मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विक्रांत वरील आयुष्य ५

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सकाळी रत्नागिरीच्या समुद्रातून आम्ही निघालो तेंव्हा सकाळचे ६.३० वाजले होते. आता कोठे जायचे होते ते माहित नव्हते ( लष्करात कोणतीही माहिती ज्याला आवश्यक आहे त्यालाच दिली जाते. अर्थात त्यामुळे फार फरक पडतो असे नाही. माझ्यासारखा माणूस जो कोणत्याही विभागात काहीही कारण नसताना जात असे त्याला हे माहित होतच होते. तसे मी ब्रिज वर(जेथून जहाजाचे नियंत्रण केले जाते तेथे गेलो तेंव्हा तेथे नौकाचलन अधिकारी ( navigating officer) नकाशावर रेघोट्या ओढत होता. त्याच्या नकाशात डोके घातले तर आम्ही सरळ पश्चिमेकडे जात होते असे दिसले कुठे जायचे किती अंतर हे विचारण्याच्या मी फंदात पडलो नाही. पूर्ण २ दिवस आणि रात्री आम्ही अरबी समुद्रात पश्चिमेकडे जात होतो. या काळात फार काही नवीन घडले नव्हते. या काळात आमची हेलिकॉप्टर समुद्रात गस्त घालायला जात होती त्याबरोबर आमच्या पाणबुड्या आणि इतर जहाजे आपल्या सरावात मग्न होती. दोन दिवसानंतर एका रात्री आमच्या काही पाणबुड्या पाण्याच्या पृष्ठभागावर आल्या. त्यानी त्यांच्या संपलेल्या बैटर्या विक्रांतवर चार्जिंग साठी दिल्या आणि आमच्याकडून नवीन (पूर्ण चार्ज केलेल्या) बैटर्या घेतल्या आणि त्या परत पाण्याच्या खाली गेल्या. या डिसचार्ज झालेल्या बैटर्या आमच्या इलेकट्रीकल विभागाच्या तंत्रज्ञांनी चार्ज करण्यासाठी इलेकट्रीकल कंट्रोल रूम मध्ये नेल्या आणि ते त्यातील पाणी वगैरे चेक करण्यासाठी त्यांनी त्याची झाकणे उघडली आणि त्याचे विशिष्ट गुरुत्व तपासण्यासाठी घेतले. या काळात समुद्र थोडासा खवळलेला होता आणि जहाज वर खाली होत होते. आता हि नेहेमीची गोष्ट असल्याने कोणीही फारसे लक्ष देत नाही. पण मध्येच एक मोठी लाट आली आणि जहाज एकदम वर उचलले गेले आणि परत वेगाने खाली आले. यामुळे एका बैटरीतील सल्फ्युरिक आम्ल उसळून बाहेर आले एक तंत्रज्ञ त्या बैटर्याची अमलाची पातळी किती आहे ते पाहत होता ते आम्ल त्या तंत्रज्ञाच्या डोळ्यात गेले. ताबडतोब तो तंत्रज्ञ ओरडू लागला आणि त्याचे साथीदार त्याला तसेच उचलून माझ्या दवाखान्यात घेऊन आले. सुदैवाने मी रात्रीची चक्कर मारायला दवाखान्यातच होतो. ते त्या तंत्रज्ञाला घाईघाईने घेऊन आले आणि सर याच्या डोळ्यात असिड गेले म्हणून सांगु लागले. मी ताबडतोब तेथे ठेवलेल्या सलाईनच्या बाटलीचे सील फोडले आणि त्याच्या डोळ्यात पूर्ण अर्धा लिटर सलाईन उलटे केले. अशा एकामागोमाग तीन सलाईन च्या बाटल्या मी त्याच्या डोळ्यात उलट्या केल्या. त्याचे सगळे कपडे पण सलाईन ने भिजले तो तंत्रज्ञ अजूनही आरडा ओरडा करत होता. सर बहुत जलन हो रही है. त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा काही थेंब पडले होते ते पण सलाईन ने धुतले गेले होते पण डोळ्यात किती आम्ल गेले होते ते कळायला मार्ग नव्हता. तो काही डोळा उघडत नव्हता. मी शांत पणे बाकी लोकांना बाहेर पाठवले त्याला तिथल्या शस्त्रक्रिया गृहात घेऊन गेलो त्याच्या डोळ्यात सलाईनची बारीक धार सोडली आणि हळूहळू त्याचा डोळा उघडला.तिथल्या टेबलवरच्या मोठ्या दिव्याच्या प्रकाशात त्याचा डोळा तपासला. मी त्याच्या सुदैवाने त्याच्या बुबुळावर( cornea) कोणतीही जखम झाली नव्हती तर ती जखम डोळ्याच्या आत पापणीच्या खालच्या लाल भागाला(lower conjunctiva) झाली होती.