मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेअर बाजारः चीन..घसरण…. संकट की संधी'

प्रसाद भागवत · · काथ्याकूट
'बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते'.....चीनी आक्रमणासंदर्भातील कवि कुसुमाग्रजांच्या ह्या ओळी शाळेंत वाचल्याक्षणीच मी अक्षरशः थिजुन गेलो होतो. मधल्या काळांत थोडासा अप्रासंगिक झालेला हा संदर्भ काल पुन्हा आठवला. समोर ट्रेडिंग स्क्रीनवर टपकणारा लाल रंग, क्लायंटसचे चिंतातुर फोन्स यामुळे काहीसा अस्वस्थ होवुन 'भिंतीचे' तट पेटुन उठले, सदन चीनचे कोसळते…..रक्त 'शांघाय काम्पोझीट'चे, 'सेन्सेक्स' वरती ओघळते' अशी तोडकी मोडकी रचना जुळवत असतानाच नाही म्हणायला व्हॉट्स-अप वर एक मेसेज आला "Global mkt crash will not last long......... After all...it is made in China..☺☺☺' असो. मुद्यावर येतो. सध्या जगभरांतील सर्वच प्रमुख बाजारांत तीव्र घसरण चालु आहे.आणि प्रत्येक बाजाराची स्थिती आणि प्रकृति वेगळी असली तरीही चीनची अर्थव्यवस्था आणि चीनचा शेअर बाजार यांना लागलेली उतरती कळा हे या जागतिक पडझडीमागचे प्रमुखतम कारण आहे, याबद्दल कोणाचे दुमत दिसत नाही. (मुलभुत अर्थशास्त्राचा अभ्यास नसल्याने मी मात्र हा लेख 'शेअर बाजारासंदर्भात लिहिणार आहे हे स्पष्ट करावयास हवे.) जुनच्या मध्यास 5200 च्या जवळ झेपावलेला चीनचा 'शांघाय काम्पोझिट' हा निर्देशांक हा लेख लिहिताना 3000 च्याही खाली धडपडत होता, म्ह्णजेच गेल्या महिन्या दोन महिन्यांत त्यात जवळपास 40% घट नोंदविली गेली. चीनची अर्थव्यवस्था मागील काही वर्षे सतत 10% वा अधीक वेगाने वाढ नोंदवत होती जी त्या काळांत अतुलनीय होती, सहाजिकच तेथे जागतिक गुंतवणुकीचा ओघ प्रचंड प्रमाणांत वाढला होता. मात्र गेल्या काही महिन्यांत तेथे मंदीची चिन्हे दिसु लागली. नेहमी होते तसे, प्रथम रियल ईस्टेट्च्या किंमती घसरायला सुरवात झाली, निर्यात मंदावली, अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग 7% पर्यंत खाली आला बाकीचे आर्थिक निकषही कमकुवतपणाकडे अंगुली निर्देश करतच होते. http://www.ndtv.com/video/player/ndtv-special-ndtv-profit/chinese-realty-a-bubble-not-short-on-india-chanos/206074 जीम चॅनोस नावाच्या एका प्रख्यात बाजार विष्लेष्काने देलेली ही मुलाखत जिज्ञासुंनी जरुर पहावी. श्री राघव बहल यांचे 'The Amazing Race Between China's Hare and India's Tortoise' हे पुस्तकही या संद्रभात वाचनीय आहे. भरीस भर म्हणुन 'चीन मिडिया एक्स्प्रेस' वा 'सिनोफॉरेस्ट' यासारख्या अमेरिकेत नोंदणीकृत अनेक चीनी कंपन्यांनी त्यांच्या हिशेबांत मोठे गैरेप्रकार केल्याचे उघड झाले. चीनमधील बॅंकानी प्रचंड प्रमाणावर 