मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुला शिकविन चांगलाच धडा..

योगी९०० · · काथ्याकूट
माझा एक चतूरपणाचा (?) अनुभव.. अभियांत्रिकी पदवी घेतल्यावर मद्रास येथे नोकरी निमित्त रुजू झालो. घरापासून दुर आणि त्यात खिश्यात पैसा खुळखूळत असल्याने थोडाफार माज आला होता. वाट्टेल तसे पैसे उधळायचो. अर्थात दारू, सिगारेटवगैरे व्यसनापासून दुर होतो. मुख्यतः कपडेलत्ते, हॉटेल ,चित्रपट पहाणे, हिंडणे आणि छानछोकीत राहणे..यातच बराच पैसा खर्च होत होता. अशा माझ्या राहणीमानामुळे बर्याच लोकांनी मला हेरले असावे. मुद्दाम माझ्याशी मैत्री कर, मला खर्च करायला लाव असे काहीजण करायचे. पण थोड्याफार अनुभवांनंतर मी अश्या लोकांना दूर ठेवू लागलो. पण काही हेकेखोर पाठच सोडायची नाहीत. त्यातल्यात्यात पैसे मागायला येणारेच जास्त. तसा मी कोणाकडून फसलो गेलो नाही. पण परत पैसे मागण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे रक्त आटायचे. त्यावेळचाच एक अनुभव. त्या काळात (१९९५ साली) तसे मद्रासला हिंदी बोलणारे कमी भेटायचे. त्यामुळे मोजकेच मित्र होते. बाकी दक्षिण भारतीय मित्र पण होते पण ते हिंदी नाही बोलायचे त्यामुळे त्यांच्याशी एवढी जवळिक नाही झाली. एक कैलाश नावाचा मारवाडी होता. थोडाफार मराठी बोलायचा. त्यामुळे सुरुवातीला फारच जवळचा वाटला. हळूहळू त्याची जीवनपद्धती समजल्यावर तसा मनातून उतरलाच. त्याला सगळी व्यसने होती. शराब आणि शबाब सुद्धा. बोलण्यात मात्र कोणालाच हार नाही जाणार. मित्र्यांच्यात चांगलीच माझी खेचायचा. एकदा त्याने माझ्याकडे रु. ३००० मागितले. ते पण सर्वांसमोर. पहिल्यांदा मी नाही म्हणालो . पण त्याने मला सोडले नाही. सर्वांसमोर माझ्यावर टोमणे. वर अडीअडचणीत असलेल्यांना मदत करावी असा उपदेश. मला पण खुन्नस चढली ( खरे म्हणजे अवदसा आठवली असे म्हणणे योग्य ठरेल). मी त्याला सर्वांसमोरच रु. ३००० कसले मागतोस. मी तुला रु.५००० देतो असे म्हणालो. आणि सावकाश दे असे वर म्हणालो. त्याकाळी ATM नव्हते. त्यामुळे दुसरे दिवशी बँकेतून पैसे पण काढून दिले. दिलेला शब्द पाळायची हौस ..दुसरे काय ? तसे माझ्या हितचिंतकांनी मला सावधही केले होते. पण मी ईरेलाच पेटलो होतो. मला खात्री होती की मी माझा पैसा वसूल करेनच. पण या शहाण्याने मला रडकुंडीलाच आणले. त्याकाळी रु.५००० म्हणजे खुपच वाटायचे. (आजही खुपच वाटतात) . जवळजवळ ३-४ महिने त्याने मला तंगवले. मला टाळायचा काय..काहीतरी कारणे देयचा. तसे मी त्याला उधळपट्टी करताना बघायचो. तो पण माझी गंमत बघायचा. मुद्दाम असूनसुद्धा त्याने एक रुपया ही परत नाही केला. वर एक दोन वेळा माझ्याकडेच येवून आणखी पैसे मागितले. मी तर सगळ्यांच्या चेष्टेचा विषय झालो होतो. मी नंतर नंतर पैसे परत मिळण्याची आशाच सोडली होती. असेच मला एकदा समजले की तो महिना-दोन महिने कामानिमित्त बाहेरगावी जाणार आहे. म्हणून त्याला भेटायला संध्याकाळी त्याच्या घरी गेलो तर तो त्याच्या टोळभैरवांबरोबर दारू पित होता. मला बघितल्या बघितल्या माझ्यावर उसळून म्हणाला " मी आज उद्या सकाळी बाहेरगावी चाललो आहे. मी तुला आत्ता पैसे अजिबात देवू शकणार नाही." अश्या काहीतरी उत्तराची अपेक्षा असल्याने मी शांतपणे त्याला सांगितले " बाबारे.. मला पण कळतयं तू चाललास ते.. मी तुला भेटायला आणि तुमच्या पार्टीत भाग घेण्यासाठी आलो आहे." असे म्हणून मी त्यांच्या पार्टीत सहभागी झालो. थोडाफार कोक, चकणा आणि मस्त जेवण पदरात पाडून घेतले. मी जात असताना त्याला काय वाटले कोणास ठावूक. त्याने सरळ रु. ५००० चा माझ्यानावाने चेक फाडला. वर सेंटी होवून मला म्हणाला," जाऊ दे रे सर्व काही..