मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जे के रोलिंग - गुपचूप गुपचूप

आदूबाळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
एप्रिल २०१३ मध्ये स्फीअर बुक्स या ब्रिटिश प्रकाशन संस्थेने एक पुस्तक प्रकाशित केलं. प्रकार नेहेमीचाच. लिहून लिहून बुळबुळीत झालेला. रहस्यकथा. लेखक नवखा - रॉबर्ट गाल्ब्रेथ नावाचा. विशेष कोणाचं या पुस्तकाकडे लक्ष जाण्याचं कारण नव्हतं. गेलंही नाही - पुढच्या तीन महिन्यांत त्या पुस्तकाच्या जेमतेम दीड हजार प्रती विकल्या गेल्या. समीक्षकांनी मात्र कादंबरीचं मुक्तकंठाने कौतुक केलं. एकाने त्याला "दैदिप्यमान पदार्पण" असं म्हटलं, तर दुसर्‍याला त्यातलं ठसठशीत पात्रवर्णन आवडलं. इंग्रजी ग्रंथप्रकाशनाचं जग मोठं क्रूर आहे. दर आठवड्याला शेकडो पुस्तकं प्रकाशित होता असतात. दिग्गजांची पुस्तकं तीन महिन्यात क्षितिजाखाली गडप होतात तिथे पहिलटकरीण लेखक - लेखिकांचा काय पाड? अमेझॉनच्या बेस्टसेलर यादीत हे पुस्तक अडीच हजाराच्या भाराखाली दाबलं गेलं. असाच जुलै महिना उजाडला. हे पुस्तक संडे टाईम्सची वार्ताहर इंडिया नाईटच्या वाचनात आलं. तिला आवडलं. लगेच तिने ट्विटरवर लिहिलं, "पहिल्या प्रयत्नाच्या मानाने पुस्तक फारच सफाईदार आहे". सत्त्याण्णव हजार लोक इंडिया नाईटला ट्विटरवर 'फॉलो' करतात. त्यातल्या एका जुड केल्गरीकडून तिला मध्यरात्री उत्तर आलं "हे पुस्तक 'पहिला प्रयत्न' नाही!" इंडिया नाईटमधला वार्ताहरी भोचकपणा जागा झाला, आणि जूडने सांगितलं की या पुस्तकाची लेखिका आहे - Harry Potterफेम - जे के रोलिंग! पण ही माहिती दिल्या दिल्या जूडबाई गायब झाल्या. ते ट्विट्स (ट्विटर संदेश) सुद्धा डिलीट केले गेले! इंडियाबाईंनी हा प्रकार तिच्या बॉसला, रिचर्ड ब्रूक्सला कळवला. या बॉसने आपलं डोकं चालवलं. त्याने हे पुस्तक आणि रोलिंगची इतर पुस्तकं दोन भाषा शास्त्रज्ञांना पाठवली. हे दोन भाषा शास्त्रज्ञ - पीटर मॅकमिलन (ऑक्स्फर्ड) आणि पॅट्रिक युओला (पिट्सबर्ग) - हे forensic linguistics मधले तज्ज्ञ मानले जातात. वाङ्मयचौर्याच्या (plagiarism) तपासात त्यांनी शोधलेल्या पद्धती वापरल्या जातात. त्यांनी एकमुखाने सांगितलं, की या लेखनाची शैली रोलिंगची असण्याची शक्यता सर्वात अधिक आहे. दरम्यान, ब्रूक्सला लक्षात आलं, की या रॉबर्ट गाल्ब्रेथचा आणि रोलिंगचा एजंट एकच आहे! एवढंच नाही, तर प्रकाशक स्फीअर बुक्स हे रोलिंगचे प्रकाशक लिटल, ब्राऊन आणि कंपनीचंच एका पिल्लू आहे! आता रिचर्ड ब्रूक्सने एक खेळ खेळायचं ठरवलं. त्याने स्फीअर बुक्सला फोन केला आणि पुस्तकाची बेफाट स्तुती केली. लेखकाची मुलाखत घ्यायची इच्छा व्यक्त केली. स्फीअर बुक्सने त्याला नकार देताच ब्रूक्सने सरळ सरळ विचारलं, "हे पुस्तक रोलिंगने लिहिलं आहे ना?" संडे टाईम्स