मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"शोध": खूपसं कौतुक आणि मोजक्या तक्रारी

आदूबाळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
इंग्रजीमध्ये "थ्रिलर" प्रकारच्या पुस्तकांचं बरंच समृद्ध कपाट आहे. डॅन ब्राऊन, मायकेल कॉनेली, जेम्स पॅटरसन वगैरे मंडळींच्या कृपेने. त्यात डॅन ब्राऊन कंठमणी शोभावा असा. कोणतातरी रहस्यभेद करायच्या ध्येयाने प्रेरित झालेला नायक, त्याला साथ देणारी नायिका, खलनायक किंवा खलनायकांची संघटना, नायकाला साथ देणारी चांगली माणसं / त्यांची संघटना, चोवीस ते छत्तीस तासांत घडणारं वेगवान कथानक असा थ्रिलर्सचा एकंदर ढाचा असतो. डॅन ब्राऊनने त्यात पुराणं, इतिहास, दंतकथा, गुप्त संघटना, कॉन्स्पिरसी थियरीजची जोड दिली, आणि द रेस्ट इज हिस्टरी. मराठी थ्रिलर्सचा प्रांत तसा दुष्काळीच आहे[१]. पटकन आठवलेली थ्रिलर्स म्हणजे सुशिंच्या "दारा बुलंद" कथा. थोडं मागे जायचं तर डोक्याला पुष्कळ ताण देऊन आठवलेली नाथमाधवांची "रायक्लब उर्फ सोनेरी टोळी". नव्यापैकी नाहीच. फेसबुकवर "शोध" या मुरलीधर खैरनार लिखित "डॅन ब्राऊन स्टाईल शिवकालीन मराठी थ्रिलर" विषयी वाचलं आणि उत्सुकता चाळवली. a (छायाचित्र सौजन्यः अ‍ॅमेझॉन) "जगात गाजलेल्या कशाच्यातरी स्टाईल काहीतरी आता मराठीतसुद्धा!" वगैरे झैरात वाचली की उगाचच न्यूनगंडाची भावना येते. "च्यायला आम्ही काही नवीन बनवूच शकत नाही की काय!" वगैरे अडगे विचार डोक्यात येतात, आणि असं रुपांतरित/धर्मांतरित काहीतरी वाचायची इच्छा कमी होते. अपवाद असतात. सरळसरळ रुपांतरित आहे हे दिसत असूनही गो० ना० दातारांचं "चतुर माधवराव" सुखद धक्का देऊन गेलं होतं. असंच होवो म्हणून सावधपणे कानोसा घेत होतो. फेसबुकवर "शोध"विषयी चांगलं वाचलं. वृत्तपत्रांतही. मग मागवलीच. काही परीक्षणं इथे: मटा, दिव्य मराठी, सकाळ शिवाजीराजांनी दोनदा सुरत लुटली. एकदा इ. स. १६६४ साली (शाहिस्तेखानाच्या स्वारीनंतर), आणि एकदा इ. स. १६७० साली (आग्र्याहून सुटकेनंतर). मोगली परचक्रांमुळे स्वराज्याची झालेली आर्थिक हानी भरून काढणे हा तात्कालिक हेतू दोन्ही स्वार्‍यांच्या मागे होता. पण महाराजांच्या मनातला दूरगामी आडाखा निराळाच होता. सुरत ही मुघल साम्राज्याची आर्थिक राजधानी खिळखिळी करण्याची महाराजांची योजना होती. सुरतेची दुसरी लूट जास्त योजनाबद्ध होती. महाराजांच्या गुप्तहेर खात्याने पैशाचे स्रोत आणि सावकारांच्या/व्यापार्‍यांच्या धन दडवायच्या जागा हेरून ठेवल्या होत्या. अवघ्या तीन दिवसांत महाराजांनी सुरत साफसूफ केली, आणि हजारो बैलांवर लूट लादून स्वराज्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. पण