मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुरोगामी दहशतवाद

विकास · · काथ्याकूट
आज प्राध्यापक शेषराव मोरे यांच्या विश्व मराठी साहीत्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरील भाषणाचा गोषवारा वाचता आला. भाषण मुळातून संपूर्ण वाचायला आवडेल म्हणजे संदर्भ अधिक लागू शकतो. तरी देखील त्यातिल एका महत्वाच्या मुद्यावर चर्चा झाल्यास उत्तम होईल असे वाटते. प्रा.मोरे म्हणतात:
.....‘हा पुरोगामी आणि तो प्रतिगामी’, ‘हा डावा आणि तो उजवा’ असे शिक्के मारून वर्गवारी करण्याची पद्धत महाराष्ट्रात प्रचलित करण्यात आली आहे. ती कोणी प्रचलित केली? अर्थात ‘पुरोगाम्यां’नी! हे ठरवण्याची त्यांची कसोटी कोणती? त्याचे आíथक विचार कोणते आहेत- समाजवादी का भांडवलवादी? धार्मिक विचार कसे आहेत? तो बुद्धिवादी आहे का परंपरावादी? सेक्युलर आहे का धर्मवादी? लोकशाहीवादी आहे का नाही?- अशा कोणत्या कसोटय़ांच्या आधारे ते ठरविले जाते काय? नाही! नाही!! तर ते ठरविले जाते ते एकाच महाकसोटीच्या आधारे -ती कसोटी म्हणजे ‘तो िहदुत्ववादी आहे की नाही?’ बरे, ‘िहदुत्ववादी’ म्हणजे काय? त्याचीही कसोटी तेच ठरविणार! ‘िहदू’ या शब्दाचा अभिमान धरणारा, एवढेच नव्हे, तर ‘िहदू’ शब्दाचा निंदाव्यंजक वा निषेधार्ह या अर्थाने नव्हे तर चांगल्या वा त्याची ओळख पटेल या अर्थाने उपयोग करणारा प्रत्येक जण त्यांच्या मते िहदुत्ववादी! त्यामुळे ‘िहदू’ शब्दाचा वापर करून आपण प्रतिगामी वा जातीयवादी तर ठरणार नाही ना, या भीतीखाली आजची मराठी वैचारिकता वावरत आहे. त्यामुळे िहदूंच्या जेवढे अधिक विरोधी बोलू तेवढे आपण अधिक पुरोगामी ठरू, असे समीकरण व पुरोगामित्वाची व्याख्या तयार झाली आहे. हा एक प्रकारचा पुरोगामी दहशतवाद असून त्याने मराठी वैचारिकतेला घट्ट विळखा घातला आहे. जर कोणी खरेखुरे पुरोगामी या संमेलनाचे अध्यक्ष होण्यास तयार नसतील तर ते या पुरोगामी दहशतवादामुळेच होय....
यात "पुरोगामी दहशतवाद" हा शब्द प्रयोग नवीन आहे का अजून कोणी आधी केला होता हे माहीत नाही. पण आम्ही केवळ ते शहाणे आणि त्यामुळे आमच्या समोर (हिंदू शब्द्दातला) "ह" पण म्हणण्याची कुणाची हिंमत होता कामा नये हा वैचारीक दहशतवाद. त्यात जर कोणी कुठल्याही संदर्भात सावरकर, संघ, यांच्या बाजूने बोलले / असले तर संपलेच. लगेच नथुरामचे भूत तयार करून गिल्ट बाय असोसिएशनने आत्तापर्यंतच्या सगळ्या पिढ्यांना त्यात अडकवायचे. हा उद्योग. नशीब सुधीर फडके आणि मंगेशकर कुटूंब त्यातून सुटले. अथवा त्यांच्या खमकेपणामुळे (आणि कलेच्या शक्तीमुळे) कुणाची त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत झाली नाही. आज महाराष्ट्रात पुरोगामी दहशतवाद आहे का? यात शारीरीक हिंसा नसेल पण वैचारीक हिंसेने समाजमनात भय तयार करायचे आणि जास्तीत जास्त फूट पाडायची. त्यातून एक बाजू बचावात्मक बाजूस जाते आणि मग आक्रमक होते. त्यातून अजून अस्थिरता निर्माण होते जी या पुरोगामी-डाव्यांना हवी असते, असे म्हणावे लागते... मग यावर उपाय काय असू शकतो? समाजसुधारणा नको असे कोणीच बोलणार नाही. पण मग ती कशी करावी? टिळक-आगरकरांच्या काळातील भुमिका आता टिळकही घेणार नाहीत कारण "घर आता आपल्या ताब्यात असल्याने, स्वच्छ करण्याची जबाबदारी" तेच घेतील हे त्यांच्या एकूण कार्याकडे बघताना वाटते. मात्र त्यांनी मोरे यांनी म्हणल्याप्रमाणे, गेल्या ५०-६० वर्षात जे चांगले परीवर्तन झाले आहे ते देखील जनतेसमोर आणून अधिक परीवर्तनासाठी प्रोत्साहन दिले असते असे देखील वाटते. सावरकर तर मोरे यांनी म्हणल्याप्रमाणे, या संदर्भात दाभोलकरांपेक्षा परखड आणि स्पष्ट होते. थोडक्यात, जसे कर्मठ आणि खर्‍या अर्थाने सनातनी वृत्ती जाणे गरजेचे आहे तसेच अतिरेकी आणि वैचारीक दहशतवादी असलेले पुरोगामींना पण स्वत:मधे बदल घडवणे गरजेचे आहे असे वाटत नाही का? मिपाकरांना काय वाटते?

वाचन 7919 प्रतिक्रिया 0