मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काश्मीर प्रश्न, नेहरु, माऊंटबॅटन वगैरे

आशु जोग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
२६ ऑक्टोबर १९४७. हिंदूस्थानच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस. जम्मू-काश्मीर हे राज्य भारतात विलीन झाले. पण जम्मू-काश्मीर म्हटलं की काही लोक नेहरु, लेडी माउंटबॅटन, युनोत प्रश्न नेणे याच गोष्टी रवंथ करत बसतात. त्यापलिकडे चर्चा जातच नाही. JK म्हणूनच आज जम्मू-काश्मीरबाबत काही माहिती, विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. १. राज्याचे नाव 'जम्मू-काश्मीर' असे आहे. नुसते काश्मीर नाही. म्हणून इथून पुढे तसाच उल्लेख करुया. २. अनेकांना काश्मीर हा या राज्याचा खूप छोटा भाग आहे हे माहित नसते. काश्मीरपेक्षा जम्मू आणि जम्मूहून लडाख मोठे आहे. ३. भारतात सामील झालेले हे सर्वात मोठे राज्य(संस्थान). जम्मू, काश्मीर, लेह-लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, तिबेटचा काही भाग असे ते बनलेले होते. ४. जम्मू-काश्मीर सुरक्षित तर भारत सुरक्षित - या राज्याला पाकिस्तान, अफगाणिस्तान, कझाकिस्तान(रशिया), चीन या देशांच्या सीमा भिडलेल्या आहेत (आज अफगाणिस्तान नाही कारण गिलगिट बाल्टिस्तान भारताकडे नाही) जम्मू-काश्मीरचे सामरीक महत्त्व फार आहे. ५. उद्या २०१४ मधे अमेरीका आपली सैन्य दले अफगाणिस्तानमधून काढून घेइल त्यावेळी तालिबानी मुजाहिदीन भारताकडे वळवण्याचा प्रयत्न असेल. या आक्रमणासाठी भारताची सिद्धता हवी. ६. जम्मू-काश्मीर बाहेरच्या भारतीयांना जम्मू-काश्मीरबद्दल पुरेशी माहिती नाही, हाही एक मोठाच प्रॉब्लेम आहे. ७. लोक जम्मू-काश्मीरला पर्यटकासारखे जातात. ठराविक ठिकाणे पाहतात नि परत येतात. काही जणांना इथे खायला काय मिळते, तर काही जणांना प्यायला काय मिळते याच्यात रस असतो. महिलांना काश्मीरी पोशाख घालून फोटो काढून घ्यायची हौस असते. इथली संस्कृती, इथला माणूस, इथला भूगोल समजून घ्यावा असे किती जणांना वाटते ! जम्मू-काश्मीर हा भारताचाच एक भाग आहे. जम्मू-काश्मीरात आपण पाहुणे नाही. याचा अर्थ इथल्या सुख-दु:खांशी आम्हीही समरस होण्याची गरज आहे. इथल्या निसर्ग सौंदर्यासाठी आम्ही इथे येतो. निसर्गसौंदर्य नसते तर आमचे जम्मू-काश्मीरवरचे प्रेम कमी झाले असते का ? ८. सगळे मुस्लिम भारतविरोधी नाहीत. अनेक गुज्जर हे पक्के भारतनिष्ठ आणि सेनेला मदत करणारे आहेत. ९. पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेखही पाकव्याप्त जम्मू-काश्मीर असाच व्हायला हवा - POJK . १०. जम्मू-काश्मीरमधे आता कुणी हिंदू शिल्लक नाहीत असाही समज आहे. तो चूकीचा आहे. हिंदू तिथे आहेत. अतिशय लढाऊपणे