वाटेत मोगली सैन्य पाठी लागलं, म्हणून महाराजांनी सैन्याचे तीन भाग केले. दोन भागांबरोबर लुटलेला खजिना स्वराज्याच्या दिशेने रवाना केला, आणि तिसरा भाग घेऊन मोगल सैन्याला तीन दिवस झुलवत ठेवलं. खजिन्याचे दोन भाग आता स्वराज्याकडे वेगवेगळ्या मार्गांनी वाटचाल करत होते. त्यातला एक स्वराज्यात पोचला, पण निम्म्याहून अधिक भाग नाशिक जिल्ह्यात कुठेतरी गडप झाला! तो घेऊन येणारं सैन्य कधी पोचलंच नाही. त्या खजिन्याचं काय झालं हे एक न उलगडलेलं रहस्य आहे[२]. हा झाला इतिहास. लेखक मुरलीधर खैरनारांनी त्यावर आपल्या कल्पनाशक्तीचा साज चढवला आहे. तो खजिना शोधणारे तीन वेगवेगळे गट, त्यांच्या गुप्त संघटना, वेगवेगळी ध्येयं, आणि त्यासाठी वाट्टेल त्या थराला जायला न कचरणारी पात्रं, असं खास डॅन ब्राऊनी पान जमवलं आहे. या प्रकारच्या कादंबर्‍यांची भट्टी जमणं खरोखर कठीण गोष्ट आहे. फक्त उत्तम कल्पनाशक्ती असून भागत नाही. पहिलं म्हणजे इतिहासावर मजबूत पकड लागते. इथे बाहुबली किंवा हॅरी पॉटरसारखं स्वतंत्र विश्व उभारायचं नसून ज्ञात इतिहासाच्या कंगोर्‍यांत आपली कथा फिट्ट बसवायची असते. त्यामुळे इतिहास आणि कथानकाचा अचूक सांधा जुळवावा लागतो. कथानकात कच्चे दुवे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते, आणि काही अपरिहार्य कारणाने ते ठेवावे लागले तर कौशल्याने झाकता यावे लागतात. इतिहासाच्या मार्‍याखाली कथानक गुदमरू न द्यायची काळजी घ्यावी लागते. किचकट इतिहास वाचकाला सहज पटेल अशा पद्धतीने मांडावा लागतो. इतक्या डगरींवर एकत्र पाय ठेवून मग वाचकाला कथानक "शक्यतेच्या कोटीतलं" (plausible) वाटायला पाहिजे. वाचकाचा "सस्पेंशन ऑफ डिसबिलीफ" जास्त ताणता कामा नये. (आयुष्यभर रेशनिंग ऑफिसात खर्डेघाशी करणारा कारकून थ्रिलरचा नायक झाल्यावर अचानक सिंघमसारखी मारामारी करतो हे वाचकाला कसं पटेल?) त्यातून थ्रिलर्सची कथानकं वेगवान असतात. त्या चोवीस/छत्तीस/बहात्तर तासांच्या काळात पात्रं खोलवर रंगवता येत नाहीत. बर्‍याच प्रमाणावर सरसकटीकरण / क्लीशेकरण करावं लागतं. त्याप्रकारात कोणाच्यातरी शेपटीवर पाय पडण्याची शक्यता असते. आणि सगळ्यांत शेवटी "आपलं" - म्हणजे भारतीय / मराठी समाजवास्तव. या ना त्या कारणाने शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं राजकीय भांडवल केलं गेलेलं आहे. या द्रष्ट्या महापुरुषाचा काल्पनिक (अ)झेंडा खांद्यावर घेऊन परस्परद्वेषाचा बाजार मांडला जात आहे. या खातेर्‍यात पाय न घालता शिवकालावर कादंबरी लिहिणे हे मध्यरात्री लालमहालात घुसून शाहिस्तेखानाची बोटं तोडण्याइतकं अवघड असावं. ;) खैरनारांना यातल्या बहुतांश