मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रथमस्थानात शुक्राचे फलादेश

धोंडोपंत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
लोकहो !! शुक्रासारखा सौंदर्याचा आणि जगतातील तमाम भौतिक सौख्याचा कारक ग्रह जर कुंडलीत प्रथमस्थानात असेल काय फलादेश मिळतील यासंबंधी हा लेख आहे. प्रथमातील शुक्र व्यक्तिला उत्तम सौंदर्य देतो. हे लोक दिसायला फार सुंदर असतात. चेहर्‍यावर आकर्षक असे तेज असते. नेहमी आनंदी, हौशी, हसतमुख, खेळकर अशा प्रकारचे यांचे व्यक्तिमत्व असते. कपड्यांची, दागिन्यांची, फॅशनची आवड असते. ललितकला, गायन, वादन, नृत्य, सिनेमा, नाटके, करमणुकीचे कार्यक्रम ह्या गोष्टी त्यांना फार आवडतात. मुख्य म्हणजे हे लोक या गोष्टींचा उत्तम रसास्वाद घेऊ शकतात. त्यांचे बोलणे गोड आणि लाघवी असते. त्यामुळे त्यांना लोकप्रियता खूप मिळते. त्यातून ती व्यक्ति एखादी मुलगी असेल तर तिच्यासमोर पायघड्या अंथरणारे किती ’आशिक’ असतील त्याची गणती करता येणार नाही. असे दिवाणे लोक तहानभूक विसरून, तिच्या सेवेत स्वत:ला वाहून घेत असतात. या लोकांना मित्र उत्तम मिळतात. भाग्याच्या दृष्टीने, वैवाहिक सुखाच्या दृष्टीने हा प्रथमस्थानातला शुक्र चांगली फळे देतो. प्रथमात शुक्र असता विवाह लवकर होतो. कर्क, वृश्चिक, मीन या जलराशीत शुक्र असेल तर तो व्यक्तिला बोजड करतो. स्त्रियांच्या कुंडलीत प्रथमस्थानात शुक्र चंद्र युती जर जलराशीत असेल तर तो मादक सौंदर्य देतो. सात्विक सौंदर्य आणि मादक सौंदर्य यात फरक आहे. हेमामालिनी, माधुरी दिक्षितचे सौंदर्य सात्विक आहे तर बिपाशा बसू, मल्लिका शेरावतचे सौंदर्य मादक आहे. या स्थानातला शुक्र हा मंगळ, हर्षल या ग्रहांच्या युतीत असेल तर तो व्यक्तीला अती कामी व विषयासक्त बनवतो. या लोकांची लैंगिक वासना जबरदस्त असते. त्याचप्रमाणे मंगळ हर्षल युतीमधील शुक्र विवाहाबद्दल समस्या निर्माण करतो. परजातीत विवाह, आईवडिलांच्या संमती शिवाय विवाह असे काही ना काही वैगुण्य त्या विवाहात असते. चंद्र, गुरु, आणि रवी या ग्रहांच्या युतीत असलेला शुक्र प्रकर्षाने चांगली फळे देतो. प्रथमात राहु शुक्र युती ही वयाने मोठ्या असलेल्या, विधवा स्त्रीशी किंवा परजातीय स्त्रीशी विवाह दाखवते. पत्नीला दीर्घ मुदतीचा एखादा आजार असतो. शुक्र वृषभ, मिथुन, तुला, कुंभ आणि मीनेत असेल तर उत्तम फळे मिळतात. मेष, कन्या, वृश्चिक व मकर राशीत साधारण मध्यम फळे मिळतात. कर्क आणि वृश्चिकेत प्रथमात शुक्र असता व्यभिचाराकडे कल असतो. वाईट व्यसने असतात. हा शुक्र कलाकौशल्याची कामे, सुंदर वस्तू, लोकांच्या मनोरंजनाची साधने, सौंदर्यप्रसाधने, गायन, वादन, नाटक, सिनेमा या व्यवसायात यश देतो. या शुक्राशी नेपच्यूनचा शुभयोग होत असल्यास दुधात साखर समजावी. अग्निराशीचा म्हणजे मेष, सिंह, धनु या राशीचा शुक्र नोकरीधंदा सुरळीत चालवतो पण फार कष्टाने पुढे यावे लागते. मकरेतील शुक्र स्थिर नोकरी देतो. कर्क, वृश्चिक राशीत शुक्र असणारे लोक वारंवार धंदे बदलतात. कन्येचा शुक्र असता विवाहानंतर भाग्योदय होतो. लग्नी मीनेचा शुक्र असता, २/३ विवाह होतात. ते झाले तर पैसा चांगला हाती येतो. अन्यथा एकच विवाह झाला तर खाऊनपिऊन सुखी अशी स्थिती असते. लग्नी गुरू शुक्र युती भाग्योदयास विलंब लावते. प्रथमस्थानी मकर, कर्क, सिंह राशीचा शुक्र असता पत्नी चांगली मिळते. नवर्‍याला अडीअडचणीला साथ देणारी, आपत्तीविपत्तीला टिकणारी असते. तिचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. पण मकरेतील शुक्र बायको काळीसावळी देतो. स्त्रियांचे कुंडलीत लग्नी शुक्र राहु युती असून त्यावर मंगळ, हर्षल यांचा अशुभ योग होत असेल तर विवाहापूर्वी प्रेमसंबंध जुळून प्रियकराबरोबर पळून जाण्याचा योग येतो. विवाह धार्मिक अगर कायदेशीर होणार नाही. याच स्थितीत