर्‍याच सुजाण नागरीकांच्या डोकेदुखीचे कारण बनत आहे व "ह्यांना आता आवरा" ह्या मागणीला वाढता पाठिंबा मिळत आहे. जो पर्यंत ह्या वृत्तवाहिन्या "अबक च्या विहरीत पडण्याच्या , क्ष ला थंडी वाजण्याचा, विवीध गॄहांच्या युतीच्या दुष्परीणाम, जगबुडी, पेज ३ व सिनेमाजगतातल्या उखाळ्यापाखाळ्या, फॅशन व क्रीडा जगतातल्या घडामोडी" ह्यांचे भांडवल करत होत्या तोवर परिस्थीती सहन करण्याजोगी होती पण गेल्या काळातही काही घटना जसे की "मुंबईच्या अतिरेकीहल्ल्याचे थेट प्रक्षेपण, विवीध आंदोलनात ह्यांचा एकांगी अपप्रचार, सैन्य / संरक्षणासारख्या महत्वाच्या बाबींबाबत निष्काळजी वृत्तसंकलन व मनोधैर्य खचेल असे त्यांचे प्रसारण, स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली वेठीस धरलेल्या महत्वाच्या पदावरील व्यक्ती, जनमानसात घबराट पसरेल अशा बातम्यांचे कसलीही खातरजमा न करता केले जाणारे प्रक्षेपण ... इ.इ." पाहिल्यावर हा आता "भस्मासुर" होऊ पहात आहे हे नक्की . मग ह्यांच्यावर "कायद्यानेच बंधने आणावीत" की ह्यांना "आत्मपरिक्षणाद्वारे" सुधारण्याची संधी देण्यात यावी ह्यावर सध्या बरच खल चालु आहे. कायद्याच्या परिभाषेत ह्यावर काय करता याचीही चाचपणी संबंधीत संस्थांकडुन सुरु आहे. सध्याच्या काळात घडलेल्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी विवीध वॄत्तवाहिन्यांवर जे सो कॉल्ड टिनपाट तज्ञ मंडळी येतात व त्यांच्या अकलेच्या दिवाळं काढणार्‍या प्रतिक्रीया / उपाय ऐकुन आता खरचं " प्रसारमाध्यमांचे डोके ठिकाणावर आहे का ?" असा प्रश्न विचारावासा वाटतो. प्रसारमाध्यमांचे "अभिव्यक्ती स्वातंत्र्य" हा मुद्दा महत्वाचा आहेच पण त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदान करण्यापुर्वी तो प्रथम त्यासाठी लायक आहे का या मुद्द्याचाही विचार व्हावा. जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कसलीही सावधानी न बाळगता देशाच्या, सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेच्या मुळावर येणार्‍या व कसलाही ताळमेळ न ठेवता बिनबुडाच्या बातम्या "ब्रेकिंग न्युज" च्या नावाखाली वारंवार पब्लिकच्या माथी मारुन अनागोंदी निर्माण केल्यास ह्या "फोल ठरलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या" वेळीच मुसक्या बांध्यलास त्यात चुक ते काय ? "नाचु तंत्रज्ञानाच्या रंगी, ज्ञानदीप लावु जगी" हे ध्येय ( वरकर्णी ) तरी मनात ठेऊन निर्माण झालेल्या ह्या वृत्तवाहिन्या जेव्हा सरळसरळ वासनकांड, गैरप्रकार, गैरसमज , गैरवर्तम, प्रक्षोभक , अफवा पसरवणार्‍या , चिथावणीखोर, देशाच्या ऐक्याला धोका आणणार्‍या अशा वृत्तांना ढळढळीत प्रसिद्धी देत असतील तर "सक्तीचे बंधन" हे आवश्यक ठरत नाही का ? "लोकांना हवे ते आम्ही पुरवतो " अशा मोघम समर्थनाखाली काहीही दाखवण्याची परवानगी आहे का ? ह्यांना काही तत्वे, देशभक्ती , आचारसंहिता वगैरे आहेत का नाहीत ? प्रसारमाध्यमांनी सर्वसामान्य जनांच्या आशा, अपेक्षा , आकांशा , रोजच्या जीवनात अडचणीचे ठरणारे प्रश्न व त्यांच्यावर सखोल चर्चा करण्यार्‍या बातम्या व चर्चा प्रसारीत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे की नाही ? ही प्रसार माध्यमे "समंजस व मॅच्युअर " कधी होणार ? लाईव्ह आणि एक्स्लुझीव्ह देण्याच्या नादात ही प्रसारमाध्यमे नकळातपणे लोकांना मदत करतात की समाजकंटकांना ? एखादी दुर्दैवी घटना घडत असताना, लोक बळी पडत असताना ह्यांचा "सर्वात प्रथम आमच्याच चॅनेलवर " हा डांगोरा "प्रेताच्या टाळुवरचे लोणी खाण्याचा " प्रकार वाटत नाही का ? ह्या परदेशस्थ प्रसारमाध्यमांची कॉपी करुन हे लोक चर्चा, मुलाखती आणि थेट प्रक्षेपण घडवुन आणतात त्यांना त्याच वेळी ह्याच परसेशी वॄत्तवाहिन्यांनी "मिशन ऍन्टीबी, रशियन थेटरचे रेस्क्यु ऑपरेशन, ट्विन टॉवर्सचा प्रसंग, इराक अफगाणीस्तानचे कव्हरेज, लंडनवरचा दहशतवादी हल्ला " ह्यावेळी घेतलेली समंजस व डोके ठिकाणावर ठेऊन घेतलेली भुमीका डोळ्यासमोर येत नाही का ? आपण नेहमीच म्हणतो की " जे जे उत्तम, उदात्त ते ते घ्यावे " असे असताना ही प्रसारमाध्यमे मग तेवढ्याच गोष्टी धाब्यावर का बसवतात ? मित्रांनो ह्याविषयावर लिहील तितके कमी आहे आणि किती उदाहरणे द्यायची ह्यालाही अंत नाही. प्रसारमाध्यमांना बातम्या प्रसारीत करताना थोडा संयम बाळगुन, समंजसपणा दाखवुन, योग्य तेच आणि तितकेच दाखवावे, स्वतःच्या पदरचे काही त्यात घुसडण्याची घोडचुक करु नये. सामान्य माणसाच्या संयमालाही सीमा असते, एक दिवस हा संयम जर संपला तर मात्र कठीण होईल, लोकांच्या कल्याणाचा दावा करत आहात तर तो सत्यात आणुन दाखवा बस एवढीच मागणी. अन्यथा "कायदेशीर बंधने" आणण्याखेरीज दुसरा मार्ग नाही, मग त्या वेळेस सो कॉल्ड "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी " झाली तर जनहितार्थ का होईना तो निर्णय घ्यावाच लागेल, वेळीत शहाणे होण्यात हीत आहे समजुन घेतल्यास आनंदच होईल ... जनहित धाब्यावर बसवुन स्वतःची तुंबडी भरण्यासाठी "टी आर पी" च्या नादी लाहुन ते सध्या जसे "जन अ-हितार्थ" कार्य करत आहेत त्यामुळे सध्या तरी आमच्या मनात "प्रसारमाध्यमांचे डोके ठिकाणावर आहे का?" हाच प्रश्न वारंवार डोक्यात येत आहे. जाता जाता तुकोबारायांचा एक अभंग सांगतो, त्यात त्यांनी ह्याच मुद्द्यावर व्यवस्थीत भाष्य केले आहे, बघा जमले तर काही शिकवण घेता आली तर, तुकोबारायांच्या शिकवणीचा लाभ अनेकजणांनी घेतला, बघु तुमच्यात काही फरक पडतो का ? "आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत । करावी फजिती चुकती ते । । तुका म्हणे येथे खर्‍याचा विकरा । न सरती येरा खोट्या परी । ।" पाहुणा संपादक : छोटा डॉन.

वाचन 17683 प्रतिक्रिया 0