मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लवकरच येत आहे: चिनाब रेल्वे पूल नावाचा चमत्कार

चलत मुसाफिर · · भटकंती
(हेच वर्णन इंग्रजीमध्ये माझ्या ब्लॉगवर येथे वाचता येईल) काश्मीरला जोडणारी रेल्वे हा एक अवाढव्य आणि आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावणारा प्रकल्प आहे. मी काही इंजीनीअर नाही. पण या रेल्वेमार्गावर निर्माण होऊ घातलेला चिनाब नदीचा पूल पाहताच हे एक जगावेगळे आणि असामान्य महत्वाकांक्षी प्रकरण आहे, हे समजायला कोणालाही अभियांत्रिकी विद्येची गरज भासू नये. कटरा (वैष्णोदेवी) ते काझीगुंड हा या प्रकल्पाचा सर्वात खडतर टप्पा आहे. या पर्वतीय भूभागात, साधारण २०० किमी लांबीचा हा लोहमार्ग बनवता यावा म्हणून रेल्वेने आधी सुमारे ७०० किमीचे रस्ते बांधले आहेत, यावरून कल्पना करावी. मुळात पीरपंजाल पर्वतरांगात लोकवस्ती विरळ. जी लहानसहान गावे आहेत, ती बहुतेक गाडीरस्त्यापासून (किमान) पाच ते सहा तास दूर आहेत. याअगोदर मैलोनमैल भागात रस्तेच नव्हते. रेल्वेचे काम सुरू झाल्यापासून प्रथमच अशी कित्येक गावे रस्त्यांना जोडली गेली आहेत. चिनाब रेल्वे पूल हा कुरी नावाच्या अशाच एका चिमुकल्या गावाजवळ आहे. त्याचे स्थानिक पातळीवर आत्तापासूनच "कुरी ब्रिज" असे नामकरण झाले आहे. एकूणच या भागात रस्त्यांची खस्ता हालत असल्यामुळे, पर्वतरांगातून वाट काढत, जीव मुठीत घेऊन धक्के खात तिथे पोचणे हे एक दिव्यच आहे. ("मागच्या आठवड्यात वरच्या आळीतला तात्या जोग जाऊन आला. चारपाच हाडं हरवली म्हणतो त्या गाडीत!" इ.) Chenab Rail Bridge 1 Chenab एकूण, तीव्र इच्छाशक्ती आणि वैष्णोदेवीचा आशीर्वाद दोन्ही आवश्यक! कटरा येथून रियासीमार्गे अर्नास गावी पोहोचावे. तेथून उजवीकडे वळून सरोंडी नामक खेड्यावरून पुढे कुरीला पोहोचता येते. वाटेत सरोंडी गावात रेल्वेने बनवलेले बांधकामसाहित्याचे महाकाय गोदाम दुरूनच दिसू लागते. Chenab Rail Bridge Warehouse नियोजित पुलाचे स्थान तिथून जवळच आहे. Chenab Rail Bridge 16 Chenab Rail Bridge 3 (यापुढील वर्णन शक्यतो जे दिसले आणि ऐकले त्याप्रमाणे केलेले आहे. तांत्रिक चुका अथवा उणीवा आढळल्यास जाणकारांनी दुरुस्त कराव्यात. स्वागतच आहे.) हा पूल प्रचंड आणि सरळसोट अशा दोन कड्यांना जोडेल. सध्या या दोन बाजूंना सांधणारा कोणताही मार्ग अस्तित्वात नाही. मधून वाहणारी चिनाब नदी विहंगदृष्टीने अवलोकिल्यास (सांडलेल्या!) बशीभर पाण्याइतकी भासते. पुलाची पाण्यापासूनची उंची सुमारे ३५० मीटर आहे. Chenab Rail Bridge 4 पूल बांधण्यासाठी दोहोबाजूंना सुमारे १५० मीटरचे दोन मनोरे उभारण्यात आले आहेत (तुलना: विद्युतवाहिन्यांचे मनोरे हे साधारणपणे ४० ते ५० मीटरचे असतात. तसेच छायाचित्रात तळाशी दिसणारी कार पहावी.). त्यावर कप्प्या लावून सामानाची आवकजावक होते. अवजड सामान उचलण्यासाठी क्रेनही तिथे उंचावर बसवण्यात आल्या आहेत. मला असे वाटले की प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल, तेव्हा पुलाचे अजस्र हिस्सेसुद्धा याच कप्प्यांवरून बहुधा वाहून नेले जातील. Chenab Rail Bridge 5 विशेष म्हणजे हे भीमरूपी मनोरे केवळ एका मध्यवर्ती स्प्रिंगवर तोलले जातात. त्यांचे चार पाय हे हवेत डुलत असतात. कारण त्या उंचीवर सतत वाहणारे सुसाट वारे. जर मनोरा चार पायांवर उभा ठाकला, तर वादळी वारे त्याला मोडून टाकू शकतात. असे झालास मनोरा सरळ चिनाबास्तृप्यंतु होईल आणि पुन्हा दिसणारही नाही. त्यामुळे त्याला "झोपाळ्यावाचून" झुलायला वाव देण्यात आला आहे. Chenab Rail Bridge 6 पुलाकडे येणारा लोहमार्ग त्याच उंचीवरून नेण्यासाठी तितकेच विशाल स्तंभ उभारण्यात आले आहेत. (तुलना: छायाचित्रात बाजूला दिसणारी घरे.) Chenab Rail Bridge 7 Chenab Rail Bridge 8 पैलतीरावर मातीची ने-आण करणारे मालवाहू ट्रक हे केवळ मुंग्यांएवढे दिसतात. Chenab Rail Bridge 14 या पुलाची निर्मिती उत्तर रेल्वे आणि को़कण रेल्वे यांनी संयुक्तरीत्या स्थापन केलेली "अ‍ॅफकॉन" ही कंपनी करीत आहे. पुलाचे एक लघुशिल्प कंपनीच्या कार्यालयाबाहेर पहायला मिळते. Chenab Rail Bridge 10 येथील स्थानिक दैवत "चनैना देवी" हिचे मंदिर कंपनीने उभारून दिले आहे. हे मंदिर उभारल्यावर कामातील वारंवार येणारे अडथळे दूर झाले असे गावकरी अभिमानाने सांगतात. Chenab Rail Bridge 13 पुलाचे एक कल्पनाचित्र आंतरजालावरून साभार. Chenab Rail Bridge 12 याहून अधिक तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे हे वर्णन इथेच आवरते घेतो. जिज्ञासूंनी आपल्या यापुढील शंका डॉ. के. के. गोखलेसाहेबांना विचाराव्यात. धन्यवाद! Chenab Rail Bridge 15 ****** नियोजित चिनाब रेल्वे पूल. कसे पोचावे: जम्मूवरून कटरा - रियासी - अर्नास मार्गे सुमारे ४ तासाचा प्रवास. अत्यंत दुर्गम मार्ग. (कटरापासून सुमारे ३ तास). शेवटचे ८-१० किमी अंतर हे रेल्वेने निव्वळ बांधकामसामग्री नेण्यासाठी काढलेल्या कच्च्या, जुजबी रस्त्याने कापावे लागते. अन्य पाहण्याजोगे: चहूदिशांना अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि सतत साथ देणारी चिनाब नदी. राहण्यासाठी सोयः कंपनीच्या अतिथीगृहाशिवाय काहीही नाही. गोखलेसाहेबांचा वशिला लावावा अगर कटराला आपल्या विश्रामगृहात परत यावे.

वाचन 13076 प्रतिक्रिया 0