जॉर्डनची भटकंती : ०८ : मृत समुद्र आणि परतीची कथा
===================================================================
जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...
===================================================================
जलसफर संपवून किनार्यावर आल्यावर भुकेची जाणीव झाली आणि एक मस्त रेस्तराँ शोधून पोटोबा आटपून घेतला. परत शहरात एक छोटा फेरफटका मारून 'धनिकांचे क्रीडांगण' आणि 'समुद्रकिनार्यावरचे मरुस्थल' समजल्या जाणार्या अकाबाचा निरोप घेऊन आम्ही मृतसमुद्राच्या दिशेने निघालो.
जॉर्डनला भेट देण्यासाठी माझ्या मनात जी दोन मोठी आकर्षणे होती ती म्हणजे पेत्रा दरी आणि मृत समुद्र होती. इतर सर्व ठिकाणे बोनस होती. पेत्रा दरी बघून झाली होती. त्यामुळे आता मृत समुद्राच्या दिशेने कूच करताना तो कधी दृष्टिपथात येईल याबद्दल मनात खूपच उत्सुकता दाटून आली होती. अडीच तीन तासांच्या साधारण २०० किमी प्रवासानंतर गाडी मृत समुद्राच्या पूर्व किनार्याने धावू लागली आणि जरा हायसे वाटले. मात्र खाली उतरून समुद्राच्या पाण्यात शिरायला अजून अर्धा पाऊण तास लागेल असे मार्गदर्शकाने सांगितले आणि जरासे हिरमुसले व्हायला झाले!
मृत समुद्राचे प्रथम दर्शन
मृत समुद्र
सद्या ५० X १५ किमी आकाराचा असलेल्या (हा आकार हळू हळू कमी होत आहे) मृत सागर अनेक अर्थांनी एक आश्चर्य आहे. त्यातले सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेल्या क्षारांमुळे अतीघन असलेल्या त्याच्या पाण्यात माणूस हातपाय न हालवतासुद्धा तरंगू शकतो ! किंबहुना या समुद्रात बुडून मरणे प्रयत्न करूनही शक्य नाही !! या समुद्राच्या पाण्याची दरवर्षी काही मीटरने कमी कमी होत जाणारी पातळी हे एक फार मोठे पर्यावरण संकट आहे. त्यामुळे हा समुद्र नष्ट होण्यापासून कसा वाचवता येईल यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न चालू आहे. इतर बाबतीत बरेच मतभेद असले तरी जॉर्डन, इझ्रेल आणि लेबॅनॉन या देशांचे याबाबतीत एकमत आहे. जागतिक बँक या संबंद्धींच्या प्रकल्पांना आर्थिक साहाय्य करत आहे. मृत सागराची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत १. मृत समुद्राची समुद्रसपाटी सर्वसाधारण समुद्रसपाटीपेक्षा ४२७ मीटर खाली आहे आणि ती अजून खाली जात आहे. कारण त्याचा रक्त समुद्रापासून संपर्क तुटलेला आहे आणि त्याला पाण्याचा पुरवठा करणार्या जॉर्डन नदी व इतर लहान नद्या त्याला जितके पाणी पुरवतात त्यापेक्षा जास्त पाणी बाष्पीभवन होऊन हवेत जाते. २. समुद्रसपाटीपेक्षा ४२७ मीटर खाली असलेला मृत समुद्राचा किनारा ही पाण्याने न झाकलेली पृथ्वीवरील सर्वात खोल जागा आहे. ३. मृत समुद्राच्या पाण्याची खोली ३०६ मीटर आहे. त्यामुळे ते जगातील सर्वात जास्त खोल लवणसागर / लवणतलाव आहे. ४. त्याच्या पाण्यात ३४.२% क्षार आहेत. हे प्रमाण सर्वसाधारण समुद्रात असलेल्या ३.५% क्षारांपेक्षा ९ पटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच त्याच्या पाण्यात हातपाय न हालवता माणूस तरंगू शकतो! क्षारांच्या अतिरेकी प्रमाणामुळे मृत समुद्राला लवणसागर (Salt Sea) असेही म्हटले जाते. ५. क्षारांच्या अतिरेकी प्रमाणामुळे या समुद्रात एकही प्रकारची वनस्पती अथवा प्राणी जिवंत राहू शकत नाही. यावरूनच याचे मृत समुद्र हे नाव पडले आहे. ६. अनेक प्रकारचे क्षार असलेल्या मृत समुद्राची माती अंगाला लावून समुद्रात अंघोळ केल्याने बरेच कातडीचे रोग बरे होतात असा समज आहे. येथे येणार्या पर्यटकांत हे एक महत्त्वाचे आकर्षण असते. तसेच ही माती वापरून बनवलेली अनेक सौंदर्यप्रसाधने आणि औषधी गुणधर्मांचे दावे असलेली उत्पादने जगभर विकली जातात. ७. मृत समुद्राच्या इझ्रेली किनार्यावरचा "हायवे ९०" हा जगातला सर्वात खोलवर (सर्वसाधारण समुद्रसपाटीच्या ३९३ मीटर खाली) असलेला रस्ता आहे. .