गोष्टी झक्क जमल्या आहेत. इतिहास संशोधनाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यासाठी त्यांना अनेकांचं सहाय्य झालं, आणि त्यांनी खुल्या दिलाने ते ऋण मान्य केलं आहे. ऋणनिर्देशामध्ये बॅटमॅन आणि बिपिन कार्यकर्ते या मिपाकरांचे आभार मानलेले सापडले, आणि भारी वाटलं! इतिहास संशोधनाबरोबर एकविसाव्या शतकातल्या टेक्नॉलॉजीचाही (उदा० ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार) त्यांनी कथेच्या दृष्टीने व्यवस्थित अभ्यास केला आहे. त्यामागचं विज्ञानही ठिकठिकाणी लिहिलेलं आहे. कथानक हे तांत्रिकदृष्ट्याही निर्दोष व्हावं हा खैरनारांचा कटाक्ष खरोखर आवडला. "इतने पैसे में इतनाहिच मिलेगा" किंवा "मराठीत चालतंय थोडंफार उन्नीसबीस" अशी पडेल वृत्ती नाही याचं कौतुक! कादंबरीत आवडलेली दुसरी गोष्ट म्हणजे परिसराचं तपशीलवार वर्णन. नाशिकच्या गल्लीबोळांचं वर्णन तर फार उत्तम जमलं आहे. (काही वर्षांपूर्वी कामानिमित्त नाशिकला जाणं होत असे, तेव्हा "नाशिक पाहून झालेलं आहे" असा माझा एक समज होता. "शोध" वाचून तो समज पोकळ होता हे लक्षात आलं!) नाशिक जिल्ह्यांतले आदिवासी पाडे, तिथलं समाजजीवनही कादंबरीत फार समर्पक रीतीने येतं. त्यात कुठेही "कसं दाखवलं आदिवासी समाजजीवन, यू पुणेमुंबै लोक्स!" असा अभिनिवेश नाही. कथेच्या ओघात ते येतं, किंबहुना कथानकाचा महत्त्वाचा भाग तिथे घडतो, त्यामुळे ते नैसर्गिकरीत्या आलं आहे. कथानक वेगवान आहे. बहात्तर तासांत पाचशे पानांची संपूर्ण कादंबरी घडते. वेगावरची मांड कुठेही ढिली पडलेली नाही. "हिरोहिर्वीन जिंकनारैत" हा आडाखा अगोदरच बांधता आला, तरी "कसे जिंकणार" या उत्सुकतेने आपण पुढे वाचत राहतो. थरार कादंबरीभर टिकून राहिला आहे. नाही म्हणायला【स्पॉयलर अलर्ट सुरु】रहस्य थोडं विसविशीत आहे - डॅन ब्राऊन स्टाईल उलटेपालटे धक्के नाहीत. हिरोचा व्हिलन आणि व्हिलनचा हिरो होत नाही. (आठवा: दा विंची कोड) (एक फार गुणाचं पात्र पुढे व्हिलन निघेल अशी मला शेवटपर्यंत आशा होती. पण असं काही झालं नाही.)【स्पॉयलर अलर्ट बंद】पण हा काही मोठा दोष नव्हे. आणखी एक बारीकशी तक्रार संवादांच्या भाषेबद्दल. जवळपास सगळे संवाद प्रमाणभाषेत आहेत. आदिवासी पाड्यातल्या मनुष्याने प्रमाणभाषेत बोलणं पटत नाही. इतिहासाचा प्राध्यापक, पोलिस इन्स्पेक्टर, उद्योजक, सचिवालयातला अधिकारी हे सगळे एकाच, सपाट भाषेत बोलतील हे शक्य नाही. भाषेच्या, बोलण्याच्या बारकाव्यातून पात्र जास्त प्रभावीपणे रंगवता येतं. ते "थ्रीडी" होतं, प्रत्यक्ष हाडामासाच्या माणसाच्या जवळपास पोचतं. संवादांना प्रमाणभाषेत ठेवल्यामुळे लेखकाच्या भात्यातलं हे एक हत्यार