माहेरपण.....
लेखनविषय:
जेव्हा दु:खच परतून येते
मायेने ते कवेत घ्यावे,
मालिश करुनी तळपायाला
हलके त्याला शांत करावे.
येणारच ते पुन्हा पुन्हा घरी
हक्कच त्याचा आपुलकीचा
सासुरवाशीण लेकीसाठी
माहेराने सज्ज रहावे.
कितीही आले ओठावर तरी
प्रश्न विचारू नये तयाला,
नशीब असते एकेकाचे
अपुले आपण मानून घ्यावे.
जाईल निघुनी उद्या सकाळी
नवीन क्षितिजे क्रांत कराया ,
करू नये पण उगीच त्रागा
तळहातावर दही वाढावे.
(लिहिल्यावर जाणवले कवी अनिल यांच्या उशिरा आलेला पाऊस या कवितेशी साम्य आहे.)
वाचन
2655
प्रतिक्रिया
0