त्याला भयंकर जळजळ होत होती. त्याला डोळा उघडवत नव्हता पण मी जेंव्हा त्याला सांगितले कि तुझा डोळा( बुबुळ) वाचला आहे त्याला जखम झालेली नाही तेंव्हा तो मला मनापसून धन्यवाद देऊ लागला. मी त्याला परत परत सांगत होतो कि मी काहीही केलेले नाही. पण तो आपला डोळा वाचला आहे या आनंदातच होता. आता मला वेगळीच चिंता होती कि पापणीच्या खालच्या भागात झालेली ओली जखम हा होता. कारण हि जखम भरताना जर त्याची पापणी नेत्रगोलाला चिकटली असती तर तर प्रत्येक वेळा वर बघताना त्याचा डावा डोळा वर फिरला असता आणि उजवा डोळा चिकटल्याने तेथेच राहून तो तिरळा झाला असता.मी त्याच्या डोळ्यात क्लोरोमायसेटीन चे मलम टाकले आणि कॅप्तन ला भेटायला निघालो. कॅप्टन ला मी लगेच भेटलो आणि सर्व माहिती सांगितली आणि सांगितले कि सर याला ताबडतोब अश्विनी रुग्णालयात हलवले पाहिजे कारण त्याच्या डोळ्याचा प्रश्न आहे. कॅप्टन शांतपणे मला म्हणाले कि ते आता शक्य नाही मी विचारले असे का? त्यावर ते म्हणाले कि आता आपण मुंबई पासून एक हजार नॉट (अठराशे किमी) अंतरावर आहोत आणि आपल्या हेलिकॉप्टरचा पल्ला/ आवाका (range)फक्त पाचशे नॉट(९०० किमी)आहे. मग मी म्हणालो कि त्याला लवकरात किती लवकर पाठवता येईल.त्यावर ते म्हणाले कि वीस नॉट तासाला या वेगाने आपण चोवीस तासांनी पाचशे नॉट टप्प्यात पोहोचू शकू आणि सुरक्षा म्हणून मी अजून ६ तासांनी म्हणजे चारशे नॉट टप्प्यात हेलिकॉप्टर पाठवू शकतो. तीस तास म्हणजे दोन रात्री आणि एक दिवस गेला असता. मी जरा नाउमेद होऊन बोललो कि तीस तासांनी त्याला पाठवून काहीच फायदा नाही त्यावर ते शांतपणे म्हणाले मग ठीक आहे जे करायचे आहे ते तूच कर(ok then manage it yourself I wont turn around) मी उलटा फिरणार नाही. मी नाउमेद होऊन परत फिरलो आणि दवाखान्यात आलो. काय करावे ते समजत नव्हते सल्फ्युरिक आम्ल किती खोल जखम करते ते माहित नव्हते त्यातल्या त्यात त्याचा कोर्नीया (बुबुळ)सुरक्षित होते हा चांगला भाग होता माझ्याकडे ऑक्सफर्ड टेकस्टबुक ऑफ मेडिसिन होते ते पूर्ण चाळून पहिले त्यात काहीच माहिती नव्हती. काय करावे कसे करावे? मी त्याच्या डोळ्यात क्लोरोमायसेटीन टाकून बँडेज लावले होते. त्याला एक phenargan ची गोळी दिली जळजळ कमी होण्यासाठी आणि तेथे झोपवले. रात्री तो शांत झोपला पण मला सारखी जाग येत होती आणि एक भीती वाटत होती कि याचा कोर्निया दिसतो तसा सुरक्षित आहे का? तसा नसेल तर काय?आणि बाकी अशी जखम कशी सांभाळायची. एक नक्की होते कि मी नेत्ररोग विभागात काम चांगले केले होते त्यामुळे हे माहित होते कि जर जखम चिकटू दिली नाही तर त्याची नैसर्गिक प्रतिकारशक्ती पुढचे सर्व सुरक्षित ठेवेल. त्यामुळे मी पुढे तीन दिवस दिवसात सहा वेळा त्याला शस्त्रक्रिया विभागात घेऊन मोठ्या दिव्याखाली पाहत होतो. डोळ्यात औषधाचे थेंब टाकीत होतो आणि रात्री मलम टाकून बँडेज लावीत होतो आणि प्रत्येक वेळेला खालची पापणी आणि बुबुळ अलग करीत होतो. शेवटी चार दिवसांनी आम्ही मुंबईत पोहोचलो तेंव्हा सर्वात पहिली गाडी विक्रांत जवळ उभी होती ती म्हणजे अश्विनीची रुग्णवाहिका. तिच्यात त्याला बसवून मी लगेच नेत्ररोग विभागात घेऊन गेलो तेथे आमच्या विभाग प्रमुखांनी स्वतः ती जखम बघितली. त्यांनी कोर्नियाला कोणतीही इजा झालेली नाही हा निर्वाळा दिला आणि पापणीच्या आत असलेली जखम पण बरीच भरली गेली आहे हे पण सांगितले. ( त्यांनी सुद्धा हे कबुल केले कि सल्फ्यूरिक आम्लाची जखम त्यांनी आयुष्यात कधी पहिली नव्हती). मी त्या तंत्रज्ञाला अश्विनी मध्ये भरती करून आलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. चार दिवस माझ्या मनावर असलेला अदृश्य असा तणाव संपल्याची जाणीव झाली. याच काळात आमचा न्हावी बेशुद्ध पडला होता ती कहाणी पुढच्या भागात. क्रमशः

वाचन 11113 प्रतिक्रिया 0