पौष्टिक मूग भजी
काल रविवार होता आणि काहितरी चटक-मटक खाण्याचा मूड होता. मग मूग भजीची आठवण आली. मूग हे कडधान्य आहे आणि ते पौष्टिक पण आहे. घरात मिरची, कोथिंबीर, अदरक-लसूण, बेसन हे होतच. मग पटकन जाऊन
भिजलेले हिरवे मूग घेउन आले.(भिजलेले हिरवे मूग नसल्यास मूगाची डाळ ३-४ तास भिजत घालावे)
आता लगेच तयारीला लागले.
साहित्य :
२५० ग्राम भिजलेले मूग
४-५ हिरव्या मिरच्या (तिखट)
आर्धी गड्डी चिरलेली कोथिंबीर
अर्धा चमचा अदरक-लसूणची पेस्ट
हळद
जीरे
बेसन
मीठ आणि
लाल तिखट
तेल
सौस / हिरव्या चटणी किंवा चिंच,गूळ,खजूराच्या गोड चटणी
आता कृती:
भिजलेले हिरवे मूग असल्यास बारीक वाटून घ्यावे.
मूग डाळ / कच्चे हिरवे मूग असल्यास किमान ३-४ तास पाण्यात भिजत ठेवावे. नंतर त्यातील पाणी काढून टाकून पाणी न घालता बारीक वाटून घ्यावे.
नंतर मिरच्या, कोथिंबीर, जिरे वाटून घ्यावे.
आता एका पातेलात वाट्लेले मूग, बेसन, हळद, लाल तिखट(रन्ग येण्यासाठी, स्वादानुसार), मीठ(स्वादानुसार) आणि वरील वाटलेले मिश्रण एकत्रित करावे.
मग कढईत तेल घ्यावे. मिडीयम हाय गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे.
चमच्याने किंवा हाताने डाळीचे मिश्रणाचे छोटे गोळे तेलात सोडावे.
भज्यांना गोल्डन ब्राऊन रंग आला कि (अधिकचे तेल असल्यास थोडावेळ कागदावर) काढून टाकावे.
सौस किंवा हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंच,गूळ,खजूराच्या गोड चटणीबरोबर गरमागरम भज्या खाव्यात. :-)
नोट : मला फोटो कसा टाकायचा हे माहिती नाही. :-( नाहीतर फोटो टाकला असता.
वाचन
17787
प्रतिक्रिया
0