मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुहुर्तामागचं शास्त्र !

जयन्त बा शिम्पि · · काथ्याकूट
फार पुर्वी, किशोर वयात असतांना , कोणतीही लग्न पत्रिका पाहिली कि नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे " गोरज मुहुर्त म्हणजे नेमका किती वाजेचा मुहुर्त ? ' कधीतरी , कोणीतरी ज्ञानात भर घातली कि गो म्हणजे गाय , खेड्यापाड्यात गायी सायंकाळी शेतातून घरी येतात , त्यावेळी जी धूळ ( रज ) उडते , ती वेळ म्हणजे ' गो-रज ' मुहुर्त ! ! अलिकडे मुहुर्तावर महत्वाच्या घटना घडवून आणण्याचा प्रघात पडला आहे. विषशत: लग्न पत्रिकेत मुहुर्ताचा उल्लेख असल्याशिवाय , ती लग्न पत्रिका अपुर्णच वाटते. काहींना वाटते की लग्न पत्रिकेत लग्नाची वेळ ठरवितांना , वधू-वरांचा जन्म-दिनांक,जन्म-वेळ पाहिली जाते. यात पुन्हा एक प्रश्न निर्माण होवू शकतो कि जन्म पत्रिका सुद्ध अचुक कशी ठरविणार ? त्याबाबत पुन्हा शंकेला जागा आहेच ! प्रत्यक्ष व्यवहारामध्ये नवर्‍या मुलाकडील मंडळीस ,जर मुलगी, कोणत्याही कारणाने पसंत नसली , तर सरळ व स्पष्ट्पणे नकार देण्याऐवजी, वरपिता , आडवळणाने " मुलीची जन्मपत्रिका , आमच्या गुरुजींनी तपासली , पण मुलाच्या पत्रिकेशी जुळत नाही हो " असे सांगून मोकळा होतो. अर्थातच निसर्ग नियम ' अपाय तेथे उपाय ' असल्याने येथे ' जुळणारी पत्रिका बनवून देणारे ' आहेतच की ! थोडेसे विषयांतर झाले. तेंव्हा शुभ मुहुर्त पहाणे तसेच शुभमुहुर्त पाहून सुद्धा त्याप्रमाणे न वागणे हे भारतीयांचे मुळ लक्षण आहे असे वाटते.या बाबतीत कोणी टोकले तर " चालायचचं हो , थोडा वेळ इकडे कां थोडा वेळ तिकडे ! त्याला काय हुतंय ? " असे उद्गार काढल्यावर , सांगणारा थोबाडीत मारल्यासारखा चेहरा करतो. आपल्या पुर्वजांनी सांगून ठेवले आहे कि ' शुभस्य शीघ्रम ' -- जे ( कार्य ) शुभ वाटते आहे ते लगेच करुन टाकणे हे योग्य .उगाच मुहुर्त पहाण्याच्या भानगडीत पडू नका. माझ्या बुद्धी व तर्कानुसार , मला जे जास्तीत जास्त योग्य वाटते त्यासाठी मी मुहुर्ताची वाट कां पहावी ? मुहुर्ताची वाट पाहून कार्य सुरु केल्यानेच ते पुर्ण होइल याची खात्री कोण व कशाच्या आधारावर देइल ? माझे तर उलट असे म्हणणे आहे कि वाइट कामालाच मुहुर्ताची वाट पहावी लागते. उदाहरणार्थ एखाद्या चोराला चोरी करावयाची असेल तर तो काळोखी अमावस्येची रात्र, उत्तर रात्री ,दीड दोन वाजेनंतर ते पहाटे चार वाजेच्या आत, घरातील सर्व लोकांची नीजानीज झालेली पाहून, पहारेकरी झोपला असेल किंवा डुलक्या देत असेल तर अशा सर्व गोष्टींची बारकाईने तपासणी करुनच म्हणजे योग्य " मुहुर्त " पाहुनच चोरी करावयास निघणार. त्याने असा ' मुहुर्त ' जर पाहिला नाही , तर त्याचे काम फत्ते होणारच नाही. उलट अर्थाने म्हणावयाचे तर असे ही म्हणता येईल कि चोराने असा ' शुभ मुहुर्त ' पाहुनच त्याचे काम सुरु करणे योग्य ! तेव्हां सांगायचा मुद्दा असा कि ' प्रामाणिक व स्वछ हेतू असलेले कोणतेही काम करण्यासाठी कोणत्याही शुभ मुहुर्ताची गरज नाही.' सांगोपांग व कितीही परिपुर्ण विचार केला तरी तो कोणत्या ना कोणत्या अंगाने कुठेतरी कमीच पडणार. तेव्हां " जो जो जब जब होना है , सो सो तब तब होता है " अस निसर्ग नियम लक्षात ठेवून, शुभकार्याला लागावे हे उत्तम ! " मुहुर्त शुभ शोधण्यापेक्षा, कार्य शुभ असावे , मग मुहुर्ताची वा शुभ मुहुर्ताची गरजच काय ? असे मला वाटते.

वाचन 14848 प्रतिक्रिया 0