आठवणी : गुळमट तिखट कडू
आताच लोकसत्ता वाचत होतो. खूप मज्जा येते ते तसले भारी शब्द वाचायला.
व्यामिश्र, जनरेटा, उद्बोधक....
एकदम जुन्या गोष्टी आठवायला लागल्या.
शाळेत असताना असे शब्द वाचले , की मी कुठेही ते शब्द ठोकून देत असे.
उदा:-
"मी आज व्यामिश्र खेळलो."
"मला आज खूपच उद्बोधक वाटतय."
किंवा "भाजीची चव उद्बोधक आहे."
आज "शाळेत जनरेटा पोचला."
.
.
"शी "ला विष्ठा म्हणतात समजेपर्यंत दुसरी तिसरीत कानावर पडलेला " शिष्टाचार " हा शब्द "विष्ठाचार ", "व्यभिचार " असा कसाही वापरायचो.
पेप्रात "विष्ठावंत नाराज " असं छापून यायचं असं मला वाटे.
दप्तर टाकायचो आणि गिळायला मिळेपर्यंत घरभर उंडारत असलं काहीतरी बडबडत सुटायचो.
तोंडात गूळ - शेंगदाणे, चिवडा असा कशाचातरी बकाणा भरलेला असायचा.
कितीही दंगा करुन शाळेतून आलो तरी थकलेलो नसायचो.
तेच शब्द आज पुन्हा लोकसत्तेत सापडले. -- व्यामिश्र, जनरेटा, उद्बोधक. मजा वाटली!
.
.
.
माझी आजी भांड्याला "पातेलं " किंवा "भुगणं/भुगुणं" म्हणे. ते पहिल्यांदा ऐकल्यावर मी स्टीलच्या गंजात तोंड घालून
"भुंग भुंग भुंग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग" असं करत बसलो होतो बराचवेळ.
.
.
.
.
एकदा कधी नव्हे ते आम्ही सहकुटुंब थेट्रात गेलो होतो. मिस्टर इंडिया किंवा तेजाब चित्रपट असावा.
तेव्हा चार पाच वर्षाचा असलेला मी बसल्याजागेवरच उगीच चुळबुळ करत बाइक सुरु करताना आवाज काढतात तसा काढत होतो.
"बुंग बुंग बुंग्ग्ग्ग्ग्ग
स्वींइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइं"
थोडयवेळानं आवाज बराच व्हायला लागल्यावर आईने मला चूप बसायची खूण करत
"शूssss चुप बस बरं बेटा" असं दरडावलं.
मग मी मोठमोठ्यानं ठणाणा करत "चुप बस ब्येट्टा
चुप बस ब्येट्टा . चुप बस ब्येट्टा "
म्हणत नाचायला लागलो.
.
.
.
पत्नी दिवसरात्र घाबरवते मला.
" तुझा मुलगा साक्षात तुझाच अवतार निघाला तर काय करशील ?"
माझी दातखीळ बसते. निदान वयाची पहिली पाच-सात वर्षे तरी त्याने मी होतो तसा असू नये असे वाटते.
आई-बाबांचा लैच वाईट छळ केला राव मी.
.
.
.
प्राथमिक शाळा. कागदाचे अगदि लहान लहान -- फारफारतर नखभर किम्वा त्याच्याही अर्ध्याच आकाराचे कपटे/तुकडे बेंचवर टाकायचो.
प्लास्टिकची पट्टी डोक्यावर केसाला घासून त्याच्यापासून एखाद दोन इंच जवळ आणली की कसे कुणास ठाउक कागद त्या पट्टीकडे आकर्षित व्हायचे.
लोखंड चुंबकाकडे होतं तसं. एकदा घटकचाचणीत पेपर लवकर लिहून झाल्यानं पहिल्या पानाचा -- विद्यार्थ्याचं नाव वगैरे असतं तो काही भाग हा
उपद्व्याप करण्यासाठी फाडून ठेवला होता!
.
.
.
दहावी बारावीपर्यंत "स्मॉल वंडर " ह्या स्टार प्लस वर लागणार्या लहान मुलांसाठीच्या सिरियलचा पंखा होतो. कुणीही भेटलं की त्याला उत्साहानं त्या हॅरिएट सारखा "हाईईईई" करायचो. अरे हां. हॅरिएट कोण? सिरियलमधल्या "जेमी -द बिग जे" आणि विकी ह्या शाळकरी भावाबहिणींची ती क्लासमेट.
जेमीची स्पर्धक व जेमीवर क्रश असणारीसुद्धा. विचित्र्,मूर्ख हावरट आणि ओव्हरएक्स्प्रेसिव्ह व्रात्य मुलगी.
तर असो. ती "हाईईईई" करी. डेंतिस्टला दात दाखवताना जसे "ईईईई" करत सगळे दात दाखवतो तसे.
सिरियल पाहून झाली की आम्ही तिघे -- मी केशा आणि विन्या ; आम्ही केशाच्या असणार्या चारमजली बिल्डिंगच्या गच्चीवर क्रिकेट खेळायचो.