१९६० ते २००७ सालापर्यंत मृत समुद्राचा कमी कमी होत गेलेला आकार.
समुद्राच्या कोरड्या झालेल्या दक्षिण टोकात आता समुद्राचे पाणी पाटाने आणून मिठागरे चालवली जातात. (जालावरून साभार)
मृत समुद्राच्या किनार्यावरील एका हॉटेलच्या कर्मचार्यांनी बनवलेला तरंगता आकार (जालावरून साभार)
मृत समुद्र : ०१ : किनार्यावर जमलेले क्षार
मृत समुद्र : ०२ : किनारपट्टीवरच्या वालुकाश्मांचे आकर्षक आकार
मृत समुद्र : ०३
मृत समुद्र : ०४
मृत समुद्र : ०४ : मृत्तीकास्नान
मृत समुद्र : ०४ : सूर्यास्त
जॉर्डेनियन लग्नातली वरात
अम्मानच्या शेवटच्या रात्री अनपेक्षितपणे सापडलेल्या मैफिलित अरबी संगीत आणि नृत्याच्या सोबतीने चवदार जेवणाचा आस्वाग घेताना रात्रीचे बारा-साडेबारा कसे वाजले ते कळलेच नाही. दुसर्या दिवशी सकाळी साडेनऊची परतीची बस पकडायची होती म्हणून नाईलाजाने खोलीवर परतलो. दिवसभराच्या शिणाने निद्रादेवी कधी प्रसन्न झाली ते कळलेसुद्धा नाही. ===================================================================परतीची कथा
दुसर्या दिवशी सगळेजण लवकरच आवरून भरपेट न्याहारी करून बसच्या वेळेच्या अर्धा तास अगोदरच नऊ वाजता थांब्यावर पोहोचलो. तेथे चौकशी केली तर कळले की ती बस साडेआठलाच निघून गेली होती ! ते का असे विचारले तर एक नाही अनेक समज दिल्याप्रमाणे उत्तरे मिळाली ती अशी: १. अशी वेळ बदलणे हा आमचा हक्क आहे हे तिकिटाच्या मागे (बारीक अक्षरात अरबीत) लिहिलेले आहे ते पहा. २. राखीव जागा असल्या तरी त्या कमीत कमी २४ तास अगोदर रिकन्फर्मेशन करणे आवश्यक असते. तेही तिकिटाच्या मागे (बारीक अक्षरात अरबीत) लिहिलेले आहे ते पहा. तुम्ही रिकन्फर्मेशन केले नाहीत. ३. रिकन्फर्मेशन केले असतेत तर तुम्हाला बदललेली वेळ आम्ही सांगितली असती नाही का ? बसच्या राखीव तिकिटांसाठीही इतकी बंधने असतील याची आमच्या सौदी व्यवस्थापकालाही कल्पना नव्हती अथवा शंका आली नव्हती. बसेस आधुनिक असल्या तरी जॉर्डन-सौदी मधला सरकारी व्यवहार भारतापेक्षा फार वेगळा नाही हे पाहून "ड्वाळे पाणाव्ले" ! पण दु:खात सुख इतकेच की "बसचे तिकीट त्याच प्रकारच्या दुसर्या बसला चालेल किंवा न वापरल्यास त्याचे पैसे परत मिळतील" असे कळले. पण लगेचच त्या प्रकाराची बस दिवसाला एकच आहे आणि पुढच्या आठवडाभरापेक्षा जास्त वेळेचे पूर्ण आरक्षण झाले आहे अशी खुशखबरही हसत हसत दिली गेली ! तिथली सरकारी विनोदबुद्धीही आपल्याशी स्पर्धा करणारी आहे याची पुरेपूर खात्री पटली. मग आम्ही इतर काही व्यवस्था होते काय याची चौकशी सुरू केली. थोड्याच वेळात आम्हाला कळून चुकले की अम्मान-दम्माम असा १७०० किमी आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे खाजगी वाहन मिळणे शक्य नाही. आम्हा सर्वांनाच एका दिवसानंतर कामावर हजर होणे आवश्यक होते. त्यामुळे हा प्रवास तुकड्यातुकड्यात करण्याला पर्याय नाही असे ठरले. अम्मानपासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत (अल् हादिथा सीमाचौकी) जायला जरा घासाघीस करून का होईना पण एक खाजगी टेम्पो ट्रॅव्हलर टाईपचा टॅक्सीवाला मिळाला आणि हायसे वाटले. परतीच्या प्रवासाला सुरुवात तर झाली, पुढचे पुढे पाहू असे म्हणून आम्ही निघालो...
नकाश्यात दाखविलेल्या मार्गानेच पण उलट दिशेने परतीचा प्रवास (मूळ नकाशा जालावरून साभार)
वाचन
24657
प्रतिक्रिया
0