हे घे तुझे पैसे " पण चप्पल घालत असताना त्याचे मित्रांशी बोललेले वाक्य माझ्या कानावर पडले आणि मला कळले की त्याच्या बॅक खात्यात तेवढी रक्कमच नाही आहे. म्हणजे काय चेक असून नसल्यासारखाच होता. त्यावेळी आम्हाला पगार चेकनेच मिळायचा आणि मग तो आम्ही आमच्या खात्यात भरायचो. त्यामुळे मला हा परत गावाला जाऊन येई पर्यंत वाट बघावी लागणार होती. तरी मी बॅकेत जाऊन हा चेक वटतोय का असे विचारले. अर्थात "चेक वटणार नाही कारण तेवढे पैसे खात्यात नाहीत" हेच उत्तर मिळाले. माझेही खाते त्याच बॅकेत असल्याने कारकुन मला थोडापार ओळखत होता. त्याने मला सहज सांगितले की फक्त रु२०० कमी पडत आहेत. चेक वटला नाही गेला तर कायदेशिर कारवाई करता येते हे मला त्यावेळी माहीत नव्हते. बँकेतून परत जात असताना एकदम एक कल्पना डोक्यात आली. दुसर्या दिवशी बॅकेत जाऊन याच्या खात्यात रु. २०० टाकले. आणि सरळ माझा चेक वटवला. कैलाश गावाहून परत आल्यावर त्याला पहिल्यांदा कळलेच नाही की घरमालकाने त्याला पैशासाठी शिव्या का दिल्या. त्याने घरमालकाला दिलेले दोन महिन्याचे घरभाड्याचे चेक वटले नव्हते. तसेच वीज कंपनीने चेक वटला नाही म्हणून त्याची वीज तोडली होती. या शहाण्याने वीज कंपनीला आणि टेलीफोन कंपनीला एक -एक आणि घरमालकाला दोन असे चेक दिले होते. बँकेत पगाराची रक्कम टाकायला गेला असता त्याला सगळा प्रकार लक्षात आला. त्याने त्या कारकूनाला धारेवर धरले की तुम्ही कोणालाही माझ्या खात्यात पैसे का भरायला देता. बँक मॅनेजर आणि कारकूनाने मला बोलावले आणि सगळा प्रकार माझ्याकडून समजून घेतला. त्या दोघांनी नंतर कैलाशलाच चांगलेच झाडले आणि त्याचे खाते बंद करायची धमकी दिली. शिवाय ४ चेक परत आल्याचा आणि दोन महिने खात्यावर काहीच रक्कम न ठेवल्याचा दंड ही वसूल केला. (तरी बरे की त्याकाळी बॅका आजच्या इतका दंड वसूल करत नव्हत्या). शिवाय वीज कंपनी आणि टेलीफोन कंपनी यांनी त्याच्याकडून वेगळा दंड वसूल केला. मी फक्त माझे पैसे वसूल व्हावेत म्हणून केलेल्या उपायामुळे त्याला चांगलाच दणका बसला. माझ्या सुदैवाने मला फक्त रु २०० च त्याच्या खात्यात भरावे लागले. जर ही रक्कम जास्त असती तर मी हा प्रकार केलाच नसता. मला अजिबात कल्पना नव्हती की याने आणखी काही चेक देवून ठेवले आहेत. अर्थात या प्रकारात मला रु.२०० चे जरी नुकसान झाले असले तरी नंतर कैलाशला झालेला मन:स्ताप आणि त्याचे वीज मंडळातले खेटे बघून आणि काही दिवस त्याने वीजेशिवाय काढलेले बघून मला ते पैसे वसूल झाले. त्याच्या सुदैवाने टेलीफोन कट झाला नव्हता. शिवाय नंतर बरेच दिवस माझे कौतूक आणि त्याची चेष्टा ह्यामुळे रु.५००० वर व्याजही मिळाल्यासारखे वाटले. ( ही सत्यकथा असून कथेतील फक्त मित्राचे नाव बदलले आहे.)

वाचन 9977 प्रतिक्रिया 0