'छुपी' कर्जे दिली आहेत जी बुडित खाती जावु शकतात अशा बातम्या येवु लागल्या, एकुणातच चीनमधील गुंतवणुकीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शेअरबाजार हा अशा घटनांची नोद सर्वात आधी घेत असतो. देशोदेशींच्या बाजारांत गुंतवणुक करणार्यां मोठ्या वित्तीय संस्था ह्या राष्ट्रभक्ती वा अन्य कोणतेही भावनात्मक बंध पाळत नाहीत, गुंतवणुकीतुन होणारा फायदा व त्यात असलेली जोखीम हाच त्यांच्या गुंतवणुकविषयक निर्णयांचा आधार असतो. सहाजिकच स्वतःच्या गुंतवणुकीबद्दल अतिसावध अशा मोठ्या संस्थागत गुंतवणुकदारांनी 'जब जहाज डुबने लगता है...'स्टाईलने चीनच्या शेअर बाजारांतुन काढता पाय घेण्यास सुरवात केली. खरेतर अशी तेजी/मंदीची चक्रे हा अर्थव्यवस्थेचाच अपरिहार्य भाग आहे. शेअर बाजारात तर असे चढ उतार वारंवार होत असतात, अशा प्रवाहांना नैसर्गिकपणे प्रकटु देणे आणि लुप्त होवु देणेच योग्य, मात्र चीन हा एक कम्युनिस्ट देश आहे, प्रत्येक गोष्टीत सरकारी नियंत्रण आणण्याची त्यांची सवय म्हणा किंवा मोठ्या प्रमाणांत जागतिकीकरण झालेला शेअर बाजार ही संकल्पनाच तुलनात्मकरित्या नवीन असल्याने अशा मंदीच्या तडाख्याचा पुर्वानुभव नाही म्हणा, चीनची शासकिय यंत्रणा लगोलग बाजारांत हस्तक्षेप करण्यास सरसावली. व्याजदर कमी करणे, शेअर्स विकत घेण्यासाठी कर्जे देणे, ब्रोकर्सकडे ठेवावे लागणारे मार्जिन कमी करणे, कंपन्यांचे प्रमोटर्स वा स्थानिक वित्तीय संस्थांना शेअर्स विकण्यास बंदी करणे,सरकारी पेन्शन फंडसना बाजारांतुन खरेदीची मुभा देणे...असे एकामागुन एक तीव्र स्वरुपाचे उपाय करुन बाजारांतील घसरणीस कृत्रिमपणे अटकाव करण्याचे प्रयत्न सुरु झाले. मात्र असा हस्तक्षेप म्हणजे 'रोगापेक्षा उपाय भयंकर' प्रकार आहे हे यापुर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे. जेंव्हा सन 1929 मधे अमेरिकन शेअरबाजारांत अशीच वेगाने पडझड होवु लागली तेंव्हा प्रख्यात बॅंकर जे.पी. मॉर्गन आणि अमेरिकतील अन्य काही आघाडीचे वित्तीय संस्थाचालक यांची बैठक होवुन बाजार सावरण्यासाठी असेच काही उपाय ठरविण्यांत आले. मंदी थोपविण्याठीचा हा असाधारण उतारा जालिम ठरणार अशी सर्वांनाच खात्री असतानाच. पुढच्याच सोमवारी अमेरिकन बाजार 13टक्क्यांनी सडकुन आपटला, एवढेच नव्हे तर पुढे तीनच आठवढ्यांत आणखी 34% पडला… अगदी अलिकडील उदाहरण म्हणजे 2008 साली देशांतील अराजकतेच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानी बाजारांतही अशीच बंधने घालण्यात आली तेंव्हाही हेच झाले, नंतर पाकिस्तानी बाजार जवळपास 50 टक्के कोसळले. बाजारांतील सहभागी लोकांची मानसिकताच जर बाहेर पडण्याची अहे तर 'बाहेर पड्ता येणार नाही' अशी सक्ती काय कामाची?? 