राहताहेत. अमरनाथसारखी आंदोलने यशस्वी करताहेत. ११. मागच्या किश्तवाडच्या दंगलीचाही हिंदूनी जोरदार मुकाबला केला, ठोशास ठोशाने उत्तर दिले. पण यांना भारत वासीयांच्या पाठिंब्याची गरज आहे. १२. भारतीयांची पराभूत मनोवृत्ती ही एक समस्या आहे. लढाईपूर्वीच आम्ही हरलो असे जाहीर करून मोकळे होतो. पाकिस्तानला का घाबरायचे कळत नाही. चीनचाही आम्ही अकारण बागुलबुवा करून ठेवला आहे. १३. अनेक फुटीर नेते त्यांच्या लढ्याचे कारण 'काश्मिरीयत' किंवा 'काश्मीरी अस्मिता' असे सांगतात. मग प्रश्न पडतो एवढ्या काश्मीरी हिंदूंना का हाकलून दिले ? फुटीर नेत्यांकडे याचे उत्तर नसते. त्यामुळे हा 'काश्मीरीयत' चा लढा अजिबात नसून हिंदू - मुस्लिम ही डायमेन्शन त्याला आहेच. १४. हिंदू अत्यंत लढाऊ - जी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स इतर ठिकाणी २४ तासात दंगे काबूत आणण्यासाठी प्रसिद्ध आहे, ती इथल्या हिंदूंपुढे हात टेकते. यात इथल्या माता भगिनीही अग्रेसर आहेत. (त्यांच्या लढण्याच्या पद्धती विचारल्यास खाजगीत सांगेन, इथे लिहित नाही) भारतीय सैन्याशी मात्र यांचे सख्य आहे. मिलिटरी आली की असेल ते हातातले शस्त्र हे लोक खाली ठेवतात. भारतीय किंवा हिंदू मिलिटरी हा एकमेव आधार आहे ही भावना सतत मनामधे असते. त्यामुळे मिलिटरीशी इथले हिंदू झगडा कधीच करीत नाहीत. मिलिटरीलाही या सगळ्याची जाणीव आहे. १५. गिलानी, मीर वाईझ, यासिन मलिक यांना टीव्ही वरच्या प्रसिद्धिने मोठे केले आहे. अन्यथा आपापल्या गल्लीपलिकडे त्यांना कुत्राही विचारीत नाही. १६. जम्मू-काश्मीरवर लेखकांनी असंख्य पुस्तके लिहिली आहेत. इंग्लिशमधे लिहिलेले स्टँडर्ड मानण्याची प्रथा आपल्याकडे आहे. शक्यतो भारतीय लेखक त्यातही अधिकृत कागदपत्रांचा आधार घ्यावा उदा यु. एन रीसोल्युशन्स, लोकसभेने घेतलेले निर्णय इ. ब्रिटिश, अमेरीकन लेखक दूर अशासाठी ठेवावेत कारण हे लेखक भारताचे हितचिंतक नव्हेत. सत्ता सोडताना भारत शक्य तितका कमकुवत रहावा ही इंग्रजांची इच्छा होती. जम्मू-काश्मीर भारतापासून तोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण महाराजा हरीसिंग यांनी जम्मू-काश्मीर भारतात सामील केल्याने ब्रिटिश, अमेरीकनांचे सर्व प्रयत्न वाया गेले. म्हणून तो सूड त्या लोकांनी एक तर युनोच्या माध्यमातून उगवला. उरलेला पुस्तकांच्या माध्यमातून उगवला ज्यात असत्य ठासून भरलेले आहे. १७. सीमेवरच्या जनतेला आकर्षित करण्याचा चीन नेहमीच प्रयत्न करीत असते. पण लेह लडाखमधे त्यांना अजिबात यश आलेले नाही. लडाखमधल्या अगदी चीनी सीमेवरचे तरुणही २६ जानेवारी, १५ ऑगस्टला तिरंगा फडकवतात. पण केंद्र सरकारकडून त्यांना निरोप जातो झेंडा फडकवू नका. तुमचे झेंडावंदन पलिकडच्या