सेकंड होम...
लेखनप्रकार
सह्याद्रीच्या सांदी कोपऱ्यात मोठमोठ्या वसाहती उभ्या राहतायत. निसर्गाने अंथरलेल्या हिरवाईचच मार्केटींग करून तिलाच छेदत, भेदत गुळगुळीत रस्ते बनतायत आणि टुमदार घरं वसतायत. सेकंड होम्स म्हणे...
मागे एक (उगाचच) इंग्रजाळलेली माझी मैत्रीण (?) मला कोण कौतुकाने सांगत होती. निसर्गाने नटलेल्या त्या परिसरात पूल साईडला त्यांचा ग्रुप कसा तर्र झाला होता, कसं चिल मारलं वगैरे वगैरे. मला याचंही विशेष वाटलं कि माझा स्पष्टवक्तेपणा (किंवा तुसडेपणा) माहित असूनही तिने मला हे सांगितलं. वर त्या बेहोशी का आलमचे फोटोही दाखवले. अपलोडहि केले असतील कदाचित. आणि करणाऱ्यांनी लाईक्स पण केले असतील...
मला ती ओळीने उभी असलेली घरं, ती हॉटेल्स अक्षरशः ओंगळवाणी वाटली. भडक रंगाच्या त्या इमारती, त्या कृत्रिम बागा. एखादया खानदानी शालीन सुंदरीवर अनावश्यक मेकअपची पुटं चढवून तिच्यावर लादलेल्या या कृत्रिम सौंदर्याचे प्रदर्शन मांडावे तशी...
अमुकच शांघाय करा, तमुकच व्हेनिस करा हि मनोवृत्तीच मला भिकारडी वाटते. उदाहरणार्थ मी मुळचा वाईकडला. वाई वाईच रहावी, मुळातच बारा महिने सौंदर्याने नटलेली ती विराटनगरी आणखी सुंदर व्हावी हे उत्तम, पण वाईचं झुरिच करू किंवा बर्न करू अशी कल्पना एखाद्या मेंढराच्या डोक्यात उद्या शिरली तर ती दरिद्रीच नव्हे का?
श्री सह्याद्री त्याची एखाद दुसरी भली थोरली सोंड एखाद्या जलाशयात सोडून बसला आहे.. त्यावर कैक प्रकारचे प्राणी पक्षी कवेत घेऊन गर्द वनराजी विसावली आहे.. आपण पहाटेला आणि सांजेला त्या जलाशयात तेजस्वी तपस्वी सह्याद्रीचे रूप पाहातो आहोत... पहाटेला खगांच्या कूजनानेच आपल्याला जाग येतेय.. जांभई नाही... आळस नाही... सारा थकवा कुठच्या कुठे नाहीसा झालेला... ज्या बसक्या घरात तुम्ही मुक्कामाला होतात त्या घरातली माऊली तुम्हाला भाजी भाकरी खाऊ घालते... कच्चा कांदा आणि जवसाची चटणी कदाचित.. रात्री एखादे तात्या, आण्णा किंवा भाऊसोबत बाजेवर डुकरा-सश्यांपासून ते मागच्या होळीला खालच्या रानातून आलेल्या डरकाळी बद्दल बोलत बसलाय.. ते भाऊ तात्या एक वाकळ काढून देतात आणि म्हणतात मी तीन म्हयण्याचा हुतो तवा माज्या पंजीनं शिवली व्हती.. तुम्ही निवांत पडलाय फेसाळलेलं निरभ्र आभाळ बघत.. शांत.. एकांत... नेमकं काय होतं ते तुम्हाला कळत नाही पण जडावलेले डोळे तुम्ही कसल्यातरी आंतरिक सुखाने झाकता आणि अलगद डोळ्यांच्या कडांमधून दोन थेंब ओघळून कानापाशी विसावतात.. उजाडल्यावर जडावलेल्या हृदयाने आणि पावलांनी तुम्ही निरोप घेता पुन्हा भेटू म्हणता...
... काही वर्षे जातात.. विद्युतवेगाने कसलीशी ओटू किंवा एचटूओ अश्या नावाची सिटी वसते... आणि ते घर, ते रान, ती होळी, ती डरकाळी, ती पायवाट, ते ताट, ती ‘वाकाळ’ आणि ती सकाळ... सारं सारं हरवून जातं... सह्याद्रीची ती भारदस्त सोंड हवी तशी कोरली जाते... चक्क पंचतारांकित रेस्तराँ उभे रहातात.. पूल.. क्लब... हॉटेल्स.. बंगले, व्हिलाज... कित्येक प्राणी पक्ष्यांना त्यांच्या फर्स्ट होम मधून बेघर करून सेकंड होम्स उभी राहतात.. सांगण्यात येतं कि अमुक गडावरची हि वाट बंद झाली आहे वळसा घालून जा.. हि अमुकची प्रॉपर्टी आहे... इथे पण प्रोजेक्ट येणार आहे... वगैरे वगैरे... याही वेळेला तुमची पावलं जड होतात.. कुठतरी तरी पूर्वीची एखादी खुण सापडेल का?...
... मी मैत्रिणीचं “कौतुक” करण्याऐवजी “डोंगर पोखरल्यागेल्याचं” दुख: झालं म्हणतो...
तिला विचारतो, “...कधी दिवाळीच्या सुट्टीत गावी घराबाहेर ओट्यावर चांदणं मोजता मोजता तुझा डोळा लागलाय?”
ती म्हणते “मला गाव नाही...”
मी वरमतो... तिला सॉरी म्हणतो...
ती “का” विचारते..
मी “काही नाही” म्हणतो...
आणि त्या रात्री कसल्याश्या अस्वस्थतेने गाडगीळांच्या आणि कस्तुरीरंगनांच्या अहवालाची तुलना करत बसतो...
@ सौमि - २९ मे २०१४
वाचन
10399
प्रतिक्रिया
0