'पेनकिलर' घेवुन तात्पुरते दुखणे थांबवणे कधीच रुग्णाच्या हिताचे नसते हीच बाब येथेही लागु पडते. दरम्यानच्या काळांत राक्षसी उत्पादनक्षमतेमुळे पडुन राहु लागलेल्या मालाची निर्यात सोपी व्हावी म्हणुन चीनच्या मध्यवर्ती बॅकेने आपल्या चलनाची किंमत अन्य चलनांच्या बाबतीत मुद्दाम कमी केली. चलनाच्या अवमुल्यनाबद्दलच बोलावयाचे तर हे अभुतपुर्व वगैरे पाऊल नसुन चीनने असे यापुर्वीही (1990) केले आहे.मात्र तरीही सरकार, मध्यवर्ती बॅकेच्या अशा टोकाच्या भुमिकेमुळे परिस्थिती सुधारायचे राहिले दुर उलट ‘दाल मे कुछ काला है’ अशी भावना प्रबळ होवुन घबराट पसरली, जगभरांतील धातुबाजार गडगडले, चीन यापुढेही अशीच आततायी भुमिका घेवुन चलन युद्ध सुरु करेल की काय अशा भितीने शेअर बाजारही कोसळले.. आपल्या बाजाराच्या निर्देशांकातही जोरदार घसरगुंडी होवुन तो वर्षभरांतील सर्वात खालच्या पातळीवर आला. अशा वेळी आपण,एका किरकोळ गुंतवणुकदाराने काय करावयास हवे ?? याचे सर्वप्रथम आणि सर्वसामान्य उत्तर कोणताही निर्णय तातडीने वा भावनेच्या भरांत घेऊ नये हे आहे. बाजारांत किमान मध्यमकालीन तळनिश्चिती झाली आहे काय हे तपासुन मगच खरेदीचा निर्णय करावा, उलट शेअर्स विकावयाचे असल्यासही अशा तीव्र मंदीतही एखादी अल्पकालीन तरी उसळी येते (ज्याला तांत्रिक परिभाषेंत Dead Cat Bounce म्हणतात) तीची वाट पहावी. शेजारील घरात दुरुस्ती, मोडतोड, ठोकाठोक चालु असली म्हणजे आपल्याला त्रास होणे अपरिहार्यच आहे, कदाचित भिंतीला एखाद्दुसरा तडा जाणे वा ढपला उडणे ही शक्य असतेच, पण म्हणुन आपण काय करतो लेखांत उल्लेख केलेल्या पार्श्वभुमीवर बाजाराच्या ताज्या स्थितीचे विष्लेषण करावयाचे झाल्यास बाजाराचे दीर्घकालीन PE गुणोत्तर तपासुन पहावे लागेल. निर्देशांकातील प्रत्येक कंपनी (येथे 'निफ्टी' मधील समाविष्ट 50 कंपन्या) तिच्या एका समभागामागे कमावित असलेला नफा आणि 'निफ्टी 'चा चालु बाजारभाव यांचे गुणोत्तर म्हणजेच 'निफ्टी'चे पी/ई गुणोत्तर होय. म्हणजेच एखाद्या शेअरचा भाव हा तो कमावित असलेल्या नफ्याच्या किती पट आहे हे याची तुलना म्हणजे हा पी/ई चा आकडा होय. हे गुणोत्तर जितके कमी तितके चांगले. या संदर्भांत आपल्या येथील IDFC या म्युचुअल फंडाच्या अभ्यासाप्रमाणे गेल्या 15 वर्षांत पी/ई गुणोत्तर 16 ते19 दरम्यान असताना निर्देशांकाने सरासरी 17.6% परतावा दिला आहे आणि जेंव्हा पी/ई गुणोत्तर 16 पेक्षा कमी होते, हा परतावा सरासरी 22.1% इतका मिळाला आहे. वाचकांचे कुतुहल चाळविण्यापुर्वीच सांगतो,आत्ता, हा लेख लिहित असताना NSE च्या अधिकृत संकेत स्थळाप्रमाणे निफ्टीचे (बंद भाव 7809) पी/ई गुणोत्तर 21.63 आहे. लक्षात घेण्याचा आणखी एक महत्वाचा मुद्दा