पुस्तके सुचवा ना ! आशु जोग · गुरुवार, 08/08/2013 - 19:07 · जनातलं, मनातलं वाङ्मय लेखनप्रकार आस्वाद वाचलीच पाहीजेत अशी काही पुस्तके सुचवा ना ! पुस्तकांच्या नावाबरोबरच त्याची अधिक माहिती मिळाली तर उत्तम. मीही जराशी यादी देत आहे. पुण्याची अपुर्वाई - अनिल अवचट ... बाबाने पुण्याचे केलेले पर्यटन, पुस्तक वाचताना आपणही बाबाबरोबर पुणे पहात हिंडत आहोत असे वाटते. राजा शिवछत्रपती - ब. मो. पुरंदरे ... शिवाजी महाराजांचे चरीत्र आहे. शतदा प्रेम करावे - अरुण दाते ... अरुण दाते यांचा जीवनप्रवास. लता मंगेशकर ते सलमानखान आणि जावेद अख्तर ते जगजीतसिंग यांचे संदर्भ येतात. अतिशय संदर्भसंपन्न पुस्तक आहे. मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम एस) ... एका डॉक्टरने लिहिलेले हे आयुष्यातल्या अनुभवांवरचे हे पुस्तक आहे. एक डॉक्टर आणि एक कुटुंबप्रमुख म्हणून आलेले अनुभव मुख्यतः यात वाचायला मिळतात. पवनाकाठचा धोंडी - गो. नी. दांडेकर ... पवनेकाठच्या मावळ परिसरात घडलेली ही दोन भावांची गोष्ट आहे. यात धाकट्या भावाला पोटच्या मुलाप्रमाणे वाढवणारा मोठा भाऊ आणि वहिनी आहेत. यावर आधारीत मराठी चित्रपटही आला होता. चंद्रकांत सूर्यकांत यांच्या भूमिका होत्या. गोनीदांच्या लिखाणाची मोहिनी का पडते हे समजण्यासाठी वाचकांनी त्यांची 'माचीवरला बुधा', 'शितू' ही पुस्तकेदेखील अवश्य वाचावीत. पानिपत - विश्वास पाटील ... पानिपतच्या युद्धावरील ही कादंबरी आहे. कादंबरी असली तरी सत्यावर आधारलेली आहे. लिखाण ओघवते आहे. प्रत्ययकारी आहे. या पुस्तकाने मराठीतील ऐतिहासिक कादंबर्यांची पूर्वीचे चौकट मोडून नवी निर्माण केली असे मानले जाते. अमरनाथ संघर्ष - गिरीश प्रभुणे ... पालावरचं जिणं, पारधी हे विषय सोडून प्रभुणे यांनी वेगळ्या विषयावर लिहिलेले पुस्तक आहे. अमरनाथ हे भारतामधे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. यात्राकाळात राज्याचा वनविभाग काही जमीन अमरनाथ बोर्डाला वापरायला देते. त्याचे भाडेही वसूल करते. मेहबूबा मुफ्ती, गुलाम नबी आझाद यांचे राज्यात शासन असताना ही जमीन बोर्डाकडून काढून घेतली. त्याविरुद्ध हिंदूंनी संघर्ष केला. हिंदूंचा जोर पाहून देशाबाहेर निष्ठा असलेले लोकही त्यात सामील झाले. अखेर मुफ्ती-आझाद यांना माघार घ्यावी लागली. काश्मीरमधील सद्यस्थिती समजून घेण्यास पुस्तक उपयुक्त आहे. शांतारामा - हे हिंदी चित्रपट दिग्दर्शक व्ही शांताराम यांचे आत्मचरीत्र आहे. पुस्तक अत्यंत रंजक पद्धतीने लिहिले आहे. लेखनसहाय्य शांताराम यांच्या मुलीने म्हणजे मधुरा जसराज यांनी केले आहे. मूकपट, काळेपांढरे बोलपट आणि रंगीत चित्रपट अशा तीनही कालखंडात शांताराम वावरले. भारतीय चित्रपट