मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाचा आणि थंड बसा

भोचक · · जनातलं, मनातलं
आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. वाचा आणि थंड बसा. केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुंबईत रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांना मनोरूग्ण असे संबोधले आहे. लालू यांनी संतापाच्या भरात हे वक्तव्य केले असले तरी राज यांना 'मनोरूग्ण' म्हटल्याने त्यांनी केलेले गुन्हेही कायद्याच्या कक्षेत माफ ठरतात हे लालू विसरलेले दिसतात. कारण कायदाही तेच सांगतो. राज यांनी केलेला गुन्हा हा काही कोणत्याही व्याधीतून आलेला नसून ती एक अतिशय नियोजनबद्ध कृती आहे. त्यामुळेच राज यांना गुन्हेगारी मनोवृत्तीचा राक्षस म्हटले पाहिजे. रामायणकाळातही राक्षसांच्या वेगवेगळ्या झुंडी उत्पात माजवत होत्याच. सध्या महाराष्ट्रात त्यातल्या एका राक्षसाने भाजपचा हात पकडला आहे, तर दुसर्‍याला सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीने भस्मासुरासारखा आशीर्वाद दिला आहे. याच कॉंग्रेस पक्षाने पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करणार्‍या व्यक्तीला बळ दिले होते. अमेरिकेनेही रशियाला शह देण्यासाठी अफगाणिस्तानात तालिबानला प्रोत्साहन दिले होते. त्यानंतर याच तालिबानने जगभरात दहशतवादी हैदोस घातला. राज ठाकरे यांना कॉंग्रेस सरकारने काहीही करायला मोकळीक दिली आहे ते पहाता पाकिस्तानातही तेथील सरकार तिथल्या कट्टरपंथीयांना एवढी मोकळीक देत नसेल असे वाटते. पाश्चात्य देशात आशियाई व्यक्तींवर कधी कधी हल्ले होण्याच्या घटना घडतात. पण महाराष्ट्रात मात्र गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे यांच्या गुडांनी नित्यनियमाने उत्तर भारतीयांना लक्ष्य केले आहे. ज्या महाराष्ट्राच्या भूमीतून बाळ गंगाधर टिळक, सावरकर या नेत्यांचा जन्म झाला, याच भूमीतील प्रतिभाताई पाटील देशाचे सर्वोच्च स्थान भूषवत आहेत, त्या राज्यातील पवित्र भूमी आता अनिर्बंध गुन्हेगारीचे बळी ठरलेल्या सामान्य माणसांच्या रक्ताने बरबटली आहे. देशाला काळीमा फासणारी ही बाब आहे. प्राचीन काळी भारतात पशुंचीही पूजा होत होती. पण हिंसक झाल्यानंतर त्यांना पिंजर्‍यात ठेवले जाई. मानसिक अवस्था बिघडल्यानंतर अशा रूग्णाला दोरीने बांधून ठेवण्याची सरकारी व्यवस्थाही आपल्याकडे आहे आणि आता अशा रूग्णांच्या मेंदूवर चांगल्या शस्त्रक्रियाही होऊ लागल्या आहेत. पण सत्तेतील राजकिय डॉक्टरांकडे मात्र आपल्याच 'रूग्णालयात' गर्दी व्हावी किंवा आर्थिक फायदा व्हावा यातच रस आहे. म्हणूनच तर राज ठाकरे नावाचा राक्षस खुलेआम फिरतो आहे. मुंबई उत्तर भारतीयांविना २४ तास तरी राहू शकेल काय? म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने वेळीच कायदेशीर उपाय योजून राज ठाकरेंवर योग्य ती शस्त्रक्रिया करायला नको का?

वाचन 6352 प्रतिक्रिया 0