मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

AN ODE TO मिसळपाव ! प्रथम पुष्प

मारवा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मिसळप्रेमींनो !मनोगतींनो ! उपक्रमींनो ! वातानुकुलीत अक्षरींनो ! सर्वसंस्थळसंचारी आंतरजालीय फ़ुलपाखरांनो ! साक्षेपी सात्विक सेन्सॉरी कर्तरीकर्म कुशल संपादकांनो ! किंचीत पक्षपाती आयडीवलयांकीत-स्तिमीत संपादकांनो ! खरया खुरया खोट्या नाट्या भल्या बुरया आयडींनो त्यांच्या डुआयडींनो ! त्यामागील दुर्देवी देवराई निवासींनो ! माहीती जमवुन जमवुन घोळुन रंगवुन माहीतीच्या महामार्गावर माहीतीचा उच्छाद मांडणारया माहीतगारांनो ! स्व-रचित ललित मुग्ध “पुल”कीत गोड गोड लयीत “ललित” लिहत लिहत लेखणी लाल करणारया ललित लेखकांनो! अध्यात्माची अखंड अविरत धारा प्रवाहीत करणारया धमनी तील धग विझलेल्या धार्मीक धागा लेखकांनो ! रंग माझा वेगळा विषय माझा वेगळा धागा माझा वेगळा ची वेगळी हाळी देणारया आगळ्या वेगळ्यांनो ! बारोमास चोवीसतास पडीकांनो , विकांती व्हीजीटरांनो , दिवसढवळ्या दिसणारय़ा ,रात्रीबेरात्री चमकणारया आयडींनो ! झोप उडालेल्या इनसोम्निकांनो, बाटली काही केल्या न सापडणारया, वर्कलोड वाढलेल्या वर्करांनो आणि यांनी पकवलेल्या पावमिसळीवरील पक्वानांनो ! बजेटमधील बारहा च ऑफ़लाइन प्याड परवडणा रया रया रया रयां नो , गमभन ची ऑनलाइन चैन करणारयांनो ! मिपावरील वठलेल्या वृद्धांनो त्यातील हिरव्या देठांनो ! तरतरीत तरुणींनो , तडफ़दार तरुणांनो , बावरलेल्या बालकांनो, उर्वरीत अधल्यामधल्यांनो ! संघींनो, सनातन्यांनो, समाजवाद्यांनो, साम्यवाद्यांनो, सर्वांतील सर्वोत्त्म सत्व सापडलेल्या सपक सज्जनांनो ! भुमिका मांडणारयांनो , भुमिका वठवणारयांनो , भुमिका घेणारयांनो ,भुमिका मोडणारयांनो , भुमिका फ़िरवणारयांनो ! पांचट प्रतिसादकांनो , पुचाट प्रतिसादकांनो , प्रखर प्रतिसादकांनो , प्रख्यात प्रतिसादकांनो , पुराव्यासहीत प्रतिसादकांनो , प्रेमपुर्वक प्रतिसादकांनो, उथळ प्रतिसादकांनो, चपळ प्रतिसादकांनो ! पाणावलेल्या प्रतिसादांनो ! नाणावलेल्या प्रतिसादांनो, ताणलेल्या प्रतिसादांनो, हाणलेल्या प्रतिसादांनो , संपादीत प्रतिसादांनो, मार्मिक प्रतिसादांनो, मुक प्रतिसादांनो ! शंभरी गाठलेल्या , डबल सेंच्युरी मारलेल्या धाग्यांनो , खाता ही न उघडलेल्या शुन्यपोकळी धाग्यांनो ! खरडींतुन खरडणारयांनो , प्रतिसादांतुन पाजळणारयांनो , व्यनितुन चिपकु पाहणारया फ़ेव्हीक्वीकांनो ! हपिसातुन मिपा वापरणारया कर्मयोग्यांनो, क्याफ़ेतुन पदरमोड करणारया त्यागमुर्तींनो, घरच्याघरी मिपाघरचं माप ओलांडणारया गृहीणींनो ! संस्थळावरील समजुतदारांनो, भांडकुदळांनो, काडी लावणारया अग्निपुजक आर्यांनो, ती विझवु पाहणारया विचारींनो ! आधुनिकांनो, बुरसटलेल्यांनो, धेडगुजरींनो, गंमत पाहणारया वाचनमात्रांनो ! फ़ेमिनीस्टांनो , मेलइगोइष्टीकांनो, त्यांच्या दुष्मनांनो ! निर्मीतीक्षमता संपुन आता राहीलो प्रतिसादा पुरता वाल्यांनो ! वैविध्य संपुन आता राहीलो एका विषया पुरता वाल्यांनो ! दंश संपुन आता राहीलो प्रशंसे पुरता वाल्यांनो ! जुन्याच भांडवलावर परत परत व्याजा चा हट्ट धरणारयांनो ! शिळ्याच कढीला उत आणु पाहणारयांनो ! जुने धागे नव्यांच्या तोंडी मारणारया जुने झालेल्यांनो ! संस्थळावरील एनारायांनो, मुंबई-पुणे करांनो, उर्वरीत महाराष्ट्रीयनांनो ! परप्रांतीय महाराष्ट्रीयनांनो ! चमत्कारीक आयडींनो, अलंकारीक आयडींनो, आध्यात्मिक आयडींनो, विक्षीप्त आयडींनो, विलायती आयडींनो मराठमोळ्या आयडींनो ! कंपुबाजांनो कंपुवाद्यांनो जातीवाद्यांनो धर्मवाद्यांनो ! प्रकाशकांनी अंधारात ढकललेल्या अप्रकशित कविंनो, अप्रकाशित कथालेखकांनो ! अशा कथा-कवितेचा उजेड पाडणारयांनो ! लिहीण्याची खाज भागवणारयांनो ! लिहीण्याचा माज दाखवणारयांनो ! लिहीण्याचा बाज शोधु पाहणारयांनो ! धंदा पसरवु पाहणारया कुडमुड्या ज्योतिषांनो ! धमाल मुलांनो, कन्फ़्युज्ड अकाउटंटांनो, गोड गोड गविंनो, मिसळलेल्या कविंनो, होमियोपथि डॉक्टरांनो, थकलेल्या कारकुनांनो आणि ताई माई अक्कांनो ! मिपावर मदत मागणारया लाचारांनो करणारया उदारांनो , कॉन्टॅक्ट्स (बिकम कॉन्ट्रॅक्ट्स) वाढवु पाहणारयांनो, सांत्वना शोधणारया, मैत्री शोधणारयांनो वास्तवाला पर्याय शोधणारया वास्तवपीडीतांनो ! एकाकी आत्म्यांनो, एकाकी वासनांनो, एकाकी पिडीतांनो गरळ ओकणारया सरळ बोलणारया एरवी कधीही व्यक्त झालेच नसते अशा सर्व व्यक्तात्म्यांनो ! या एकाकी आत्म्यांना व्यक्त होण्यासाठी फ़ुकटात ब्यान्डविड्थ पुरवणारया उदार संस्थळ मालकांनो ! उदंड उत्साहींनो कट्टे भरवणारयांनो कट्टे मिरवणारयांनो गड कील्ले चढणारयांनो पिकनिक जगणारयांनो ! जीवनासक्तांनो उन्मुक्त उत्तेजितांनो ! आयडी मागील माणसांस भिडु पाहणारया भावुकांनो !

वाचन 6742 प्रतिक्रिया 0