फॉरेस्ट डिपार्टमेंटची दाट झाडी शेजारीच होती. रिमझिम भुरभुर पाऊस सुरु होता. आम्ही खेळायला सुरुवात करणार इतक्यात गच्चीवर आलेली वानरांची
टोळी दिसली. वानर....
काळ्या तोंडांची काळ्याकरड्याच रंगाचीच आणि जवळजवळ आमच्याइतकीच उंची असणारी ती वानरं.
ती गच्चीच्या दुसर्या टोकाला.आम्ही इकडं. मी लाडानं त्यांना "हाईईईई" असं म्हणालो अन् एकदम एक वान्नर पेटलन् राव!
तावातावानं, आवेशात ते पुढं येउ लागलं.संतापलं असावं. आपण दातओठ खाताना असतो त्याचे उग्र भाव.
ते एकटेच. आम्ही तिघे! तरी ते थांबेना. आम्ही होतो तिथूनच त्याला "ए हाट"..."ए जा"..."फिर्र फिर्र..." केलं.
पण ते कशालाच ऐकेना. तावाताव्नं पुढच येउ लागलं.
आम्हाला काहीही कळेना.केशा आणि विन्या झटकन दाराजवळ असल्याने सटकले.
मागोमाग मीही निघालो अन् दाराजवळच सटकन् आपटलो. कुठूनशी ऑइलची बाटली गच्चीवर आली होती. त्यावर घसरून पडलो.
मागोमाग वान्नर.
पण तेवढ्यात धप्पकन आवाज. बहुदा तेही माझ्या मागेच कुठेतरी घसरून पदले असावे.
मी कसाबसा बाहेर सरपटत बाहेर. थेट दार लावून घेतले घट्ट.
हुश्श.
वान्नर भडकण्याचं कारण मागाहून समजलं ते असं :-
तो हुप्प्या वान्नर - टोळीचा प्रमुख नर असावा. आधीच्या नराला च्यालेंज करुन, हाणामारी-लढाया करुन हाकलून लावतो नवा नर त्यांच्यात.
नवा नर -- च्यालेंजर आधीच्या टोळीप्रमुखाला च्यालेंज कसं करतो? "ईईईई" करत त्याला दात दाखवत, दात ओठ खात तो त्याच्यावर हल्ला करतो.
त्यादिवशी मी "त्या"ला "हाईईईईई" म्हटलेलं होतं !!!
.
.
.
एकदा कोल्हापूर-पुणे अशा प्रवासासाठी आम्ही पणजी-कोल्हापूर-पुणे अशी बस निवडली होती. ती रात्री ९ला निघणार म्हणून रंकाळ्याहून निघून लवकर ष्ट्यांडवर पोचलो
दोनेक तास आधीच.पण ती पणजीहून ९ वाजता निघणार आहे, असं मागाहून समजलं! म्हणजे ती पणजीहून कोल्हापूरला येइपर्यंत आम्ही पुढचे सहा सात तास ष्ट्यांडवरच.
.
.
.
नव्यानेच कोवळी कोवळी बोकड दाढी यायला लागली होती. त्यावेळेला गांधी-विनोबांमुळे "स्वावलंबन" डोक्यात भरलेले/भारलेले.
ट्रिमरने दाढीसोबतच कटिंगही करण्याचा प्रयत्न. डोके अर्धवट भादरले गेले असताना ट्रिमरनं मान टाकली. मग तसच कटिंग सलूनकडे प्रस्थान.
.
.
.
लहानपणी खडीसाखर म्हणून तोंडात तुरटी तोंडात टाकली.
.
.
.
पाच सात वर्षांचा असेन.लहानपणी इतर अनेकांप्रमाणे मीही लाडू चोरुन खात असे. आमच्याकडे एक मोठा स्टूल होता.
त्याच्यावर चढायला शिडीसारख्या पायर्या होत्या.(बांधकामवाले "घोडा" म्हणतात अशा स्टूलला.) आई बाबा बाहेर गेलेले.
त्यावर चढून लाडू घ्यायचा प्रयत्न. ते पडलं धपकन् खाली. माझा तोल सावरायला म्हणून कपाटाला/अल्मारीला लटकायचा प्रयत्न .
ठाण्णकन् आवाज. आख्खी अल्मारी घेउन अस्मादिक खाली.
.
.
.
दिवाळीची पहाट. अर्धवट झोपेत असताना अलार्म बंद करायला उठलो. लाइट नसल्याने मेणबत्ती पेटवली. त्या प्रकाशात दिसलं :-
मेणबत्तीऐवजी बुलेट बॉम्ब पेटवलाय मस्त!
=)) =))
--मनोबा
अवांतर :-
हापिसातून मिपा उघडत नै :( उरलेल्या वेळात धड मिपा पूर्ण वाचून होत नाही.
तुम्हाला मागील दोन चार महिन्यात अत्युत्कृष्ट असं जे जे काही मिपावर आलय असं वाटतं त्याच्या लिंका मला दिल्यात आभारी असेन.
वाचन
10839
प्रतिक्रिया
0