मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मॉडर्न अभंगवाणी

विनीत संखे · · जे न देखे रवी...
काव्यरस
असावा शेजा-याचा आंग्ल पेपर । वाचावा तोचि न खर्चिता स्वधन ॥ पेपरसंगे ग्राह्य दूध वाटि एक । साखरेजोडि तेहि मागावे ॥ संगणक अभियंता होशिल तू । विठुमाझा करिल चमत्कार ॥ फक्त परीक्षेअंती निकाल । केटि न लागु द्यावी ॥ महाविद्यालये टि-शर्ट आणि जीन्स । जेतुके फाटके तेतुके स्टायलिश ॥ ओळखावे कन्यकांचे जमाव । पाहावे प्रत्येकीस सांगोपांग ॥ किकेटी असावी भल्यांची भरती । करावे कसे बुकी-फिक्सिंगचे उच्चाटन? ॥ किंतु तयांच्याच चरणी मिळे धन । ऑस्ट्रेलिया मागे मीही लावतो ॥ स्टेशनी होता बळाबळी । करावी सुंदोपसुन्दी जरूर ॥ किंतु दिसता पोलिस अस्वस्थ । व्हावे मूक मार्गस्थ, विन्या म्हणे ॥ जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपले ॥ तोचि राजकारणी ओळखावा । मतदान उपरांति विसरावा ॥ लहानपण देगा देवा । हाति लॉलिपॉपच हवा ॥ चिप्स, चॉकोलेट अन कार्टून्स । जीव सत्कारणी रमावा ॥ व्हावा सख्यासोबतींचा संग । सोमरस सुषवी मिळे ब्रह्मानंद ॥ ऎकावे विन्याचे अभंग । आनंदाचे डोही आनंद तरंग ॥ साक्षात्कार - विन्याबुवा

वाचन 3884 प्रतिक्रिया 0