हा, की हे गुणोत्तर काढताना आवश्यक असलेला कंपन्याचा प्रति समभाग नफा हा दर तीन महिन्यांनी (कंपन्यांचे तिमाही निकाल जाहिर झाल्यानंतर) बदलतो. सहाजिकच येत्या निकलांनंतर कंपन्यांच्या नफ्यांत होणारी वाढ लक्षांत घेता हे गुणोत्तर आणखी कमी होईल. अशा स्थितीत एकीकडे निर्देशांकाचा सध्याचा घसरणीचा कल व दुसरीकडे प्रति समभाग नफ्यांत होणारी वाढ पहाता IDFC म्युचुअल फंडाच्या वरील निकषावर बाजार नजीकच्याच काळांत मध्यमकालीन खरेदीसाठी योग्य या प्रवर्गात जावु शकेल. याशिवाय VIX (Market Volatility Index) हा ही अशा निर्णयप्रक्रियेतील एक उपयुक्त घटक आहे. हा निर्देशांक गुंतवणुकदारांचे मनांतील चलबिचल किती आहे ते ठरवतो असे ढोबळ्मानाने म्हणता येते. गुंतवणुकदारांचे मनांतील आशा निराशांचे प्रतिबिंब या निर्देशांकांत दिसत असल्याने VIX ची अतिशय वाढलेली पातळी म्हणजे निराशेचा परमावधी असे समजुन सर टेंपल्टन याच्या Principle Of Maximum Pessimism' च्या तत्वानुसार ही खरेदीसाठीची योग्य वेळ असु शकते. निफ्टीबाबत बोलावयाचे तर सर्वसाधारणतः अर्थसंकल्प वा निवड्णुकीचे निकाल, असे बाजार प्रभावित करु शकतीलसे पुर्वनिर्धारित कार्यक्रम नसणार्याण कालावधीत जेंव्हा जेंव्हा VIX ची पातळी 30+ होते, तेंव्हा बाजाराने तळ गाठल्याचे दिसते. लेख लिहितेवेळी ही पातळी 28.13 आहे. http://www.nseindia.com/companytracker/charting/images/IndiaVIX/VIX.png. बाजारावर परिणाम करणार्या मुलभुत घटकांची सरस निरस स्थिती पाहिल्यास चीनमधील या घडामोडींतुन भारतीय अर्थव्यवस्थेस काही फायदेही संभवतात. कमॉडीटी बाजार खाली आल्याने लोखंड, ॲल्युमिनियम वा तांबे यासारखे औद्योगिक उत्पादनाकरिता लागणार्या् कच्च्या मालाच्या किंमती कमी होतील. यातुनच चलफुगवट्यावर (इन्फ्लेशन) नियंत्रण येवुन व्याजदर कापातीची शक्यता वाढेल. तेलाचे घटलेले दर हा आपल्या अर्थव्यवस्थेस होणारा सर्वात मोठा फायदा आहे. रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घटल्याने (आणि तेलाची किंमत डॉलर्मध्ये चुकती करावी लागत असल्याने) आपण तेलाचे भाव कोसळ्ल्याचा फायदा पुर्ण स्वरुपात घेवु शकत नाही हे खरेच, पण नेमक्या याच गोष्टीमुळे आपल्याकडील निर्यातप्रधान कंपन्याना फायदाही होईल. एकुणांत अर्थव्यवस्थेतील तुट कमी होईल, जे फार महत्वाचे आहे. अशी नियंत्रित तुट, अन्य देशांपेक्षा सातत्याने अधिक असणारा विकासाचा दर, एकुण कर्जाचे जी.डी.