हे समीक्षाजगातलं मोठं नाव आहे. त्यांना दुखवणं भल्याभल्यांना परवडत नाही. मग मात्र स्फीअर बुक्स लायनीवर आले आणि त्यांनी 'ती' रोलिंगच असल्याचं कबूल केलं! संडे टाईम्सने लगेचच ही ब्रेकिंग न्यूज छापून टाकली. रातोरात हे पुस्तक अडीच हजाराव्या नंबरावरून पहिल्या नंबराकडे झेपावलं. आजही ते पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे! जिच्या ट्विटमुळे हे सगळं घडलं ती जूड केल्गरी कोण आहे? तर रोलिंगचे वकील, रसेल्स, यांच्या फर्ममधल्या एका पार्टनरच्या बायकोची ही जिवलग मैत्रीण! त्या पार्टनरने तिला "कुण्णा कुण्णाला सांगू नकोस बर्का" म्हणून विश्वास टाकला आणि बाईने नेमकी माती खाल्ली! रोलिंगने चिकार थयथयाट केला. रसेल्सने बिनशर्त माफी मागितली आहे, पण बूंदसे गयी, वो… प्रस्थापित लेखकाला रहस्यकथा लिहावीशी वाटावी, याची चिक्कार उदाहरणं आहेत. सत्यजित रायचा फेलुदा प्रसिद्धच आहे. अगदी मराठीतसुद्धा. गोनीदांनी "रुमाली रहस्य" नावाची एक पेशवाईची पार्श्वभूमी असलेली कादंबरी लिहिली आहे*. फास्टर फेणे कार भा. रा. भागवतांनी "भटजीबुवा"** हे पात्र असलेली दोन पुस्तकं लिहिली आहेत. जे. के. रोलिंगला त्याचा मोह पडणं स्वाभाविकच होतं. हे रहस्य प्रकाशात आल्यावर तिने या पुस्तकाच्या संस्थळावर तिला रहस्यकथा लिहावीशी का वाटली, याच्यावर सविस्तर उहापोह केला आहे. तो मुळातूनच वाचण्यासारखा असल्याने मी इथे दुवा देत आहे. एकच महत्त्वाच्या भागाचा भावानुवाद इथे लिहितोय: "मला रहस्यकथा लिहायची होती. तीसुद्धा कोणत्याही अपेक्षांचं जू मानेवर न ठेवता. प्रसिद्धीच्या लखलखाटापासून दूर, मला माझ्या रहस्यकथा लेखनावर खऱ्या खऱ्या प्रामाणिक प्रतिक्रिया हव्या होत्या." रोलिंगच्या पात्रांच्या नावातसुद्धा काहीतरी खोल अर्थ दडलेला असतो. उदा. हॅरी पॉटरच्या शत्रूच्या Voldemort या नावाचा फ्रेंचमधला अर्थ म्हणजे "मृत्यूपासून दूर पळणारा". आणि खरंच तो अमरत्व मिळवण्यासाठी नाना प्रकार करतो. तसाच, रॉबर्ट गाल्ब्रेथ या (टोपण)नावाचा (जुन्या जर्मेनिक आणि गेलिक मुळांमधला) अर्थ "famous stranger" असा आहे! (रोलिंगने संस्थळावर मात्र वेगळंच लिहिलं आहे.) रोलिंगने दुसरा भाग लिहून पूर्ण केला आहे. सन २०१४मध्ये तो प्रकाशित होईल. स्वत:पुरतं बोलायचं तर मला ही कादंबरी आवडली. कथानायक डिटेक्टिव्ह कारमोरन स्ट्राईक आणि त्याची सेक्रेटरी रॉबिन ही दमदार पात्रं वाटतात. त्यांच्यातलं नातं हळुवार उमलताना जाणवतं आहे. वाचकांची इच्छा असेल तर पुस्तकाचं रसग्रहण लिहावं असं मनात आहे. *अवांतर: त्यात डिटेक्टिव्ह म्हणून चक्क घाशीराम कोतवाल आहे! अगदी आवर्जून वाचावं असं पुस्तक आहे. **हे पात्र जी. के. चेस्टरटनच्या फादर ब्राऊनवरून प्रेरित आहे असं भा. रां.नी प्रस्तावनेत लिहिलं आहे.

वाचन 5313 प्रतिक्रिया 0