चीनी सैनिकांना दिसते. त्यांना कशाला उगाच उचकवायचे ? १८. जम्मू-काश्मीरचा नकाशा चुकीचा दाखवला की आम्हा भारतीयांना बोंबाबोंब करायला फार मजा येते. पण जम्मू-काश्मीरबाबतचे आमचे कर्तव्य तिथेच संपते. नकाशा केवळ कागदावर दुरुस्त न करता प्रत्यक्ष भूगोलही ठीक करावा असे आम्हाला का वाटत नाही ? सरकारला शिव्या देवून विषय संपत नाही. सुरु होतो. १९. पाकिस्तानने जेव्हा जम्मू-काश्मीरवर आक्रमण केले त्यावेळी जे हिंदू पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधे राहीले त्यांना पुढे इस्लाम स्वीकारावा लागला. ज्यांना हिंदू धर्म प्यारा होता असे लोक भारताच्या जम्मू-काश्मीरमधे निर्वासित म्हणून आले. या लोकांच्या तिकडे घरे जमिनी होत्या. पुढच्या ४, ५ वर्षात पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आपण पुन्हा जिंकू त्यावेळी तुमची घरे, जमिनी तुम्हाला परत मिळतील असे आश्वासन या हिंदू निर्वासितांना सरकारकडून मिळाले. आज ६५ वर्षे होवून गेली. पाकव्याप्त जम्मू-काश्मीरही हाती आलेले नाही. त्यामुळे या हिंदू निर्वासितांना जमिनीही मिळालेल्या नाहीत. याहून भयाण गोष्ट म्हणजे यांना भारताचे नागरीकत्त्वही मिळालेले नाही. त्यामुळे शिक्षण, नोकरी या कोणत्याही गोष्टी त्यांना करता येत नाहीत. जिवंत माणसे आहेत पण कागदपत्री नोंदच नाही. ६५ वर्षात ३ पिढ्या झाल्या प्रश्न सुटलेला नाही. २०. महाराष्ट्रात नक्षलवादाची समस्या आहे म्हणून कुणी महाराष्ट्र प्रश्न असा उल्लेख करत नाही. छत्तीसगढमधेही नक्षलवादाची समस्या आहे म्हणून छत्तीसगढ प्रश्न असा उल्लेख करीत नाही. मग जम्मू-काश्मीर बाबत काश्मीर-प्रश्न असा उल्लेख का केला जातो. There is a problem in JK but JK is not a problem. २१. जम्मू-काश्मीरबद्दल अनेक गैरसमज आहेत. महाराजा हरीसिंग यांनी जम्मू-काश्मीर विलीन करायला उशीर लावला, त्यांना वेगळे राहण्याची इच्छा होती. वास्ताविक महाराजा हे अतिशय भारतनिष्ठ होते. १९३९ पासूनच त्यांची सामीलीकरणाची तयारी होती. त्यांच्याबाबतचे गैरसमजही ब्रिटिश-अमेरीकन लेखकांनी पसरवले आहेत. निर्णय घेण्याची जबाबदारी संरक्षणमंत्री बलदेवसिंग, नेहरु आणि सरदार पटेल अशा तिघांची होती. त्यामुळे यश अपयश तिघांचेही आहे. नेहरुंनी प्रश्न युनो मधे नव्हे, युनोच्या सिक्युरीटी कौन्सिलमधे नेला. त्यामुळे युनोला हस्तक्षेपाची कोणतीही विनंती नेहरुंनी केली नव्हती. त्यामुळे इतर देशांमधे जशा युनोच्या सेना जातात तशा सेना जम्मू-काश्मीरमधे आल्या नव्हत्या. प्रश्न युनोच्या सिक्युरीटी कौन्सिलमधे नेल्याने युद्धबंदी करावी लागली. हे साफ झूठ आहे. युद्धबंदी त्यानंतर वर्षाने झाली. या काळात भारत, पाकिस्तान, जम्मू-काश्मीर अशा तिघांचे