दुर्गा झाली गौरी!
लेखनप्रकार
बॉस्टनच्या न्यू इंग्लंड मराठी मंडळाने या वर्षी गणेशोत्सवानिमित्ताने एक स्वतःसाठी आव्हान निर्माण केले होते. त्या आव्हानाचे नाव होते, सुमारे ७० हौशी कलाकारांनी भरलेली संगितीका - "दुर्गा झाली गौरी". ही बालसंगितीका माधव साखळदांडे यांनी लिहीलेली आहे आणि मूळ संकल्पना/निर्मिती ही "अविष्कार" नाट्यसंस्था आणि त्यातही अरविंद आणि सुलभा देशपांडे यांची आहे. नृत्यसंकल्पना ही पार्वतीकुमार यांची आहे.
भारतात चारशेहून अधिक प्रयोग झालेले हे नाटक बॉस्टनमधे यंदा गणेशोत्सवासाठी करायचे असे एप्रिलमधे मंडळाने जाहीर केले होते. बघता बघता हौशी बाल-प्रौढ कलाकार या नाटकासाठी तयार झाले आणि प्रत्येक विकेन्ड आणि अनेकांना कामाच्या दिवशी संध्याकाळी पण तालीमींसाठी जावे लागले. हे नाटक प्रायोगीक असल्याने त्याची डीव्हीडी वगैरे मिळणे शक्य नव्हते पण अविष्कारने मदत केली, जुने ध्वनीमुद्रण मिळाले आणि ते चांगले करत करत एक वर्षाच्या खालील मुलीपासून ते प्रौढांपर्यंत सहभाग असलेले हे नाटक बसवण्यात आले. बॉस्टन मध्ये ह्या नाटकाचे दिग्दर्शन अदीती टेलरने केले. अदीतीने स्वतः मुंबईत असताना या नाटकात अगदी लहानपणापासून काम केले असल्याने त्या भावनीक गुंतवणूकीचा फायदा दिग्दर्शन करताना झाला.
ह्या बालनाट्याची मूळ कथा थोडक्यात अशी:
![]() |
दुर्गा ही नावाप्रमाणे तापट असलेली राजकन्या वाटेल ते हट्ट करायची. फुलांनी केलेल्या बिछाना पण टोचतो म्हणून माळ्याला फाशी द्या म्हणे पर्यंत तीची मजल जाते आणि राजाच्या सहनशीलतेचा अंत होतो. ती घर सोडते म्हणते आणि राजा थांबवत नाही... मग ती वादळात अडकते आणि कोळ्यांबरोबर होडीतून जात असताना नाव फुटून एका किनार्यावर पडते. तिथे असलेल्या वयोवृद्ध आजीआजोबांना ही स्वतःस विसरलेली गौरी म्हणजे वादळातून सापडलेली आपली गौरी ही नात वाटते. वादळात सापडून आणि घरापासून, ऐश्चर्यापासून लांब जाऊनही पिळ तसाच असल्याने, ही गौरी अर्थात दुर्गा सार्या गावाला आज्ञा सोडल्याच्या थाटात सांगते की ही नदी जर नेहमी पूर आणते तर तीला आधी बांध घाला आणि आवरा. तेंव्हा गावकर्यांच्या लक्षात येते की आपण काय करायला हवे ते.
इतके जरी असले तरी "गौरीस" झोप येत नसते. तेंव्हा गावतल्या दोन बायका कुत्सितपणे म्हणतात की काम केले तर झोप येते, नुसते बसून झोप कशी येणार! दुर्गा ते ऐकते आणि म्हणते की काम करून पाहूया. मग ती गावकर्यांना म्हणते की तुम्ही लहानमुलांना कामावर घेऊन जात त्या ऐवजी माझ्याकडे सोडा मी त्यांना शिकवेन. हे चालू असताना ती कधी उडणारे पक्षी, कधी मधमाश्या, कधी मुंग्या असे बघत जाते आणि कामाचे महत्व तीला त्यांच्याकडून समजत जाते. बघता बघता गौरीमुळे गावावरील दरवर्षीचे पुरामुळे येणारे संकट टळते आणि मुलेपण शिकायला लागतात. परीणामी या लाडक्या आणि नावाप्रमाणे शांत/प्रेमळ असलेल्या गौरीचे कौतूक राजा-राणी कडून ते करायचे ठरवतात. त्या कौतूक समारंभात राजा तीला विचारतो की तुझे नाव गौरी कसे काय? तुझे नाव दुर्गा ना? सर्व गावकरी म्हणतात की हे शक्यच नाही कारण ही तर फार प्रेमळ आहे... अर्थात दुर्गा आणि गौरी ह्या दोघी एकच आहेत आणि तापट "दुर्गा" आता "गौरी" सारखी शांत/प्रेमळ झाली आहे हे सर्वांना समजते...
"दुर्गा झाली गौरी" च्या तालीमी ह्या केवळ तालीमी न रहाता उन्हाळ्याच्या सुट्टीतले एकमेकांना भेटण्यासाठीचे आणि नवीन ओळखी करण्याचे एक निमित्त होऊन गेले. मुलांना अथवा स्वतःच्या तालिमींना केवळ आई-वडील अथवा स्वतः न जाता सर्वजण अगदी उन्हाळ्यात आलेल्या आजी-आजोबांना पण घेऊन येयचे. अंगत-पंगत (पॉटलक) म्हणजे "अक्षयपात्र"च होते! रात्री अकरापर्यंत चाललेल्या या तालीमींमधे सर्वजण मनापासून आनंद उपभोगत होते.
कार्यक्रमाच्या दिवशी, म्हणजे गेल्या शनीवारी, १३ सप्टेंबरला, ६०० च्या वर माणसे आली. गणपतीची पूजा आणि आरती-प्रसाद झाल्यावर कार्यक्रमास सुरवात झाली. त्यात अनेकजण अमराठी आणि अभारतीय वंशाचे - गोरे अमेरीकन्सपण होते. कुणाच्या ऑफिसातील तर आमच्यासारख्यांच्या बाबतीत आमच्या मुलीचे काम आहे म्हणून तीची मैत्रीण आणि तिचे आई-वडील. जरा शंका आली की अडीच तास ह्या कार्यक्रमास भाषा न समजता कसे थांबणार. पण इंग्रजीत "स्टोरीलाईन" दिलेली असल्याने नुसते बसलेच नाहीत तर मनापासून नाटक आवडल्याची त्यावेळेस आणि नंतर पोचपावती दिली. इतके दिवस सातत्याने केलेल्या तालिमींचा फायदा सर्वांना समजला.
१२ सप्टेंबरची स्टेजवरील तालीम आणि नंतरचा कार्यक्रम झाल्यावर अचानक आता सर्व कलाकार-संबंधीतांना पोकळी जाणवू लागली, की आता हे संपले? पण आता न्यूयॉर्कच्या मराठी मंडळाने दुर्गेला पाचारण केले आहे आणि दिवाळीच्या कार्यक्रमा निमित्त १६ नोव्हेंबरला आता न्यूयॉर्क मध्ये दुर्गेची गौरी होणार आहे!
वाचन
5344
प्रतिक्रिया
0