व्यवसायात होत गेलेले बदलही त्यांनी पाहिले. हिंदी चित्रपटाचा इतिहास म्हणून या पुस्तकाचे मोठे महत्त्व आहे. आवरण - एस एल भैरप्पा (अनु उमा वि कुलकर्णी) ... हिंदूस्थानावर अल्लाउद्दीन खिलजी, मोह बिन कासिम अशा परक्यांची आक्रमणे झाल्यानंतर या देशाची स्थिती काय झाली? हिंदूस्थानातल्या अनेक देवळांची मोडतोड कशी झाली हे यात वाचायला मिळते. अर्थात हा इतिहास आजचे वर्तमान समजून घेण्यासही उपयुक्त आहे. या पुस्त्कावर गिरीश कर्नाड, यु. आर. अनंतमूर्ती यांनी एकांगी असल्याचा आरोप करीत खूप टीका केली होती. पण मोठा वाचकवर्ग या पुस्तकाला लाभला. एक नवी दृष्टी देणारे हे पुस्तक आहे. मी इडली आणि ऑर्कीड - विट्ठल कामत ... ही एका हॉटेल व्यावसायिकाची गोष्ट आहे. त्यांनी हॉटेल व्यवसाय कसा वाढवला याबाबत यामधे वाचायला मिळते. शाकाहारी भोजनासाठी प्रसिद्ध असणार्या कामत हॉटेलमधे नॉन-व्हेजलाही बदलत्या काळाप्रमाणे विट्ठल कामत यांनी स्थान दिले. वाचताना भारावून जायला होते. पण नीट विचार केला तर अनेक विसंगती सहज लक्षात येऊ शकतात. लेखकाच्या काळात व्यवसाय वाढला असे मानले तरी. वडीलांच्या काळातच कामत हॉटेल्सची संख्या प्रचंड होती. कामत स्वतःला इकोफ्रेंडली व्यावसायिक म्हणवून घेतात. पण हॉटेल व्यवसाय इकोफ्रेंड्ली असूच शकत नाही असे तज्ञांचे मत आहे. अनिल मुकेशपेक्षा शून्यातून उद्योगविश्व निर्मिणार्या धीरुभाईंचे मोठेपण अधिक आहे. तेच इथेही. बा द वे काही वर्षापूर्वी 'मी मनू आणि संघ' या नावाचे पुस्तक मराठीत आले होते. त्याच्या शीर्षकाची आठवण झाल्यावाचून राहात नाही. मुक्तांगणची गोष्ट - अनिल अवचट ... मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची ही कहाणी आहे. डॉ सुनंदा अवचट यांनी या संस्थेची सुरुवात केली. पुढील काळात अनेकांनी याचा लाभ घेतला आणि नव्या जीवनाला सुरुवात केली. पेशंटबरोबर वावरताना त्याच्या मनाचा, मानसशास्त्राचाही मोठा अभ्यास यात पहायला मिळतो. नॉट गॉन विथ द विंड - विश्वास पाटील ... बर्याच गोष्टी काळाबरोबर पाचोळ्यासारख्या उडून जातात. काही गोष्टी मात्र टिकून राहतात. अशाच वर्षानुवर्षे टिकून राहिलेल्या जगभरातील कलाकृतींबद्दल यात वाचायला मिळते. रोमन पोलन्स्कीपासून स्टीवन स्पिलबर्गपर्यंत अनेकांच्या कलाकृतींचे यात रसग्रहण आहे. गॉडफादर आहे, अॅथेल्लो आहे. पानिपतातला नजीब आणि अॅथेल्लोमधला इयागो यांचा नेमका काय संबंध आहे हे समजण्यासाठी प्रत्यक्ष पुस्तकच वाचायला हवे. विश्वास पाटील यांचा जगभरातल्या सिनेमाचा आणि साहित्याचा व्यासंग थक्क करायला लावणारा आहे. पाटील यांना एवढा वेळ कुठून मिळतो असा प्रश्न पडतो. त्यांच्या दिवसाला २४ पेक्षा अधिक तास असावेत असा अंदाज आहे. वाचन 69542 प्रतिक्रिया 0