असं काहीतरी...
लेखनविषय:
अवघडच आहे हे वळण,
चालवतही नाही आणि थांबवतही नाही..
झालंय असं काहीतरी.
वेळ काढणंच चालू आहे सध्या,
शेवटचाच आहे हा प्रवास नाहीतरी.
कणाकणाने मी झालीच आहे जीर्ण,
टाकवतही नाही आणि ठेववतही नाही..
झालंय असं काहीतरी.
मोडलंस एकदाच तर बरं होईल,
तुझी मुळं आता पसरलीत नाहीतरी.
तू यावस म्हणून रेंगाळलेय दारात,
बंद करवतही नाही आणि उघडतही नाही..
झालंय असं काहीतरी.
तोही सोपस्कार करून जा,
मनाची दारं बंदच आहेत नाहीतरी.
स्वप्नांचे डाव माझ्या रचलेस खरे,
खेळवतही नाही आणि मोडवतही नाही..
झालंय असं काहीतरी.
जा,कर विजयाचा जल्लोष,
हार मानलीच आहे मी नाहीतरी.
आयुष्याच्या संध्याकाळी मात्र,
आठवतही नाही आणि विसरतही नाही..
होईल असं काहीतरी.
डोळे मिटून फक्त एकदा मार हाक,
तुझ्याच अंतरात असेन मी नाहीतरी.
वाचन
2243
प्रतिक्रिया
0