निकामी पडलं आहे. तसंच भाषाबाह्य संवादांचं (non-verbal communication). पुस्तक वाचताना वाचक आपल्या मनात ते पात्र रेखाटत असतो, तो प्रसंग पाहत असतो. पात्रांचं दिसणं, लकबी, सवयी वगैरेही त्या पात्राच्या "उभं राहण्यात" भर घालतात. मग कथानकाच्या दृष्टीने ते तपशील बिनकामाचे का असेनात. उदा० रॉबर्ट लँग्डन मिकी माऊसचं घड्याळ वापरतो, रॉन वीझलीला कोळ्यांचं भय वाटतं वगैरे. या बाबतीत "शोध" थोडं कमी पडतं. याचं थोडं आश्चर्य वाटलं. पुस्तकापाठी दिलेल्या परिचयातून मुरलीधर खैरनार नाशिकमधल्या प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत आहेत, त्यांनी पन्नासहून अधिक एकांकिकांचं दिग्दर्शन केलं आहे वगैरे माहिती मिळाली. नाट्यक्षेत्रात मुरलेल्या लेखकाकडून जास्त अपेक्षा होत्या. असो. आणि काही बारक्या शंका "थ्रिलर" हा वाङ्मयप्रकाराबद्दल मला नेहेमी असतात. माझा संशयी, चिकित्सक स्वभाव काही ठिकाणी "सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ"वर मात करतो, आणि नाही ते प्रश्न पडतात. उदा० चाकोरीबद्ध काम करणार्‍या नायकाला बहात्तर तासाची अचानक धावपळ कशी झेपते? रोमहर्षक पाठलागाच्या मध्ये अचानक शू लागली तर ती सिचुएशन कशी ह्यांडल करणार? वगैरे. पण ते जाऊदे. काही असो, पूर्णांशाने बघता "शोध"ची जमेची बाजू नक्कीच जास्त जड आहे. अगदी नक्की, आवर्जून वाचण्यासारखी, संग्रही ठेवण्यासारखी ही कादंबरी आहे. कादंबरीच्या शेवटी, रहस्य उकलताना दोन ठिकाणी लेखकाने मुद्दाम मोकळे धागे सोडले आहेत. ती बहुदा दोन सीक्वल्सची तयारी असावी. खैरनारांचा पूर्णवेळ व्यवसाय काय आहे माहीत नाही, पण मराठी कादंबर्‍या लिहिणे नक्की नसावा. पण त्यांना पुढच्या दोन कादंबर्या लिहिण्यासाठी सवड मिळो, आणि तीही लवकर, ही सदिच्छा! [इतिहासाचा प्रचंड अभ्यास असलेले प्रचेतसही सध्या "शोध" वाचत आहेत. त्यांना या कादंबरीविषयी काय वाटतं याची मला खूप उत्सुकता होती, म्हणून "आपण एकत्र पुस्तक परिचय लिहू" अशी गळ घातली होती. पण सध्या त्यांच्यावर हपीसच्या कामाचा बोजा पडल्याने "शोध"चं वाचन अर्ध्यात अडकलं आहे. त्यांचं वाचून झालं की याच धाग्यात ते भर घालतील.] ---------------- [१]इंग्रजीमधली "भारतीय" थ्रिलर्स हा एक वेगळा उप-प्रांत आहे. अश्विन सांघीचं "द कृष्णा की" किंवा विकास स्वरूपचं "सिक्स सस्पेक्ट्स" वगैरे. [२]लेखकाने शिवकालातल्या तीन रहस्यांचा उल्लेख केला आहे. सुरतेची लूट हे त्यातलं एक. इतर दोन रहस्यं म्हणजे (१) आग्र्याहून सुटका करवून घेऊन महाराज कोणत्या मार्गाने स्वराज्यात परतले? (२) शिवाजी महाराजांचा मृत्यू हा घातपाताचा प्रकार होता का?

वाचन 15115 प्रतिक्रिया 0