गोविंदा आहे.....म्हणूनच
लेखनविषय:
काव्यरस
श्रीकृष्ण आमचा देव आहे
दहीहंडी संस्कृतीची ठेव आहे
आज तरुणाईला चेव आहे
म्हणूनच
आयोजकांचा धंदा आहे
सामान्यांचा वांदा आहे
वर चढणारा गोविंदा आहे
म्हणूनच
जोश थोडा मनात आहे
उसन्या नशेची साथ आहे
ही संस्कृतीवर मात आहे
म्हणूनच
टीशर्टवर कृष्णाची आकृती आहे
ट्रकमधून ओसंडते विकृती आहे
ही मुळी न आपली संस्कृती आहे
म्हणूनच
डीजेचा ठणाणा आहे
गोविंदांचा धिंगाणा आहे
आयोजकांचा ताठ बाणा आहे
म्हणूनच
थरावर लावायचा थर आहे
समोर पैशाचा डोंगर आहे
वाट बघणारं घर आहे
म्हणूनच
ही आयोजकांची स्पर्धा आहे
गोविंदांची त्रेधा आहे
बघ्यांचा जीव अर्धा आहे
म्हणूनच
स्पर्धा आहे आता, केवळ खोडी नाही
नशा आहे आता, केवळ गोडी नाही
काळजी आहे तुमची, तीही थोडी नाही
म्हणूनच
नाही असं कोण म्हणतंय?
कुणी म्हटलं तरी कोण ऐकतंय?
'सांभाळून!' इतकंच सांगावं वाटतंय
म्हणूनच
- अपूर्व ओक
वाचन
2650
प्रतिक्रिया
0