मिपा संपादकीय - मातृभाषेतून शिक्षणाची परवड!
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
मातृभाषेतून शिक्षणाची परवड!
मनुष्य हा अनुकरणशील प्राणी असल्यामुळे,लहान मूल त्याच्या सान्निध्यात असणार्या आईवडिल,आजी-आजोबा,प्रसंगी नोकरचाकर यांच्या ओठांच्या हालचालींवरुन, तसेच उच्चार करण्याचा प्रयत्न करीत असते.अधिक सरावाने ते त्याच्या अभिव्यक्तीचे साधन बनते,अर्थातच ती त्याची मातृभाषा ठरते.त्याच्या सर्वांत निकट व्यक्तीची ,बहुतांशी आईची भाषा ,ती त्याची भाषा म्हणजेच मातृभाषा!वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत त्याने त्या भाषेतील बोलण्याचे संपादनकौशल्य बर्यापैकी आत्मसात केलेले असते.त्यानंतर इतर अनेक कौशल्ये संपादन करण्यासाठी त्याला शाळेची वाट धरावी लागते.महाराष्ट्रात साधारणतः दोन ते तीन दशकांपूर्वी शाळेत प्रवेश घेतेवेळी,फारसा प्रश्न येत नसे.आईवडिलांचे बोट धरुन ते सांगतील त्या मराठी माध्यमाच्या शाळांत सर्वसामान्य मुले प्रवेश घेवून आपल्या शालेय जीवनाला प्रारंभ करीत असत.
आजच्या काळात शाळाप्रवेश व शिक्षणाचे माध्यम ही एक गहन सामाजिक समस्या होऊन बसली आहे.ह्या समस्येमागे पालकांची बदलती मानसिकता हेच मुख्य कारण असावे.जागतिकीकरणाच्या रेट्यात आपले मूल इंग्रजीशिवाय मागे पडेल की काय ह्या भीतीने धास्तावलेला पालकवर्ग स्वतःच संभ्रमित अवस्थेत आहे आणि म्हणूनच खिशाला परवडत नसतानाही महागडे शुल्क आणि भरमसाठ देणग्या देऊन तो आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश करवितो. ह्यामागे कित्येक वेळा विचार न करता एकापाठोपाठ एक विहीरीत उड्या मारणार्या बोकडांसारखीच त्याची गोंधळलेली मनोवृत्तीच दिसून येते.त्यानंतर आपल्या पाल्याच्या भविष्यात उद्भवणार्या समस्यांचा काही वेळा अज्ञानेने तर काही वेळा जाणूनबुजून पालकवर्ग विचार करीत नाही असे दिसून येते.
वास्तविक पाहता ,जगातील सर्व शिक्षणतज्ज्ञांच्या संशोधनांतीमते मूलाचे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच होणे आवश्यक आहे कारण मातृभाषेतून विषयाच्या मूलसंकल्पना{Basic Concepts} जितक्या लवकर स्पष्ट होतात, जितक्या दृढपणे मुलाच्या मनावर ठसतात ,तितक्या त्या परभाषेतून कधीच होत नाहीत.असे सिद्ध झालेले असतानाही आपल्याकडे मात्र ह्याच्या उलटच चित्र आज दिसून येत आहे.प्राथमिक शिक्षणाची सुरुवातच जर इंग्रजीसारख्या परक्या भाषेतून झाली तर त्या मुलाच्या डोक्यात शिक्षणाचा गोंधळच माजतो कारण घरीदारी बोलली जाणारी एक भाषा आणि शाळेत बोलली जाणारी,शिक्षणाचे माध्यम असणारी दुसरी भाषा ह्या दोहोंचा मेळ योग्य रितीने घालणे त्याच्या छोट्याशा,निरागस मनाला फारच अवघड जाते.उदा.गणितातील २ ह्या अंकाची संकल्पना तो लगेच आत्मसात करेल पण two,to,too यातील फरक समजावून घेऊन त्यांचा योग्य वापर करणे त्याला फारच अवघड जाईल.त्यातून आपल्याकडील इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील शिकविणारे शिक्षक हे बहुसंख्येने दाक्षिणात्य असल्यामुळे ते मराठी विद्यार्थ्यांशी फारसा संवाद साधू शकत नाहीत आणि साधलाच तर तो आपल्या राष्ट्रभाषेतून! म्हणजे मूलाच्या डोक्यावर आणखी एक भाषा शि़कण्याचे ओझे! त्या लहानग्या जीवाने ओझी वहायची तरी किती आणि कशासाठी? त्यातही दाक्षिणात्य शिक्षकांचे 'यल्','यम्'सारखे भयानक उच्चार त्याच्या कोवळ्या मनावर तसाच ठसा उमटवितात ते वेगेळेच.काही कॉन्व्हेंट स्कूल्स सोडली तर महाराष्ट्रात सर्वत्र हेच चित्र आहे.परिणामी त्या मुलाची ' एक ना धड भाराभर चिंध्या' अशी अवस्था होते.तो विद्यार्थी कोणत्याच भाषेत प्रावीण्य संपादन करु शकत नाही .वयाच्या दहा ते बाराव्या वर्षापासून त्याने परभाषा शिकणे योग्य कारण तोपर्यंत त्याचे मन स्वकोषातून बाहेर पडून चौकसपणे दुसरे नवीन काहीही शिकण्यास उत्सुक व तयार असते.
