मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ब्रोकोली ग्रातिन

स्रुजा · · पाककृती
ग्रातिन हा फ्रेन्च खाद्य संस्कृती मधला एक खास प्रकार. फ्रेन्च पदार्थांचं आपलं असं एक खास स्थान आहे जागतिक खाद्यदालनात. एक मंद सुगंध, त्यात प्रत्येक घटक आपली नजाकत घेऊन हजेरी लावणार आणि या प्रत्येकाची चव वेगवेगळी, हळूच जिभेवर घोळणारी तरी ही एकत्रित एक राजस परिणाम साधणारी. या सगळ्या वैशिष्ट्यांनी ग्रातिन पण नटलं आहे. कॅनडा मध्ये निदान गेले २ शतकं फ्रेन्च प्रभाव आहे. आणि आमच्या बाजूलाच एक फ्रेन्च राज्य आपल्या सगळ्या पाककौशल्यासकट नांदतंय. किती बाजूला ? म्हणजे इकडच्या घाटावर ब्रिटीशांनी धुतलेली धुणी फ्रेन्च धोबिणी आपलीच समजून चुकून घेऊन जातील इतक्या बाजूला. अशा स्थितीत आमचे हाटेल वाले "गोरमे कुझिन" वर पैसा ना कमावते तरच नवल. इथे आल्यावर आम्ही पण अलगद या सापळ्यात अडकलो आणि फ्रेन्च कुझिन ला अधीन झालो. आज त्याच कुझिनची एक साईड डिश द्यायचा प्रयत्न आहे. साहित्यः १. ब्रोकोली एक मोठे किंवा दोन छोटे गड्डे (?) चांगला शब्द सुचत नाहीये :( निदान अर्धा फ्लॉवर च्या गड्ड्या इतके तुरे जमले पाहिजेत अशा हिशेबाने ब्रोकोली घ्या. २. २.५ छोटे चमचे कॉर्नफ्लॉवर. ३. दिड कप दुध. माझ्याकडे दुध २% होतं त्यामुळे मी कॉर्नफ्लोवर २ च्या ऐवजी २.५ चमचे घेतलं. तुम्ही वापरत असलेल्या दुधात स्निग्धांश जास्त असेल तर सॉस तसा ही घट्ट होतो , त्या अंदाजाने तुम्ही कॉ.फॉ. चं प्रमाण कमी जास्त करू शकता. ४. चवीनुसार मीठ ५. थोडी जायफळ पूड. ६. एक कप ( बेकिंग कप) आवडेल ते किसलेलं चीझ. मी पार्मेशान आणि चेडर अर्धं अर्धं घेतलं. पारंपारिक पद्धतीत ब्रि किंवा तत्सम फ्रेन्च चीझ वापरतात पण मी थोडं इटालियन आणि थोडं ब्रिटिश चीझ घेऊन , मुळ पद्धतीत बदल करत वर ते इथे छापण्याची खास अमेरिकनगिरी केलेली आहे. तसं ही अक्ख्या फ्रेन्च कुझिन चा डोलारा ज्याने समर्थ पणे पेललेला आहे तो त्यांचा सगळ्या सॉसेस चा बाप मुळ इटालियन आहे. ती ईष्टोरी पुन्हा कधी. त्याला आपण व्हाईट सॉस म्हणतो. आमच्याकडचे महागडे हाटेल वाले बेशमेल सॉस म्हणतात. ७. एक कप ब्रेड क्रम्ब्स /ब्रेड चा चुरा. इकडे हर्ब्स मिश्रित तयार चुरा मिळतो. मी तोच वापरला पण साध्या ब्रेडचा पण चुरा तितकाच छान लागतो. ८. बटर साधारण ४ - ५ टेबलस्पून कृती: तर ही आहे एक साईड डिश म्हणजे हे दोघांनी खायला घेतलं तर पोट भरणार नाही. बाकी काही तरी करावंच लागणार. जेवढं पोट भरणार तेवढाच साधारण वेळ घालवायचा असं माझं आपलं आळशीपणातून पक्कं झालेलं मत आहे. तेंव्हा फटाफट २-३ शेगड्या आपण वापरायला घेऊ. १. सगळ्यात आधी ओव्हन ४५० फॅ ला लावून ठेवा. २. एका पातेल्यात पाणी (खूप नाही) तापवायला घ्या. पाण्याला पहिली उकळी येईतो ब्रोकोली चिरुन घ्या. तुरे अक्खेच घ्यायचे आहेत. हे सगळे तुरे त्या पाण्यात सोडा आणि झाकण ठेवा. २. आता दुसरी शेगडी. यावर एक सॉस पॅन ( किंवा आपला साधा नॉनस्टिक खोलगट तवा) घ्या आणि ३ टे. स्पू बटर घाला. बटर वितळत आलं की कॉफॉ घालून गॅस मंद करा. ही पायरी सगळ्यात महत्त्वाची. लाकडी चमच्याने हळूहळू त्या मिश्रणाला हलवत रहा. गुठळ्या झाल्या तरी हो ऊ द्या. हे साधारण ३-४ मिनिटं न कंटाळता हलवायचं आहे. मधून च त्या मिश्रणाचा वास घ्या, एका पॉईंटला कॉ.फॉ.चा कच्चा वास जातो. त्या क्षणी आधी थोडं दुध घाला.गुठळ्या मोडून घेता येतील पटकीनी आणि मग उरलेलं दुध घाला. ३. ब्रोकोली आता हवी तितकी वाफवली आहे आतापर्यंत, त्यामुळे पातेलं गॅस बंद न करता उतरवा. त्याच गॅस वर दुसरं छोटं भांडं ठेवून त्यात दिड चमचा बटर घाला. ४. ते दुसरं बटर वितळवून त्यात ब्रेडचा चूरा घालून गॅस मंद करा. ५. इकडे सॉस हळूहळू घटट व्हायला लागलेला असेल. त्यात मिठ ( जरा बेताने कारण बटर मध्ये आधीच मीठ असतं) आणि जायफळ पावडर घालून गॅस मंद करून ठेवा. अजून एखाद मिनिटानी आपण सगळ्या शेगड्या (एकदाच्या) बंद करणार आहोत. ६. ब्रेडचा चुरा सोनेरी रंगावर परतला गेला की गॅस बंद करा. सॉसचा ही गॅस बंद करा. ७. आता बेकिंग ट्रे ला ते उरलेलं अर्धा टी स्पू. बटर आत सगळीकडून लावून घ्या. त्यात आधी ब्रोकोली, मग निम्मं चीझ, मग सगळा सॉस मग उरलेलं चीझ आणि सगळ्यात वर ब्रेडचा चुरा घाला. ८. हा ट्रे ओव्ह्न मध्ये ठेवून साधारण १५- १८ मिनिटांनी काढा. चीझ वितळून वरती एक सोनेरी ब्राऊन रग खुलायला लागेल त्या वेळेला हे झालं असं समजायला हरकत नाही. एखाद्या टोमॅटो बेस च्या पास्ता बरोबर छान लागतं आणि साईड असली तरी चांगलीच पोटभरीची होते त्यामुळे त्या बेतानेच उरलेला पदार्थ बनवा. फार भूक नसेल तेंव्हा गार्लिक ब्रेड आणि सूप बरोबर पण भरपूर होतं. image 1 image 2

वाचन 12394 प्रतिक्रिया 0