सेनाप्रमुख ब्रिटीश होते. जम्मू-काश्मीरचे पोलिसप्रमुखही ब्रिटीश होते. अखंड भारताचे सैन्यप्रमुखही ब्रिटिश होते. नेहरुंना सैन्याचे कोणतेच अधिकार नव्हते. त्यामुळे पाक आक्रमणाच्यावेळी जेव्हा जम्मू-काश्मीरचे प्राण कंठाशी आले त्यावेळी नेहरुंना माउंटबॅटनच्या अक्षरशः पाया पडावे लागले. तो सांगेल त्या अटी ऐकण्याशिवाय नेहरुंपुढे पर्याय नव्हता. युनोकडे जाण्याचा, युनोला मधे घालण्याचा माउंटबॅटनचा आग्रह होता. तो नेहरुंना मानावाच लागला त्याशिवाय माउंटबॅटनने सैन्याला आज्ञा दिली नसती आणि जम्मू-काश्मीर संपूर्ण गमवावे लागले असते. पण युनोकडे जातानाही नेहरंनी माउंटबॅटनला कात्रजचा घाट दाखवला. Intervention साठी नव्हे तर केवळ पाकिस्तानची आतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी व्हावी एवढ्यापुरताच तो युनोच्या सिक्युरीटी कौन्सिलमधे त्यांनी मांडला. त्याचा गैरफायदा युनोने घेतला नि यामधे नाक खुपसण्याची संधी शोधली. युनो हा अजिबात निष्पक्ष मंच नव्हता, तो ब्रिटिश, अमेरीका यांच्या वर्चस्वाखाली होता. भारताचे गुंजभरही हित करावे अशी त्यांची इच्छा नव्हती. २२. आज गिलगिट बाल्टिस्तान आपल्याकडे नसल्याने आपल्याला अनेक तोटे होत आहेत. अफगाणिस्तान या भारताला मित्र मानणार्‍या राष्ट्राला आपल्या सीमा लागून नाहीत. इराण इराक आणि इतर अनेक अरब देश भारताचे मित्र आहेत. त्यांच्याशी जमिनीच्या मार्गाने व्यापार करणे अशक्य आणि खर्चिक झाले आहे. या सगळ्या लिखाणानंतर कुणाला नेहरु, माउंटबॅटन, शेख अब्दुल्ला या चर्चेत पडायचे असेल तर ते केवळ इतिहास समजून घेण्यापूरते असावे. ही सगळी माणसे जावूनही आता अनेक वर्षे झाली. त्यामुळे त्यांना शिवीगाळ करण्याचा दुसरा अर्थ असा होतो, मग तुमचे बाप तुमचे आजोबा काय करत होते. की ते *ढ होते ? तसे नव्हते तर त्यांनी का काहीच केले नाही. यापुढे जम्मू-काश्मीरविषयीच्या चर्चेची दिशाही वेगळी असेल. उद्या कुणी यासिन मलिक 'काश्मीरीयत' बाबत बोलेल तर त्याला तिथले हिंदू काश्मीरी नव्हते काय ? असा उलट प्रश्न करावा. सैन्याने केलेले अत्याचार इ. मुद्दे कुणी काढेल तर त्याला अतिरेक्यांनी हिंदू स्त्रियांवर केलेल्या अत्याचाराचा जाब विचारावा. अतिरेक्यांना दिलासा पॅकेज, या बलात्कार्‍यांना जम्मू-काश्मीर पोलिसमधे नोकरी कशासाठी ? प्रशासनात मुस्लिमांचीच भरती का ? हेही विचारावे. जम्मूची लोकसंख्या अधिक असून काश्मीरला लोकसभा, विधानसभेत अधिक प्रतिनिधीत्त्व का ? ३७० कलमाचे आज नेमके स्थान काय ? यावरही विचार व्हावा. जम्मू-काश्मीर भारतात सामील तर झाले, आता त्याच्या भारताबरोबर एकात्मतेसाठी आपल्याला काय योगदान देता येइल याचा प्रत्येकाने विचार करावा. धन्यवाद !

वाचन 9949 प्रतिक्रिया 0