पी च्या तुलनेने असलेले प्रमाण (चीनच्या बाबतीत एकुण कर्जे राष्ट्रीय उत्पन्नाच्या 280% हुन जास्त आहेत. भारताचे हेच प्रमाण 82% आहे.) अर्थव्यवस्थेचा आकार व स्थिरता पहाता भारतीय बाजाराकडे पहाण्याचा जागतिक वित्तीय गुंतवणुकदारांचा दृष्टिकोण सकारात्मक राहील असे मानावयास पुरेपुर जागा आहे. याचा अर्थ आपल्याकडे सारे काही आलबेल आहे वा आपल्या अर्थव्यवस्थेस कोणत्याही समस्या नाहीत ,असा अजिबात नाही, मात्र निवडणारासाठी कोणी काळा उडीद असेल तर आपण गोरी उडीद डाळ आहोत म्हणा हवे तर, आणि म्हणुन सापेक्षतेच्या निकषांवर, 'पंत गेले, राव चढले' या न्यायाप्रमाणे, येत्या काळांत गुंतवणुकीचा पहिला पर्याय म्हणुन आपली निवड करणे सोपे जावे अशी माझी अटकळ आहे.. एकदा दोन मित्र जंगलांतुन जात असताना अचानक त्यांना दुरुन येणारा एक वाघ दिसतो. दोघांचीही पाचावर धारण बसते, दोघेही अक्षरशः गर्भगळीत होतात. मात्र पुढच्याच क्षणी त्यातील एक जण घाईघाईने सॅकमधील स्पोर्ट्स शुज पायांत चढवुन पळायची तयार्री करायला लागतो. दुसरा त्याला म्हणतो "अरे कशाला ही धडपड?? कितीही झाले तरी आपल्याला थोडेच त्या वाघापेक्षा फास्ट पळता येणार आहे??" तेंव्हा दुसरा उद्गारतो "....ए बाबा, मला वाघापेक्षा नव्हे, फक्त तुझ्यापेक्षा जास्त जलद पळायचंय, बास्स'......मी वर जे म्हटले त्याचा अन्वयार्थ हा आहे. आपली अर्थ्व्यवस्था निर्दोष, परिपुर्ण, समस्याविहिन नसेलही,(आणि खरे तर कोणतीही तशी नसतेच)...ती इतरांच्या तुलनेत बरी असावी एवढेच. या विवेचनांतुन मी भारतीय बाजारांत दीर्घकालीन गुंतवणकीबद्दल मी नक्कीच आशावादी असलो आणि सध्याची चालु घसरण ही अशा गुंतवणुकीस असलेली सुसंधी मानत असलो, तरीही आंधळेपणाने, तडकाफडकी लगेचच खरेदीचे मोहिमेवर निधुन एका झटक्यांत सगळा माल घेवुन कार्यक्रम आटपावा, असे मला सुचवायचे नाही. 'Patience is a virtue for a investor.' कोणीसे म्हटले आहे ते खरेच आहे. 'The early bird catches the worm...' हा म्हणीचा अर्धा्च भाग आहे हे लक्षांत ठेवल्यास "but the Second Mouse Gets the Cheese” ही उर्वरीत अनुभुतीही येवु शकेल. नवीन गुंतवणुकदारांनी S.I.P चा मार्ग जरुर अवलंबावा. आपल्याकडे म्युचुयल फंड्सच्या माध्यमांतुन काही वैषिष्ठ्यपुर्ण योजना आहेत ज्या बाजारांतील अशा तीव्र चढउतारांपासुन गुंतवणुकदारांचे रक्षण करु शकतात. या योजनांना ढोबळमानाने 'Hybride Schemes' असे म्हणतात. या योजनांत वर उल्लेखलेल्या PE वा PBV सारख्या अतिशय प्रभावी घटकांचा आढावा घेवुन स्वयंचलित पद्ध्तीने योजनेतील 'ईक्विटी'चे प्रमाण बदलते ठेवले जाते. (1)ICICI Prudential Balanced Advantage Fund (2)Franklin India Dynamic PE Ratio Fund वा (3) Principal Smart Equity Fund ही या प्रकारांतील काही नावे होत. या योजनांची कार्यपद्द्धती, त्यांच्या कामगिरीची कारणमिमांसा व त्यांचा परिणामकारक वापर कसा करुन घ्यावा याची चर्चा जागेअभावी पुन्हा केंव्हा तरी........

वाचन 11286 प्रतिक्रिया 0