जॉर्डनची भटकंती : ०७ : अकाबा
===================================================================
जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६... ०७... ०८ (समाप्त)...
===================================================================
थोड्याच वेळात संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी छावणीच्या कर्मचाऱ्यांची लगबग सुरू झाली. खाणेपिणे, छावणीच्या विस्तवाभोवती नाचणे, उत्तररात्र ओलांडून जाईपर्यंत गप्पा-गोष्टी-विनोद, इत्यादी कार्यक्रम पूर्वी ठरवल्याप्रमाणे अगदी साग्रसंगीत झाले. शेवटी बंदिस्त तंबूत जाऊन झोपण्यापेक्षा हवेशीर उघड्या मंडपातच ताणून दिली.
उघड्यावरच्या छावणीत सकाळ जरा लवकरच फटफटली. बाकीच्या पर्यटकांची गर्दी होण्याअगोदर सामायिक स्वच्छतागृहातली सकाळची कामे आटपून मस्त न्याहारी आटपून घेतली आणि निघायला वेळ असल्याने छावणीच्या परिसरात फेरफटका मारायला निघालो. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात ते वाळवंट अजूनच वेगळे दिसत होते.
तेथे जमलेल्या पर्यटकांच्या गर्दीचा व्यवसायासाठी कल्पक उपयोग करून एकजण तेथे मोटोराईझ्ड हँग ग्लायडरच्या साहाय्याने वादी रमचे विहंगम दर्शन घडवीत होता...
वादी रम : मोटोराइझ्ड हँग ग्लायडर (जालावरून साभार)
वादी रम : चातुर्याचे सात स्तंभ
अकाबाकडे जाणारा रस्ता
अकाबा शहराच्या हद्दीवरची घरे
अकाबाच्या आधुनिक वस्तीची सुरुवात
अकाबा
रक्त समुद्राचे उत्तरेकडील टोक इजिप्तच्या सायनाई व्दीपकल्पाने दुभागलेले आहे. त्यातल्या पश्चिमेकडील भागाला सुवेझचे आखात म्हणतात व त्याच्या उत्तर टोकावरून भूमध्य समुद्राला जोडणारा सुवेझ कालवा सुरू होतो. तर पूर्वेकडील भागाला आकाबाचे आखात म्हणतात. आफ्रिका आणि आशियातील समुद्री व्यापारावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेवर सुमारे इ स पूर्व ४,००० पासून वस्ती आहे. अर्थातच, इतिहासात त्याचे महत्त्वाचे स्थान राहिले आहे. सर्वप्रथम येथे एडोमाईट जमातीची वस्ती होती, त्यानंतर इ स पूर्व पहिल्या शतकात अरब नाबातियन मोठ्या संख्येने आले. वादी रममध्ये आपण पाहिलेले अरॅमिक भाषेतले शिलालेख याच नाबातियन लोकांनी लिहिलेले आहेत. रोमन काळ या शहराचा प्राचीन सुवर्णकाळ होता. या काळात ख्रिश्चन असलेला हा भूभाग इस्लामच्या उदय व प्रसारामुळे मुस्लिम झाला. नंतर ऑटोमान साम्राज्याचा भाग झाला, पहिल्या महायुद्धानंतर ट्रान्सजॉर्डन म्हणून पाश्चात्त्य ताकदींच्या ताब्यात राहिला व अखेर स्वतंत्र आधुनिक जॉर्डनचा भाग झाला हा इतिहास आपण अगोदर पाहिला आहेच. अकाबा हे अकाबाच्या आखाताच्या किनारपट्टीवरचे सर्वात मोठे शहर, जॉर्डनचे एकुलते एक बंदर आणि अकाबा गव्हर्नरेटचे मुख्यालय आहे. जॉर्डनमधल्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांमध्ये त्याची गणना होते. प्रवाळाने (कोरल) आणि इतर सागरी जीवांनी समृद्ध, स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारा असल्याने तेथे वाळू, सूर्य, समुद्रसफारी, डायव्हिंग आणि सर्वसाधारण 'जीवाचा अकाबा करायला' आलेल्या पर्यटकांची गर्दी असते. त्यांच्या सोयीसाठी येथे अनेक आलिशान हॉटेल्स व रिसॉर्ट्स आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनांसाठीही अकाबाची निवड केली जाते. आकाबाच्या आखाताचा बहुतांश पूर्व किनारा सौदी अरेबियात येतो तर बहुतांश पश्चिम किनारा इजिप्तच्या सायनाई भागात येतो. आखाताच्या अगदी उत्तर टोकावर जेमतेम २०-२५ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा जॉर्डनच्या हद्दीत आणि १० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा इझ्रेलच्या हद्दीत आहे. त्यामुळे, आकाबाच्या आखाताच्या पूर्व किनार्याने प्रवास केला तर उत्तरेकडे जात प्रथम आपण सौदी अरेबियातून जॉर्डनमध्ये प्रवेश करू आणि केवळ वीसएक किमी गेल्यावर जॉर्डनमधले अकाबा शहर ओलांडून इझ्रेलमधील ऐलात शहरात शिरू, त्यानंतर दक्षिणेकडे वळून फक्त दहाएक किमी ओलांडले की इजिप्तच्या हद्दीत गेलेले असू... एकूण चार देशांच्या सीमा येथे इतक्या जवळ जवळ आहेत ! आकाबाच्या किनार्यावरून जॉर्डन-इझ्रेल सीमाभाग, इझ्रेलमधील ऐलात शहर आणि इझ्रेल-इजिप्त सीमेवरील चौकीच्या इमारतीचा तांबड्या रंगाचा ठिपका दिसतो.
.
अकाबा : ०१ : अकाबा परिसराचे नकाशे (मूळ नकाशे जालावरून साभार)
अकाबा : ०२ : अकाबा शहराचे विहंगम दृश्य जालावरून साभार
अकाबा : ०३ : शहराचा फेरफटका
अकाबा : ०४ : शहराचा फेरफटका
अकाबा : ०५ : शहराचा फेरफटका
अकाबा : ०६ : आखातात फार पूर्वी बुडालेल्या बोटीचे अवशेष
अकाबा : ०७ : आखातातील प्रवाळ
अकाबा : ०८ : आखातातील प्रवाळ
अकाबा : ९ : बोटीतून दिसणारे अकाबा शहर
अकाबा : १० : अकाबा बंदरातला झेंडा
अकाबा : ११ : राजे हुसेन फार्महाउस
अकाबा : १२ : ऐलात बंदर
अकाबा : १३ : ऐलात शहर आणि आखातातली जॉर्डन-इझ्रेल जलसीमा
वाचन
9389
प्रतिक्रिया
0