फुकटेगिरी
लेखनप्रकार
नमस्कार लोकहो !!
आज एक नवीन विषयाला सुरूवात करीत आहोत. विषय सर्व मानवजातीच्या जिव्हाळ्याचा आहे. तो म्हणजे फुकटेगिरी.
प्रत्येकाला फुकट मिळालेली गोष्ट आवडत असते. भय्याकडे अ़ख्खी पाणीपुरी खाल्ल्यावर त्याच्याकडून वर एका फुकट पुरीची अपेक्षा असते.
गावाला स्वत:च्या बागेत आंब्यांची रास पडली असेल तरी च्या मायला त्या शेजार्याच्या झाडावर दगड भिरकवण्यासाठी आमचा हात अजूनही शिवशिवतो. हाच आम्ही जिवंत असल्याचा पुरावा.
आता आम्ही कोकणस्थ ब्राह्मण असल्यामुळे आमची फुकटेगिरी इतरांपेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोकणस्थांनी राग मानू नये कारण हे वास्तव आहे.
तर मंडळी, येथे कृपया आपल्या फुकटेगिरीचे किस्से लिहा. म्हणजे आपल्यासारखे इतरही या जगात आहेत, याचा आनंद सर्वांना मिळेल.
आपला,
(आनंदयात्री) धोंडोपंत
आमच्या फुकटेगिरीचा एक किस्सा सुरुवातीला -
आमच्या गावात बबनशेठ नावाचं एक बडं प्रस्थ आहे. मोठा चिरेबंदी वाडा, खूप मोठी भातशेती, आंबा आणि काजूची बागायत, मँगो कॅनिंग फॅक्टरी, घरासमोर ५/६ गाड्या, मालवाहतूक करण्यासाठी ट्रक, हायवे वर एक मॉटेल, जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा, पतपेढ्यांचे अध्यक्षपद, गावातल्या कुठल्याही कार्यक्रमाला सन्माननीय पाहुण्यांचे आमंत्रण वगैरे बर्याच गोष्टीं त्यांना वश आहेत.
त्यांच्या गोठ्यात पन्नासएक जनावरं. ती सगळी जनावरं म्हणजे गाई, बैल, म्हशी आणि त्यांच्या राखणीसाठी चार पाच गुराखी पोरं, तीन चार धनगरी कुत्रे असा सगळा लवाजमा सकाळी त्यांच्या वाड्याबाहेर पडतो. दिवसभर गुरं रानात चरून दुपारी साडेतीनच्या सुमारास ही वरात आमच्या घरावरून जाते.
गावाबाहेर एक डॅम आहे तीथे गुरांना पाणी पाजून मग संध्याकाळी साडेपाचला पुन्हा गोठ्यात जातात. मग दूध काढणं, उकाड्याचे दूध पोहोचवणे वगैरे कामे सुरू होतात.
तर सांगायची गोष्ट अशी, दुपारी जेव्हा ही गुरे आमच्या घरासमोरून जात तेव्हा बाळ्या नावाच्या गुराख्याला आम्ही बोलावून त्याच्याशी गप्पा मारीत असू. तो बाळ्या पण इरसाल होता लेकाचा. गुरं समोरून निघाली की आमच्या भावंडांपैकी कुणीतरी
"काय बाळासाहेब, कसं काय चाललाय?"
बाळ्या खूष. "या बसा इथे जरा"
"नको वो. शेटनी पायला तर *******"
"अरे, शेट गेला त्याच्या आयच्या *** . तू बैस इथे."
असे म्हणून बाळ्याशी गप्पा सुरू होत. बाळ्या हा "हेड गुराखी" होता. आता बाळ्याच बसला म्हटल्यावर इतर पोरंही तिथेच रेंगाळायची. सहाजिकच गुरंही तिथेच.
मग आमच्यापैकी कुणीतरी त्यातल्या एखाद्या म्हशीला हाकारत आमच्या वाडीत घेऊन जायचं. आमच्या गुरांसाठी भिजवलेल्या चंदीचं एखादं घमेल त्या म्हशीपुढे टाकायचं आणि आमच्या बुध्या गड्याला तिचे दूध काढायला लावायचं.
म्हशीचे दूध काढण्याआधी तिला 'उतरवायला' लागते. ती एकदम दूध देत नाही. त्या गोष्टीला साधारण पाच सात मिनिटे लागतात. पण बुध्या त्यात प्रवीण होता. तो पाण्याचा एक हबका सडावर मारायचा आणि दोन्ही हातांनी तिला उतरवायचा. त्यामुळे दोन तीन मिनिटात दूध यायला सुरूवात व्हायची.
आणि मग काय विचारता राव, दुधाची गंगा वहायची हो गंगा ! बबनशेठच्या म्हशी म्हणजे आमच्या कोकणातल्या गावठी म्हशी नव्हेत राव. त्या म्हशी म्हणजे 'मुर्रा" जातीच्या . हरयाणावरून आणलेल्या. एक म्हैस सात ते आठ लिटर दूध द्यायची. स्टेनलेसस्टीलच्या दोन मध्यम आकाराच्या बादल्या दुधाने भरायच्या म्हाराजां !
दूध काढून झाल्यावर तिला हाकारत पुन्हा रस्त्यावर आणायची आणि बाळासाहेबाला नमस्कार करून पाठवायचा. मग मज्जाच मजा.
बबनशेठ मात्र रोज विचार करीत असेल. च्यायला, रोज एक म्हैस दूध देत नाही हा काय प्रकार आहे?
बरोबर आहे हो. दुपारी साडेतीनला दूध काढल्यावर जगातली कुठली म्हैस पुन्हा संध्याकाळी साडेपाचला दूध देईल?
आपला,
(फुकट्या) धोंडोपंत
वाचन
11185
प्रतिक्रिया
0