मंगळ हर्षल ऐवजी रवीचा अशुभ योग असेल तर स्त्री पळून जरी गेली तरी कायदेशीर अगर धर्मशास्त्राप्रमाणे विवाह होईल. अग्निराशीचा शुक्र असता ( मेष, सिंह, धनु) विवाहयोग उशीरा असतो. स्त्री चांगली मिळून नवराबायकोत प्रेमळपणा असतो. कन्येत शुक्र असता स्त्री कशीही मिळाली तरी चालते. तिच्याशी जमवून घेतात. हे लोक परस्त्रीकडे न पाहणारे असतात. स्त्रियांचा विचार यांच्या मनात कमी असतो. अविवाहित राहण्याकडे कल अगर प्रपंच सोडण्याची भाषा करणारे असतात. मकरेत शुक्र असता विवाहापूर्वी पुष्कळ मुली पाहतात व या ना त्या कारणाने नावे ठेवित बसतात. पुष्कळ सुंदर मुली सोडतात आणि मग मुली सांगून येणे कमी झाले म्हणजे मिळेल त्या चिचुंद्रीशी लग्न करतात. मकरेचा शुक्र असलेल्यांना काळीसावळी बायको मिळते हे वर सांगितले आहेच. मिथुन, तुळ आणि कुंभेचा शुक्र असता स्त्री चांगली मिळते. प्रेमळ, बुध्दीवान, हुषार, विद्वान असते. पण द्विभार्या योगाचा संभव अधिक. मीनेत शुक्र असता २/३ विवाह होतात हे पूर्वी सांगितले आहेच. या लोकांचे बायकोवर प्रेम असते पण तिच्याबरोबर घटका, दोन घटका गप्पा मारत बसणारे हे लोक नव्हेत. बाहेरून आल्यावर मुलांच्या बरोबर गप्पा मारतील किंवा घरात आजूबाजूचे रिकामटेकडे लोक जमवून करमणूक करीत बसतील. त्यामुळे घरात धुसफूस असते. मीनेचा शुक्र असलेल्या पुरूषाला बायकोकडून धन मिळविण्याची अपेक्षा असते. बायकोवर वर्चस्व ठेवणारे हे लोक असतात. स्त्री कुंडलीत प्रथमात मीनेचा शुक्र असता ती नवर्‍याला आपल्या ताब्यात ठेवणारी, रतिसुखाचा पूर्णपणे उपभोग घेणारी, नवर्‍याला बिछान्यात भयंकर खेळवणारी, संभोगात स्वत: होऊन पुढाकार घेणारी, निरनिराळी आसने उपयोगात आणणारी, वैषयिक सौख्यात परब्रह्म मानणारी, लैंगिक वाङ्मय वाचण्याची आवड असलेली, प्रवासात लाभ करून घेणारी, वाहनांची शौकीन, तल्लख बुध्दी असणारी असते. या व्यक्तींना जोडीदाराचे खौख्य भरपूर मिळते. पण यांचा जोडिदार अतिशय बडबड्या म्हणजे ज्याला "नॉनस्टॉप नॉनसेन्स" म्हणता येईल असा व अतिचिकित्सक वृत्तीचा असतो. त्यामुळे क्वचितप्रसंगी प्रेमाचे खटके उडण्याची शक्यता असते. कन्येचा शुक्र लग्नी असता कुटुंब भरभराटीस आलेले असते पण एकमेकांचे न पटण्याचे योग येतात. कर्तबगारीला कुटुंबातील माणसांचाच अडथळा होतो. पण शेवटी यश मिळते. भाग्याला चढउतार असल्याने घाबरेपणा असतो. आकस्मिक संकटे, पति किंवा पत्नी दुखण्याने पीडित, पैशाची अब्रू जाते की काय ही भीति, कोणाला जामिन राहिले असतील तर तेथे फसण्याची शक्यता असे योग वरचेवर येतात. पण अखेरच्या क्षणी बचाव होतो. स्वत:पेक्षा विद्वान व मुत्सद्दी जोडीदार मिळण्याचा योग व त्याच्या तंत्रानुसार पुढील आयुष्य जगण्याची शक्यता. या लोकांना वैषयिक सौख्य मनाप्रमाणे मिळत नाही. या लोकांना वीर्यदोष असण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे कान, नाक, डोळे यांची दुखणी असतात. कन्या लग्नाला शुक्र योगकारक असल्याने तो नीचेचा होऊनही हे लोक बचावतात. धार्मिक मते आपल्या मनाप्रमाणे फिरवणारी ही माणसे असतात. शरीराची ठेवण ओबडधोबड असते. हे लोक कायम अशांत असतात. प्रत्येक गोष्टीत त्यांना अडथळे येतात, स्वप्ने फार पडतात. वडिलार्जित इस्टेट असूनही त्याचा लाभ यांना मिळण्यासाठी फार झगडावे लागते. मेंदूची दुखणी होण्याची शक्यता खूप असते. लग्नात वृषभ, तूळ, मीन, मेष, वृश्चिक राशीचा शुक्र असता दीर्घायू योग होतो. लग्नी शुक्र असता वयाच्या ३ किंवा १५ व्या वर्षी घरातल्या जबाबदार व्यक्तिचा मृत्यूयोग येतो. प्रथमस्थानच्या शुक्राबद्दल अजूनही लिहीण्यासारखे खूप आहे. पण हा लेख फारच मोठा झाल्या असल्याने इथेच थांबतो. आपला, (ज्योतिर्भास्कर) धोंडोपंत (वरील लेखनासाठी फलज्योतिषातील विविध मान्यताप्राप्त ग्रंथांचा आधार घेण्यात आला आहे.)

वाचन 25187 प्रतिक्रिया 0