मराठी माध्यमात शिकलेले विद्यार्थी जेव्हा कॉलेजजीवनात प्रवेश करतात तेव्हा आपल्या पाल्याला ह्यापुढील शिक्षण इंग्रजीत असल्यामुळे झेपेल की नाही अशी पालकांच्या मनात धास्ती असते आणि अशा विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते.परिणामी, तरुणवयात ते अनेक भाषांची सरमिसळ करुन बोलू लागतात.वास्तविक पाहता,ह्या समस्येला शि़क्षणमाध्यम हे कारण नसून सामाजिक परिस्थितीच कारणीभूत असते.कित्येकवेळा विद्यार्थ्यांच्या आसपास वावरणारी मंडळीदेखील हा न्यूनगंड वाढविण्यास मदत करतात.योग्य समुपदेशनाने ह्या समस्येचे सहज निराकरण होऊ शकते.
परदेशातील अनुभव लक्षात घेतले तर असे आढळते की चीन,जपान,जर्मनी इ. तांत्रिकप्रगत राष्ट्रातही मुले मातृभाषेतूनच शिकतात.त्यानंतर उच्च शिक्षणही घेतात.मातृभाषेतून शिक्षण घेऊनही ती जगात कोठेही मागे पडली आहेत असे दिसून येत नाही.याचाच दुसरा अर्थ असा की स्वातंत्र्य मिळून ६१वर्षें उलटून गेली तरी आपल्यावरची इंग्रजांची मानसिक गुलामगिरी अजून सुरुच आहे.महाराष्ट्र सरकारने सर्वांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून घेणे मोफत केले आहे परंतु सुशिक्षित व अशिक्षितही अशा जवळजवळ ७० टक्के लोकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे.पाल्याकडून अवाजवी ,अवास्तव अपेक्षा आणि त्या पुर्या न झाल्यास येणारे मानसिक नैराश्य,येन केन प्रकारेण मुलाच्या उज्ज्वल यशप्राप्तीसाठी वाढलेले कोचिंग क्लासेसचे प्रस्थ हे सर्व दुष्टचक्र विद्यार्थी आणि पालकांच्या मागे लागते.त्यातून सुटण्यासाठी पालकांनी ह्या सर्वांचा विचार करणे अगत्याचे आहे.परदेशात वास्तव्य, प्रांतीय बदल्यांची नोकरी इ. कारणांमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून पाल्यांचे शिक्षण ही काही वेळा अपरिहार्यता ठरते हे खरे परंतु त्यांचे प्रमाण तुलनेने पाहता अत्यल्पच आहे.
वरील सर्व गोष्टींवर विद्यार्थीकेंद्रप्रमुख {student centred} मानणार्या शिक्षणतज्ज्ञांनी काही उपाय योजणे आवश्यक आहे.आपल्या सरकारने तर जाणूनबुजून ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे किंबहुना सर्वांगीण निकषांभावी सर्रास मान्यता दिल्यामुळे विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळा दरवर्षी भूछत्रासारख्या उगवत आहेत.मराठी भाषेतून शिक्षण घेणे म्हणजे हल्ली कमीपणाचे मानल जात आहे.अशा विद्यार्थ्यांकडे काहीशा उपहासाने बघितले जाते,जसा काही तो दोषी आणि त्याचे पालकही दोषी!
परिणामी सर्व ओघ इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळल्यामुळे उत्तमोत्तम,नामवंत मराठी शाळांतील कित्येक वर्ग विद्यार्थ्यांभावी बंद पडले आहेत.जुन्या चांगल्या शाळा सरकारकडून वेतनेतर अनुदान वर्षानुवर्षे न मिळाल्याने कशाबशा तग धरुन आहेत.एकेकाळी नावाजलेल्या मराठी शाळा,विद्यार्थीगणसंख्या पुरेशी नसल्याने एकतर शेवटचे श्वास घेत आहेत किंवा बंद पडण्याच्या वाटेवर चाल करीत आहेत.त्याउलट अमराठी लोकांनी त्यांच्या मुलांसाठी काढलेल्या त्या त्या मातृभाषिक शाळा {गुजराथी,तामिळी,उर्दू इ.)जोरात चालू आहेत.आपल्याच महाराष्ट्रात,आपल्याच मराठी शाळांची अशी दुरवस्था कां ह्याचा साकल्याने विचार होणे आवश्यक आहे.
प्रत्येकाच्या मनात आपल्या प्रिय शाळेसाठी एखादा छोटा कोपरा असतोच.आपल्यापैकी बहुतेक जण मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेले असतील तर त्यांना आपल्या मुलांना 'ही माझी शाळा' असे दिमाखाने दाखविण्याची कधी संधी आलीच तर तिथे ऐटीत उभे राहिलेले एखादे व्यापारीसंकुल दाखविण्याची पाळी येऊ शकते आणि तिथल्याच मॉलमधून मुलाला, त्याच्या नकळत डोळे पुसून ,कपडे वा खेळणी विकत घेऊन देण्याची वेळ येऊ शकते.
'सूज्ञांस अधिक सांगणे न लगे!'
पाहुण्या संपादिका : वैशाली हसमनीस.
वाचन
9823
प्रतिक्रिया
0